घारगाव येथील ‘महालक्ष्मी कलेक्शन’ अज्ञात चोरट्यांनी फोडले सुमारे लाख रुपयांच्या वर मुद्देमालाची चोरी; व्यापार्‍यांत भीतीचे वातावरण

नायक वृत्तसेवा, घारगाव
ऐन दीपावलीचा माहोल असताना संगमनेर तालुक्याच्या पठारभागात चोर्‍यांचे सत्र सुरू झाले आहे. घारगाव येथील महालक्ष्मी कापड दुकानाच्या छताचे पत्रे अज्ञात चोरट्यांनी सोमवारी (ता.1) पहाटे उचकटून कपडे चोरून पोबारा केला आहे. यामध्ये लाख रुपयांच्या वर मुद्देमाल चोरीस गेला असल्याची शक्यता दुकानदार सतीष आहेर यांनी व्यक्त केली आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, पठारभागातील गावांची मुख्य बाजारपेठ असलेल्या घारगाव येथील सतीष शिवाजी आहेर यांच्या मालकीचे ‘महालक्ष्मी कलेक्शन’ दुकान आहे. त्यांनी दीपावली सणानिमित्त रविवारीच (ता.31) मुंबईहून माल आणला होता. यामध्ये जिन्स पॅन्ट, टी शर्ट, कॉटन पॅन्ट, लहान मुलांचे कपडे आदी कपड्यांचा सहभाग होता. त्यातच सर्वत्र दीपावलीचा माहोल असताना अज्ञात चोरट्यांनी अंधाराचा फायदा उठविला आहे. दुकानाच्या मागील बाजूस लोखंडी शिडी लावून चोरटे वर चढले आणि पत्रे उचकटून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सुमारे एक लाख रुपयांच्या पुढे मुद्देमाल घेऊन पोबारा केला आहे.

सोमवारी सकाळी दुकानाचे कामगार दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना हा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ ही माहिती दुकानदार सतीष आहेर यांना दिली. पोलिसांनाही ही माहिती मिळताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे. सदर वृत्त लिहेपर्यंत पोलिसांत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. मात्र, ऐन सणासुदीत चोर्‍यांचे सत्र सुरू झाल्याने व्यापार्‍यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

Visits: 5 Today: 1 Total: 29325

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *