नगर जिल्ह्यातही परतले ब्रिटनहून तेेेरा नागरिक; संगमनेरातील एकाचा समावेश..! नव्या स्ट्रेनच्या सावटाखाली तालुक्यातील प्रादुर्भावही कायम, आजही सापडले सतरा रुग्ण.. 

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविडचा प्रादुर्भाव संपलाय असे वाटत असतांना ब्रिटनमधून समोर आलेल्या कोविडच्या नव्या स्ट्रेनमुळे संपूर्ण जगात पुन्हा एकदा भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे ब्रिटनमधून जगभरात होणारी हवाई वाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे. भारतातही 23 डिसेंबर पासून ब्रिटनकडील हवाई सेवा प्रतिबंधित आहे. केंद्र सरकारने 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीत ब्रिटनमधून भारतात परतलेल्या प्रवाशांची शासकीय प्रयोगशाळेत स्राव चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातही या कालावधीत एकूण 13 प्रवासी ब्रिटनहून परतले आहेत. त्यातील प्रत्येकी एक प्रवासी संगमनेर व श्रीगोंदा येथील तर 11 प्रवासी अहमदनगर येथील आहेत. श्रीगोंद्याचा प्रवासी मुंबईतच असून संगमनेर येथील प्रवाशाची पुणे येथे झालेली स्राव चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून दैनिक नायकला प्राप्त झाली आहे.

एकीकडे ब्रिटनमधून समोर आलेला कोविडचा नवा स्ट्रेन जगाला भीती दाखवत असताना, संगमनेरात दररोज सुरू असलेल्या संक्रमणात कोणताही खंड पडलेला नाही. कमी-अधिक प्रमाणात दररोज रुग्ण समोर येण्याचा सिलसिला आजही कायम आहे. गेल्या तीन दिवसात रुग्ण वाढीचा वेग अचानक चढणीला लागून तालुक्याच्या एकूण रुग्ण संख्येत तब्बल 103 रुग्णांची भर पडली होती. आज या चढणीला काहीसा ब्रेक लागला असून आज शहरातील अवघ्या तिघांसह एकूण सतरा जणांचे अहवाल पॉझिटिव प्राप्त झाले आहेत. त्यामुळे तालुका आता 59 व्या शतकाच्या उंबरठ्यावर 5 हजार 897 वर पोहोचला आहे.


थंडीचा हंगाम आणि दिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठांमध्ये ओसंडलेल्या गर्दीचा परिणाम म्हणून नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात कोविड संक्रमणाने पुन्हा एकदा सरासरीची उंची गाठतांना दररोज 36.25 रुग्ण या गतीने तालुक्याची रुग्णसंख्या फुगवली. चालू महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांतही तिच स्थिती कायम राहील्याने हा महिना कोविड संक्रमितांची मोठी संख्या समोर आणणारा ठरेल असेच चित्र दिसत होते.


मात्र सुदैवाने 11 ते 20 डिसेंबर या दहा दिवसांत एकूण सरासरीत तब्बल दहा रुग्ण प्रतिदिवस अशी मोठी घट होवून दैनंदिन 24.2 या वेगाने रुग्णसंख्या वाढत होती. त्यामुळे कोविडचा प्रादुर्भाव आटोक्यात आलाय असे काहीसे चित्र निर्माण झाले होते. मात्र चालू आठवड्यातील पहिल्या चारच दिवसात त्यावर पाणी फेरले गेले आहे. या आठवड्याची सुरुवातच 38 या उच्चांकी रुग्णसंख्येने झाली व त्यात थोडीफार घट होऊन पुढील तीन दिवसांनीही तोच कित्ता गिरवल्याचे दिसत आहे. त्यामुळे दररोजच्या सरासरीतही वाढ झाली असून गेल्या चार दिवसांत सरासरी 30 दराने 120 रुग्णांची भर पडली आहे. या आठवड्याने खालावलेला महिन्याचा आलेखही पुन्हा उंचावला असून गेल्या 24 दिवसांत सरासरी 29.12 रुग्णगतीने 699 बाधितांची भर पडली आहे. ही गोष्ट निश्‍चितच चिंता वाढवणारी आहे.

आज आढळलेल्या रुग्णांमध्ये शहरातील गणेश नगर मधील 47 वर्षीय इसम आणि मालदार रोडवरील 58 व 36 वर्षीय महिलांचा समावेश आहे. याशिवाय ग्रामीण भागातील मुधळवाडी येथील 40 वर्षीय तरुण, आंबी खालसा येथील 30 वर्षीय तरुण, चिंचपूर येथील 80 वर्षीय महिला, निमगाव जाळी येथील 54 वर्षीय महिला, प्रतापपूर येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, लक्ष्मी नगर येथील 50 वर्षीय इसमासह 45 वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, घुलेवाडी येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 60 वर्षीय महिला व 13 वर्षीय मुलगी, अकलापुर येथील 58 वर्षीय इसम, वडगाव लांडगा येथील 35 वर्षीय तरुण आणि जवळेकडलग घेतील 77 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. दिलासादायक म्हणजे तालुक्याच्या रुग्णसंख्येत गेल्या तीन दिवसाच्या तुलनेत आज निम्म्याने घट झाल्याने तालुक्याच्या सरासरीचा वेग किंचित थबकला आहे. आजच्या रुग्णवाढीने तालुका  59 व्या शतकाच्या उंबरठ्यावर 5 हजार 897 वर पोहोचला आहे.

