अकोले पोलिसांनी टिटवाळ्यातून चोरट्याच्या आवळल्या मुसक्या चोरी गेलेल्या मुद्देमालापैकी 1 लाख 5 हजारांचा मुद्देमाल केला जप्त

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील घोडसरवाडी (समशेरपूर) येथून दुचाकी व दागिने चोरुन पसार झालेल्या आरोपीच्या टिटवाळा (ता.कल्याण, जि.ठाणे) येथून अकोले पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून 1 लाख 85 हजार रुपयांच्या चोरी गेलेल्या मुद्देमालापैकी 1 लाख 5 हजाराचा मुद्देमालही जप्त केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली सविस्तर हकीगत अशी की, 13 एप्रिल, 2022 रोजी दुपारी साडेतीन ते साडेचार वाजेच्या सुमारास घोडसरवाडी येथील मनोज सोपान घोडसरे यांच्या राहत्या घरापासून श्रावण किसन बरमाडे याने दुचाकी, रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा 1 लाख 85 हजारांचा मुद्देमाल चोरुन पोबारा केला होता. याबाबत अकोले पोलिसांत श्रावण बरमाडे याच्याविरोधात गुरनं.150/2022 भादंवि कलम 381 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

या गुन्ह्याच्या तपासाकरीता एक पोलीस पथक तयार करुन तत्काळ शनिवारी (ता.16) टिटवळा (ता.कल्याण, जि.ठाणे) येथे पाठविले. तेथे आरोपीच्या ठावठिकाणाबाबत माहिती घेवून सापळा लावला. त्या सापळ्यात आरोपी श्रावण किसन बरमाडे (वय 38, रा.सिद्धीविनायक चाळ, कोलशेत रोड, आझादनगर, जि.ठाणे) अडकला. त्यास दाखल गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर अटक करुन न्यायालयाकडून पोलीस कोठडी घेतली यात त्याने चोरी केलेली रोख रक्कम, सोन्याचे दागिने व दुचाकी असा एकूण 1 लाख 5 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भूषण हंडोरे, पोलीस नाईक रवींद्र वलवे, फुरकान शेख, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश गोडगे, सुयोग भारती, आनंद मैड, संदीप भोसले यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस नाईक वलवे हे करीत आहे.
