… अन् ‘ऑपरेशन शिफ्टिंग’ राबवून सतरा रुग्णांचे वाचवले प्राण! साईसंस्थानच्या कोविड रुग्णालयातील प्रकार; प्राणवायूची आणीबाणी
नायक वृत्तसेवा, शिर्डी
‘काळ आला होता; पण वेळ आली नव्हती,’ या म्हणीचा प्रत्यय मंगळवारी (ता.27) साईसंस्थानच्या कोविड रुग्णालयात आला. ऑक्सिजनअभावी 17 रुग्णांचा श्वास थांबण्याची वेळ आली; मात्र रात्र जागून काढत, युद्धपातळीवर ‘ऑपरेशन शिफ्टिंग’ राबवून या रुग्णांना सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलविण्यात आले. कोविड संकटात मायबाप सरकारला तब्बल 51 कोटी रुपयांची देणगी देणार्या साईसंस्थानवर हा प्रसंग गुदरला तर सामान्यांची काय कथा, याचीच प्रचिती आली.
ऑक्सिजनअभावी रात्री एवढे रामायण घडूनही काल अवघे चार ऑक्सिजन सिलिंडर मिळाले. रोज शंभर रेमडेसिविर इंजेक्शनची गरज असताना गेल्या चार दिवसांत सरासरी अकरा मिळाले. जिल्ह्यात सर्वाधिक कोविड रुग्णांवर उपचार करणार्या आणि त्यासाठी सर्वांत मोठी यंत्रणा उभारणार्या साईसंस्थानची उपेक्षाच सुरू आहे. येथे सहाशेहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. धर्मशाळेत उपचार घेत असलेल्या रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने त्यांचा जीव टांगणीला लागला. सुपर स्पेशालिटी रुग्णालयात त्यांच्यासाठी युद्धपातळीवर वॉर्ड उभारून ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली. संस्थानच्या रुग्णालयात ऑक्सिजनचे 120, तर व्हेंटिलेटर सुविधा असलेले वीस बेड आहेत.
संगमनेर येथून होणारा ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला. नगर येथून आणायचा, तर तेथेही आपापल्या मतदारसंघात ऑक्सिजन नेण्यासाठी लोकप्रतिनिधी आग्रही आहेत. त्यामुळे संस्थानसाठी आग्रह धरायचा कुणी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
साईसंस्थानचे रुग्णालय हा सर्वसामान्य कोविड रुग्णांना एकमेव आधार आहे. सध्याच्या संकटात तेथे सर्वाधिक रुग्णसंख्या आणि उपचार मोफत आहेत. किमान धर्मशाळेतील रुग्णालयासाठी पुरेसा ऑक्सिजन पुरवठा आणि पुरेशी रेमडेसिविर इंजेक्शन मिळायला हवीत.
– डॉ.राजेंद्र पिपाडा (भाजप नेते)