महाविकास आघाडीचे सरकार गुन्हेगारांना पाठिशी घालणारे ः विखे पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरुन संगमनेरात पत्रकारांशी बोलताना डागली तोफ
नायक वृत्तसेवा, राहाता
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील सत्य बाहेर आले पाहिजे, असे मुख्यमंत्री स्वत: म्हणतात. मात्र, गुन्हाच दाखल होत नाही आणि मंत्रीही गायब. यापूर्वीही अशाच प्रकरणात काय झाले, हे संपूर्ण राज्याने पाहिले आहेच. त्यामुळे हे महाविकास आघाडीचे सरकार गुन्हेगारांना पाठिशी घालणारे आहे, असा संदेश लोकांमध्ये जातो आहे,’ असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.
संगमनेर येथे पत्रकारांशी बोलताना विखे-पाटील यांनी हा आरोप केला. ते म्हणाले, ‘पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील सत्य बाहेर आले पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणत असतील तर सरकारने अद्याप गुन्हाच दाखल केलेला नाही, मग सत्य बाहेर कसे येणार? या प्रकरणात गुंतलेल्या डागी मंत्र्यांना तातडीने बडतर्फ केले पाहिजे. मात्र, या घटनेचे गांभीर्य सरकारने अद्यापही दाखविलेले नाही.
घटनेत गुंतलेले मंत्री अजूनही गायब आहेत. या घटनेतील सत्यता समोर यावी असे महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना वाटत असेल तर, अद्याप गुन्हा दाखल का झाला नाही. गुन्हा दाखल होऊन तपास केल्याशिवाय सत्य कसे बाहेर येणार,’ असा सवाल करून विखे यांनी पूर्वीच्या एका घटनेची आठवण करून दिली. ते म्हणाले, ‘मागील वेळी सुध्दा मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीचे मंत्री अशाच घटनेमध्ये अडकले होते. त्यानंतर पुढे काय झाले हे संपूर्ण राज्याने पाहिले आहे. त्यामुळे गुन्हेगारांना पाठीशी घालणारे हे सरकार आहे, हाच संदेश राज्यात जातोय. याचे भान महाविकास आघाडी सरकारने ठेवले पाहिजे. अशा घटनेतील डागी मंत्र्यांना मंत्रिमंडळातून तातडीने बडतर्फ करण्यात यावे,’ अशी मागणीही त्यांनी केली.