बुधवारी आढळले 33 रुग्ण !
बुधवारी (ता.23) शहरातील अकरा जणांसह तालुक्यातील 33 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले होते. त्यात शहरातील सुकेवाडी रोडवरील 28 वर्षीय तरुण, घोडेकर मळा भागातील 50 व 48 वर्षीय इसमांसह 28 वर्षीय तरुण, 25 व 24 वर्षीय महिला आणि पाच व एक वर्षीय बालिका, गणेशनगरमधील 84 वर्षीय महिलेसह 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिक आणि भारतनगरमधील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.


त्यासोबतच ग्रामीण भागातील रहिमपूर येथील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, आश्‍वी बु. येथील 29 वर्षीय तरुण, आश्‍वी खुर्दमधील 46 व 40 वर्षीय इसम, कोकणगाव येथील 48 वर्षीय इसमासह 41 वर्षीय महिला, चिंचपूर येथील 57 वर्षीय इसम, खळी येथील 45 व 28 वर्षीय महिला, निमज येथील 45 व 39 वर्षीय तरुणासह 35 वर्षीय महिला, मंगळापूर येथील 27 वर्षीय तरुण, रायतेवाडी येथील 50 वर्षीय इसम.


घुलेवाडी येथील 44 व 31 वर्षीय तरुणांसह 40 व 32 वर्षीय महिला, राजापूर येथील 35 वर्षीय महिला, गुंजाळवाडीतील 25 वर्षीय तरुण व मांडवे बु. येथील 33 वर्षीय महिला अशा 22 जणांसह एकूण 33 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. त्यामुळे बुधवारीच संगमनेर तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 5 हजार 880 झाली होती. आज त्यात 38 रुग्णांची भर पडल्याने तालुक्याने बाधितांचे एकोणसाठावे शतक ओलांडतांना 5 हजार 880+ रुग्णसंख्या गाठली आहे.

इंग्लंडमधील कोरोनाविषाणू मध्ये झालेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर त्या देशातून मायदेशात परत आलेल्या प्रवाशांच्या सर्वेक्षणासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार दिनांक 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीत इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण केले जात आहे. जिल्ह्यात या कालावधीत इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांंनी स्वतःहून माहिती देऊन जिल्हा सामान्य रुग्णालय येथे चाचणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.

दिनांक 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या काळात ब्रिटनहून अहमदनगर जिल्ह्यात परतलेल्या प्रवाशांची यादी विमानतळ प्राधिकरणाकडून जिल्हा व महापालिका प्रशासनाला प्राप्त झाली आहे. त्यातून या कालावधीत इंग्लंडहून जिल्ह्यात एकूण 13 प्रवासी परतल्याचे समोर आले आहे. यातील 11 जण अहमदनगर शहरातील, एक जण संगमनेर येथील तर एक जण श्रीगोंदा येथील आहे. श्रीगोंदा येथील प्रवासी अद्यापही मुंबई येथे आहे. तर संगमनेरातील प्रवाशाची पुणे येथे स्राव चाचणी करण्यात आली होती. ती निगेटिव्ह आल्याची माहिती दैनिक नायकच्या सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

इंग्लंडहून परतलेल्या प्रवाशांची शासकीय प्रयोगशाळेत स्राव चाचणी करणे बंधनकारक आहे. या चाचणीमध्ये बाधित आढळलेल्या रुग्णांचे नमुने जनुकीय चाचणीसाठी पुण्यातील लष्करी रुग्णालयाकडे पाठविण्यात येणार आहेत. या तपासणीतून सदर विषाणू इंग्लंडमधील नवीन स्ट्रेनशी मिळताजुळता आहे का याची माहिती मिळेल. जे प्रवासी निगेटिव आढळतील त्यांचा पाठपुरावा ते भारतात परतल्या पासून पुढील 28 दिवस करण्यात येईल. यापैकी जे रुग्ण स्राव चाचणीत पॉझिटिव येतील त्यांना इतर कोविड रुग्णांपेक्षा वेगळ्या आयसोलेशन केंद्रांमध्ये ठेवण्यात येईल. त्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना संस्थात्मक विलगीकरण ठेवण्यात येईल. संपर्कात आलेल्या अशा व्यक्तींची संपर्कात आल्यापासूनच्या पाच ते दहाव्या दिवसाच्या दरम्यान शासकीय प्रयोगशाळेत चाचणी करण्यात येईल. 25 नोव्हेंबर नंतर इंग्लंडहून दाखल झालेल्या प्रवाशांनी स्वतःहून जिल्हा सामान्य रुग्णालय येथे संपर्क साधून या सर्वेक्षणात सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा रुग्णालय, जिल्हा प्रशासन, नगरपालिका प्रशासन व महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Visits: 273 Today: 1 Total: 1420465

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *