सार्वजनिक विहिरीत अज्ञाताने टाकला विषारी पदार्थ
सार्वजनिक विहिरीत अज्ञाताने टाकला विषारी पदार्थ
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील भोकर येथील हनुमानवाडी परिसरातील सार्वजनिक पाणी पुरवठा विहिरीत अज्ञात समाजकंटकांनी विषारी पदार्थ टाकल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उजेडात आला आहे. यामुळे विहिरीतील असंख्य मासे मृत झाले असून विहिरीजवळील एका शेतकर्याच्या ही बाब लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
हनुमानवाडी परिसरातील बिरदवडे, अभंग, कांबळे, जाधव, भोईटे, विधाटे व पटारे वस्त्यांसाठी सदर विहिरीतून पाणी पुरवठा केला जातो. दरम्यान, काही शेतकरी पाणी पुरवठा विहिरीजवळ काम करत असताना त्यांना विहिरीच्या इंजिनसमोर काही बाटल्यांसह इतर साहित्य आढळून आले. संबंधित शेतकरी विहिरीत डोकावले असता, त्यांना विहिरीच्या पाण्यावर असंख्य मासे मृतावस्थेत दिसले. तसेच पाण्यावर विशिष्ट प्रकारच्या द्रवाचा तवंग आल्याचा दिसून आला. त्या शेतकर्याने तात्काळ उपसरपंच राधाकिसन विधाटे यांना माहिती दिली. त्यांनी आरोग्य सेवक प्रदीप गवई यांच्या मदतीने पाण्याचा नमुना तपासणीसाठी पाठविला. प्राथमिक तपासणीत पाण्यात विषारी द्रव मिळाल्याचा निष्कर्ष निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने सदर विहिरीचा पाणी पुरवठा थांबविला. तसेच ग्रामविकास अधिकारी प्रदीप ढुमणे यांनी विहिरीतील पाणी उपसा करून विहिरीच्या स्वच्छतेच्या सूचना दिल्या आहेत.