पहिल्या दर्शनाचा मान असलेली संगमनेरची ‘छोटीदेवी’! सहा वर्षांपूर्वी मंदिराच्या जिर्णोद्धारातून उलगडले होते मूर्तीचे आश्चर्यकारक रहस्य
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर आणि शक्तिची पूजा हे सूत्र अगदी पौराणिक कालखंडापासून दिसून येते. संगमनेरचे ग्रामदैवत असलेल्या सप्तश्रृंगी मातेला (मोठी देवी) जसा सुमारे पाचशे वर्षांचा इतिहास आहे, तसाच इतिहास शहरातील अन्य काही धार्मिक स्थळांनाही आहे. त्यातील एक म्हणजे कसबा पेठेतील रेणुका माता म्हणजेच छोटी देवी. विशेष म्हणजे नवरात्रौत्सवासह अन्य सण-उत्सवांच्या दिनी दर्शनासाठी रिघ लावणारे भाविक आधी छोट्या देवीचे आणि नंतर मोठ्या देवीचे दर्शन घेतात. यामागील पौराणिक संदर्भ सापडत नाहीत, मात्र पूर्वापारपासून भाविक आधी रेणुकामातेची करुणा भाकून नंतर सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनाला जातात. ही परंपरा गेल्या अनेक शतकांपासून आजही कायम आहे. सध्या कोविडच्या नियमांत मंदिरांना टाळे लागलेले असल्याने उत्सवांचा डामडौल नसला तरीही भक्तीत मात्र कोठेही कमतरता पडल्याचे दिसत नाही.
प्रागैतिहासात समुद्रमंथनातून निघालेल्या अमृताचे वाटप करतांना साक्षात नारायणाने देवरुप धारण करुन अमृतपान करणार्या राऊ नावाच्या दानवाचा कंठ आपल्या पायाच्या अंगठ्याने दाबला आणि त्यातून अमृतवाहिनी प्रवाहित झाल्याचे दाखले पौराणिक कथांमधून मिळतात. या नदीच्या काठावर अगस्तीऋषींचा आश्रमही होता. प्रभु रामचंद्रांना वनवास झाल्यानंतर रावणाने माता सितेचे अपहरण केले, त्याचा माग काढताना श्रीरामचंद्रांनी अमृतवाहिनीच्या खोर्यातील दंडकारण्यातून प्रवास करीत टाकेदमार्गे पंचवटीकडे प्रवास केला इतका प्राचीन वारसा संगमनेर नगरीला लाभला आहे.
त्यामुळे शहरातील चंद्रशेखर चौकात असलेले मोठे मारुती मंदिर, कसबा पेठेतील सप्तश्रृंगीमाता आणि रेणुकामाता, दिल्ली नाक्यावरील पंचमुखी मारुतीरायासह रेणुका माता आदी मंदिरांची रचनाही समकालिन असल्याचे सांगीतले जाते. कसबा पेठेतील दोन्ही देवींच्या मंदिराचे व्यवस्थापन फारपूर्वी क्षत्रिय समाजाकडे होते, तिच पंरपरा अगदी 1940 पर्यत कायम होती. मुळे परिवाराकडे पिढीजात पद्धतीने या दोन्ही मंदिरांचे पौराहित्य होते जे आजही अव्याहत असून आज बापू व स्वप्नील मुळे या परंपरेचे पाईक आहेत.
इतिहासात डोकावताना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी साधारणतः 270 वर्षांपूर्वी संगमनेरनगरीतील काही मंदिरांना देणग्या देवून त्यांचा जिर्णोद्धार केला होता. त्यात कसबापेठेतील या दोन्ही मंदिरांचाही जिर्णोद्धार करण्यात आला होता. 1940 पर्यंत या दोन्ही मंदिरांचे व्यवस्थापन सोमवंशीय क्षत्रिय समाजाकडेच होते. मात्र 20 व्या शतकात संगमनेरचे ग्रामदैवत असलेल्या सप्तश्रृंगी मातेचे मंदिर सार्वजनिक न्यासातंर्गत यावे यासाठी कसबापेठेतील काहींनी आग्रह धरला. त्यामुळे क्षत्रिय समाजानेही औदार्य दाखवताना सदर मंदिरावर बहुजनांचे विश्वस्त मंडळ नेमून त्यामार्फत मोठ्या देवीच्या मंदिराची व्यवस्था निर्माण करण्यास संमती दर्शविली आणि त्यांच्याच होकारातून 1952 साली श्री सप्तश्रृंगीमाता सार्वजनिक देवस्थान ट्रस्टची स्थापना झाली.
