संगमनेर तालुक्यातील कोविड वाढीची सरासरी अवघ्या आठवर! नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात मिळाला मोठा दिलासा, रुग्णसंख्या जुलैपेक्षा निम्म्याहून कमी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्यावर्षी एप्रिलमध्ये तालुक्यात पाय रोवणार्‍या कोविडच्या विषाणूंचा दहा महिन्यांच्या लढाईनंतर संगमनेरकरांनी जवळपास पराभव केल्याचे चित्र सध्या दिसत आहे. अर्थात तालुक्यात अद्यापही कोविडचे संक्रमण पूर्णपणे थांबलेले नाही, मात्र गेल्या दहा महिन्यांचा विचार करता या जीवघेण्या विषाणूंची इतकी मोठी माघार पहिल्यांदाच घडल्याने या महामारीने धास्तावलेल्या संगमनेरकरांचे चेहरे सुखावले आहेत. गेल्या संपूर्ण महिन्यात तालुक्याची दरोजची सरासरी रुग्णवाढ कमालीची घसरली असून महिन्याभरात तालुक्यात सरासरी 7.77 वेगाने अवघ्या 241 रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यातील आजवरची एकूण रुग्णसंख्या 6 हजार 282 असून आत्तापर्यंत पन्नास जणांचे बळी गेले आहेत.

अनिश्चितता, अपूर्ण माहिती, नवा विषाणू आणि संसर्गातून तीव्र गतीने पसरणार्‍या कोविड 19 या महामारीने मार्चमध्ये भारतात पाऊल ठेवले. 22 मार्च रोजी देशात ‘जनता कर्फ्यू’ लावला गेला आणि त्यांनतर लागलीच टाळेबंदी घोषीत झाली. रस्ते निर्मनुष्य झाले, मात्र त्यामुळे या महामारीचा विषाणू थोपवला जावू शकला नाही. जीवनावश्यक वस्तु असो, अथवा सुख-दुःखाचे कार्यक्रम. संबंध अबाधित ठेवण्यासाठी माणसं संसर्गाकडे दुर्लक्ष करुन कार्यक्रमांना हजेरी लावू लागले आणि सोबतीला विषाणूंना घेवून जावू लागले. त्यामुळे एप्रिलमध्ये कोण्या धार्मिक कार्यक्रमातून हा विषाणू संगमनेरात पोहोचला आणि येथूनच त्याचा तालुक्यातील प्रवास सुरु झाला.

24 एप्रिलपासून ते 24 मे पर्यंत संपूर्ण राज्य टाळेबंदीत होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने काही उद्योग, काही व्यवसाय सुरू झाले आणि नागरिकांना कोविडसोबत जगण्याच्या वारंवार सूचनाही येवू लागल्या. तोवर या महामारीवर सध्यातरी कोणताही उपचार नसल्याचेही जगभरातून समोर आले. मात्र तरीही त्याचा भारतीय नागरिकांवर फारसा परिणाम झाला नाही. त्यामुळे टाळेबंदी आणि त्यानंतरच्या कठोर निर्बंधाचा सुरुवातीचा एप्रिल, मे आणि जूनचा कालावधी वगळता तालुक्यात कोविडचा फुगा फुगतच गेला. तो आजच्या स्थितीत थेट 6 हजार 282 रुग्णसंख्येवर जावून पोहोचला. या कालावधीत कोविड संशयित म्हणून चाचणीपूर्व मृत्यू झालेल्यांची संख्या सुमारे चारशेहून अधिक तर अधिकृत कोविड मृत्यू झालेल्यांची संख्या 50 नोंदविली गेली. या आकडेवारीतून ही महामारी किती भयानक होती याचा सहज अंदाज येईल. केंद्र व राज्य सरकारांनी केलेले नियोजन आणि ठिकठिकाणच्या स्थानिक प्रशासनांनी महामारीशी लढण्याचा कोणताही पूर्वानुभव नसताना, कोणत्याही मार्गदर्शक सूचना नसतांनाही अधिकाधिक नागरिकांना संक्रमण होण्यापासूनही वाचवले आणि अनेकांचे नाहक बळी जाण्यापासूनही वाचवले.

