श्रीरामपूरमध्ये मेडिकल फोडून 21 लाखांची रोकड लांबविली सीसीटीव्हीचा सर्व्हरही चोरला; शहर पोलिसांत गुन्हा दाखल
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
शहरातील मोरगे हॉस्पिटलमधील मेडिकल फोडून अज्ञात दोघा चोरट्यांनी सुमारे 21 लाखांची रकमेसह 7 हजार रुपये किंमतीचा सीसीटीव्हीचा एक सर्व्हर चोरुन नेला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
कोरोना काळात प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या डॉ. मोरगे हॉस्पिटलच्या तळमजल्यावर मेडिकलचे दुकान आहे. मंगळवारी (ता.7) मध्यरात्री तीनच्या सुमारास तोंड बांधलेले अज्ञात दोन चोरटे मोटारसायकलवरुन याठिकाणी आले. भिंतीवरुन उडी टाकून दोघांनी आत प्रवेश केला. यावेळी बाहेरच असलेल्या सुरक्षा रक्षकाला जाग आली आणि त्याचवेळी चोरट्यांनी त्याच्या गळ्याला चाकू दाखवून गप्प केले. चाळचूळ केली तर मारुन टाकू अशी धमकी दिली. सुरक्षका रक्षकाजवळची चादर त्याच्या तोंडावर एका चोराने टाकली. तेवढ्यात दुसर्याने कटरच्या सहाय्याने या मेडिकलच्या शटरला असणारे दोन्ही कुलूपे तोडली. कुलूप तोडल्यानंतर शटर उघडून आत प्रवेश केला. त्यानंतर स्कू ड्रायव्हरने चोरट्यांनी मेडिकलमधील ड्रॉवर उघडले. ड्रॉवरमधील सुमारे 21 लाखांची रोकड पिशवीत भरली. तसेच काही पुरावा राहू नये म्हणून त्यांनी तेथील सीसीटीव्हीचे सर्व्हरही घेऊन चोरट्यांनी त्याठिकाणाहून पोबारा केला. त्यानंतर सुरक्षा रक्षकाने काही वेळाने वर जावून डॉक्टरांना घडलेला सर्व प्रकार सांगितला.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात ज्ञानदेव मोरगे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात दोघा चोरट्यांविरुध्द भादंवि कलम 392, 498, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी घटनास्थळी भेट देवून पहाणी केली. तसेच चौकशीही केली. शहराच्या मध्यवस्तीत चोरांनी केलेल्या धाडसी चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटने संदर्भात माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके व त्यांचे पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर काही वेळातच ठसेतज्ज्ञ व श्वान पथक देखील घटनास्थळी दाखल होऊन, घडलेला गुन्हा सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाल्याने गुन्हेगारांचा सुगावा शोध करण्याचे काम सुरू केले आहे. शहरात पोलिसांनी चोरांवर धाक निर्माण करण्याची गरज यानिमित्ताने निर्माण झाली आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे करत आहेत.
महिनाभरातील मेडिकलच्या देणेदारीचे धनादेश हे चालक ज्ञानदेव मोरगे यांनी लिहून ठेवलेले होते. शिवाय जी रोकड महिनाभरात जमा होती ती आज उद्या भरायची होती. त्यामुळे मेडिकल दुकानामध्ये 21 लाख रुपये आहेत याची माहिती असणार्यांनीच हा धाडसी चोरीचा प्रकार केला असण्याची दाट शक्यता आहे. कारण दुसर्या दिवशी ही रोकड बँकेत भरली जाणार होती. आणि रात्री ही रोकड मेडिकलमध्येच आहे याची पूर्ण खात्री असल्याने चोराने इकडेतिकडे उचकापाचक न करता स्क्रू ड्रायव्हरने मेडिकलचे ड्रॉव्हर उघडले आणि सरळ रोकड पिशवीत भरली. यावरुन मेडिकलमध्ये असणार्या रकमेची इत्यंभूत माहिती चोरी करणारांना होती. याचाच अर्थ चोर हे माहितगार असावेत असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.