मोठ्या देवीच्या मंदिराचे व्यवस्थापन सार्वजनिक न्यास नोंदणीनुसार शहरातील बहुजनांकडे गेले तर छोट्या देवी मंदिराचे व्यवस्थापन क्षत्रिय समाजाकडेच राहीले. आजवर सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाजच या मंदिराची देखभाल, दिवाबत्ती व अन्य सर्व धार्मिक सोहळे साजरे करीत आहे. या दोन्ही मंदिरांची निर्मिती साधारणतः पाच शतकांपूर्वीची असल्याने आणि त्यांचा जिर्णोद्धार होवूनही जवळपास अडीच शतकांहून अधिक काळ लोटलेला असल्याने गेल्या दशकांत या दोन्ही मंदिरांचा पुन्हा जिर्णोद्धार करण्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. मात्र मोठ्या देवीच्या मंदिराचे व्यवस्थापन सार्वजनिक ट्रस्टकडे असल्याने निधीच्या कमतरतेमूळे त्या मंदिराचे काम खोळंबले आणि छोट्या देवीच्या मंदिराने मात्र आघाडी घेतली आणि 2014 साली या मंदिराला पुन्हा झळाळी प्राप्त झाली.
करवीरपीठाचे शंकराचार्य स्वामी विद्यानृसिंह भारती यांच्या प्रमुख उपस्थितीत 18 ते 20 जून 2014 या कालावधीत तिन दिवस चाललेल्या धार्मिक अनुष्ठानातून रेणुकामातेची पाषाणात घडवलेली प्रसन्न मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली. या सोहळ्याला आचार्य रामलखनदास महाराज, महामंडलेश्वर आचार्य अमृतदास महाराज आदींसह जिल्ह्यातील सर्व ठिकाणचे महंत व साधुसंत निमंत्रित होते. वेदमूर्ती ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात झालेल्या या सोहळ्यापूर्वी एक आश्चर्यकारक सत्यही समोर आले. जिर्णोद्धारासाठी जेव्हा रेणुकामातेची मूर्ती हलविण्यात आली तेव्हा ती खंडीत झाली होती. त्यावेळी लक्षात आले की सदरची मूर्ती पाषाणात नव्हे तर विटांचे तुकडे, चुना आणि मातीच्या मिश्रणातून घडवण्यात आली होती. विधीवत त्या मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर नव्याने पाषाणातून घडविलेल्या प्रसन्न मूर्तीची वेद्घोषात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तिन दिवसांच्या या दिव्य सोहळ्याला संगमनेरकरांनीही मोठी गर्दी केली होती.
मोठ्या देवीसह छोट्या देवीच्या पौरोहित्याचे काम गेल्या सात पिढ्यांपासून संगमनेरातील मुळे परिवाराकडे आहे. नरहर नाना, पुरुषोत्तम नाना, वसंतराव भगवंत, दिनकर नरहर यांच्यापासून ते बापू आणि आत्ता स्वप्नील मुळे यांच्यापर्यंतची पिढी हे कार्य अव्याहतपणे करीत आहेत. सोमवंशीय क्षत्रिय समाजातील (स्व.) बाबुरावसा काशिरामसा वडनेरे, (स्व.) बाबुलालसा गणपतसा उकाडे, (स्व.) दत्तात्रयसा चंद्रासा बिल्लाडे, (स्व.) बन्सिलालसा काशिनाथसा बिल्लाडे, (स्व.) बळीरामसा पप्पूसा तवरेज, (स्व.) गंगासा सितारामसा टाक, (स्व.) भाऊशेठसा राघुसा पवार यांच्यापासून ते राजेंद्रसा बळीरामसा तवरेज व जयवंतसा हिरालालसा पवार यांच्यापर्यंतच्या अध्यक्षांनी समाजाच्या ताब्यातील या देवस्थानांची नित्य व्यवस्था ठेवण्यासोबतच त्यांच्या वैभवात भर घालण्याचे आणि संगमनेरच्या या दोन्ही शक्तिपीठांची देखरेख करण्याचे कार्य पार पाडले आहे.
संगमनेर शहरातील कसबा पेठेत (देवीगल्ली) असलेल्या दोन्ही मातांची मंदिरे शक्तिस्थळं म्हणून पुराणातील ग्रंथांमध्ये उल्लेखीत आहेत. या दोन्ही मंदिरांचा इतिहासही सारखाच आणि समकालिन आहे. साधारणतः 80 वर्षांपूर्वी मोठ्या देवीच्या मंदिराचे व्यवस्थापन करण्यासाठी सार्वजनिक न्यासाची स्थापना होवून त्यांच्यामार्फत तेथील सर्व व्यवस्था पाहिली जाते, तर छोट्या देवीच्या मंदिराचे व्यवस्थापन क्षत्रिय समाजाकडे असून सहा वर्षांपूर्वी मंदिराचा जिर्णोद्धार व नूतन मूर्तीचा प्रतिष्ठापना सोहळा करण्यात आला होता. हजारों भाविकांची श्रद्धा असलेल्या या दोन्ही मंदिरांमध्ये सध्या नवरात्रौत्सव सुरु आहे. मात्र मंदिरात प्रवेश देणे शक्य नसल्याने भाविकांनी कोविड नियमांचे पालन करुन मुखदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा.
– जयवंतसा हिरालालसा पवार
अध्यक्ष सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाज, संगमनेर