दिवाळीनंतर दुसरी लाट येण्याच्या वृत्ताने तर अवघा तालुका हादरला होता. मात्र प्रत्यक्षात दिवाळीच्या महिन्यापेक्षाही डिसेंबरमधील रुग्णगती खालावल्याने दुसर्‍या लाटेची भिती मागे सरण्यासोबतच कोवीशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या भारत निर्मित दोन लस बाजारात येण्याची घोषणा झाली, आणि जवळपास नऊ महिने मनात भीती बाळगून वावरणार्‍या नागरिकांच्या मनात जणू ऊर्जेचा संचार झाला. सध्या कोविड योद्ध्यांचे लसीकरण सुरु असून लवकरच सामान्य नागरिकांसाठी ती उपलब्ध होणार आहे. मात्र या प्रवासात कोविडच्या संक्रमणाचा सरासरी वेगही खालावत गेल्याने आजच्या स्थितीत सलग नऊ महिने नागरिकांना भीती दाखवणार्‍या कोविडचा जवळपास पराभव झाल्याचे दिसत आहे.

गेल्या वर्षीच्या शेवटच्या महिन्यात डिसेंबरमध्ये तालुक्यातील रुग्णवाढीचा सरासरी दर 26.32 इतका होता. या गतीने तालुक्याच्या रुग्णसंख्येत एकूण 816 रुग्णांची भर पडली होती. नूतन वर्षातील जानेवारीमध्ये हिच सरासरी राहील असा अंदाज असतांना कोविडने मात्र आश्चर्यकारक माघार घेतल्याचे चित्र दिसले. जानेवारीच्या पहिल्या दहा दिवसांत दररोज सरासरी 12.6 रुगण या गतीने 126 (शहरी 40), दुसर्‍या दहा दिवसांत 7.3 रुग्णगतीने 73 (शहरी 10) व शेवटच्या अकरा दिवसांत अवघ्या 3.82 या सरासरीने 42 (शहरी 23) एकूण 241 रुग्णांची भर पडली. विशेष म्हणजे सुरुवातीचा अपवाद वगळता उर्वरीत कालावधीत मोठी रुग्णसंख्या समोर येणार्‍या तालुक्याच्या ग्रामीणभागातील रुग्णगतीही जानेवारीत अवघ्या 5.42 टक्क्यांवर आल्याने व याच महिन्यात तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकाही विक्रमी मतदानासह पार पडल्याने तालुक्याने कोविडचा पराभव केल्याचे दिलासादायक चित्र सध्या संगमनेरात बघायला मिळत आहे.

अशी वाढली तालुक्यातील रुग्णसंख्या..
एप्रिल एकूण 08 (शहरी 7 व ग्रामीण 01), मे एकूण 36 (शहरी 15 व ग्रामीण 21), जून एकूण 65 (शहरी 42 व ग्रामीण 23), जुलै एकूण 650 (शहरी 269 व ग्रामीण 381), ऑगस्ट एकूण 961 (शहरी 341 व ग्रामीण 620), सप्टेंबर एकूण 1 हजार 529 (शहरी 289 व ग्रामीण 1 हजार 240), ऑक्टोबर एकूण 1 हजार 41 (शहरी 209 व ग्रामीण 832), नोव्हेंबर एकूण 908 (शहरी 261 व ग्रामीण 647), डिसेंबर एकूण 816 (शहरी 198 व ग्रामीण 618) आणि जानेवारी 2021 मध्ये एकूण 241 (शहरी 73 व ग्रामीण 168) अशा पद्धतीने एप्रिलपासून ते जानेवारीपर्यंत तालुक्याच्या रुग्णसंख्येचा आलेख चढत गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *