बिग मी इंडियामुळे ‘कुकाणा अर्बन’ गॅसवर! तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल
नायक वृत्तसेवा, नेवासा
बिग मी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून ठेवीदारांना जादा परतावा (व्याज) देण्याचे आमिष दाखविणारा कंपनीचा प्रवर्तक सोमनाथ एकनाथ राऊत (वय 38) याच्यासह सात संचालकांवर तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. राऊत याने कुकाणा अर्बन मल्टीस्टेट निधी सोसायटी स्थापन केली होती. त्यामुळे तेथील ठेवीदारही धास्तावले आहेत.
सोमनाथ एकनाथ राऊत याचे मूळ गाव हे पाथरवाला (ता. नेवासा) आहे. हे गाव कुकाणा या गावापासून सुमारे पाच-सहा किलोमीटर अंतरावर आहे. त्याच्या वडिलांनी लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यांचा पराभव झाला. परंतु, लोकांनी त्यांना ‘खासदार’ ही उपाधी दिली. मित्र परिवार आणि ओळखीचे लोक त्यांना ‘खासदार’ म्हणतात. सोमनाथ याने अनेक उद्योगधंदे केले. त्याचे कारनामे आता उघडकीस येत आहेत. त्याचे राहणीमान ऐषआरामाचे होते.
सोमनाथ याने एक न्यूज चॅनेल सुरू केले होते. चारचाकी वाहनावर त्या चॅनेलचा लोगो आणि नाव टाकून परिसरात फिरत असत. कुकाणा आणि परिसरातील लोकांना त्याचे उद्योगधंदे माहिती असल्याने ओळखीचे कोणी त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते. त्याने अहमदनगरला बिग मी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन केली. या कंपनीची जाहिरात राज्यभर केली. त्याच्या आकर्षक योजनांच्या आमिषाने अनेक गुंतवणूकदार बळी पडले.
बिग मी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा आणि महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचे स्वरुप आणि व्याप्ती पाहून आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे गुन्हा पाठविण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
– ज्योती गडकरी (पोलीस निरीक्षक – तोफखाना पोलीस ठाणे)