एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी तिघांच्या आत्महत्या! संगमनेरच्या इतिहासातील धक्कादायक दिवस; दोन प्रकरणांत सातजणांवर गुन्हा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहराच्या इतिहासात मंगळवारचा दिवस अतिशय धक्कादायक ठरला. या एकाच दिवसात शहराच्या वेगवेगळ्या भागात राहणार्‍या तिघांनी गळफास घेत आत्महत्या केली. यातील एका प्रकरणात जमिनीच्या अपूर्ण व्यवहारातून वारंवार होणार्‍या वादाला वैतागून बेकरी व्यावसायिकाने तर मुलीचे फोटो जावयाला पाठवल्याचा आरोप करीत पाचजणांनी मारहाणीसह जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने एका तरुणाने नदीकाठी जावून झाडाला गळफास घेतला. या दोन्ही प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सातजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. तर तिसर्‍या घटनेत पावबाकीत राहणार्‍या 21 वर्षीय तरुणीनेही गळफास घेतल्याने तिचा मृत्यू झाला, मात्र तिच्या आत्महत्येमागील कारण अद्यापही अस्पष्ट आहे. एकाच दिवशी घडलेल्या या तिनही घटनांनी शहरात एकच खळबळ उडाली असून किरकोळ कारणावरुन दोघा कुटुंब प्रमुखांचा हकनाक बळी गेल्याने हळहळही व्यक्त केली जात आहे.


या धक्कादायक घटनांमधील पहिल्या प्रकरणात पानसरे आखाड्यात राहणार्‍या रामअवतार रामपत गुप्ता या बेकरी व्यावसायिकाचा बळी गेला. या प्रकरणी त्यांचा 23 वर्षीय मुलगा अविनाश याने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार दोन वर्षांपूर्वी त्यांनी कोल्हेवाडी रोडवरील किसन सखाराम काळे यांच्याकडून 25 लाख रुपयांमध्ये चार गुंठे जागा विकत घेतली होती, मात्र जमिनीचा ताबा घेण्यापूर्वीच त्यांनी ती जमिन परवेज अन्वर खान व मोहम्मद मुज्जमील मोहम्मद सलीम मोमीन या दोघांना 24 लाखांत विकण्याचे ठरवून त्यापोटी साडेसहा लाख रुपयांची आगाऊ रक्कमही घेतली. त्यावरुन मूळ जागा मालक असलेल्या किसन काळे यांच्यासह त्यांचा मुलगा बाळू उर्फ रविंद्र असे दोघे मिळून गुप्ता यांना शिवीगाळ व दमबाजी करु लागले, चार गुंठे नव्हेतर सव्वातीन गुंठेच जागा दिल्याचे सांगू लागले.


त्या दोघांमधील वाढता वाद पाहून गुप्ता यांच्याकडून जागा घेणार्‍या खान व मोमीन यांनी मध्यस्थाकरवी आपला व्यवहार रद्द करुन त्रयस्थ महिलेला ती जागा विकली. मात्र या परस्पर घडामोडींमधून बसलेला आर्थिक फटका आणि मूळजागा मालकाकडून फसवणूक झाल्याच्या भावनेसह त्यांच्या मानसिक छळाला वैतागलेल्या रामअवतार गुप्तांनी टोकाचा निर्णय घेतला. सोमवारी सकाळी 11 वाजता नेहमीप्रमाणे बेकरीवर जातो असे सांगून ते घराबाहेर पडले आणि दिवसभर गायब राहीले. सायंकाळी त्यांनी आपल्या मुलांसह काही मित्रांच्या मोबाईलवर व्हिडिओ संदेश पाठवून वरील कारण सांगून त्या दोघांनी आपणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे सांगितले. त्यानंतर शोध घेवूनही त्यांचा कोठेही थांगपत्ता लागला नाही, मात्र मंगळवारी सकाळीच निंबाळे शिवारातील नदीपात्रालगत झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी किसन सखाराम काळे व त्यांचा मुलगा बाळू उफ रविंद्र या दोघांवरही आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भारतीय न्यायसंहितेच्या कलम 108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अशाचप्रकारच्या मात्र काहीशा वेगळ्या प्रकरणातही एका घरातील कर्त्या तरणाबांड तरुणाला आपली जीवनयात्रा संपवावी लागली. संगमनेरातील एका खासगी उद्योगात तांत्रिक काम करणार्‍या राजापूरच्या अल्ताफ भैय्या पठाण या तरुणानेही मंगळवारी सकाळी शिवारातील म्हाळुंगी नदीपात्रालगतच्या झाडाला गळफास बांधून आत्महत्या केली. या प्रकरणी मयताची आई समिना पठाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गेल्या गुरुवारी (ता.1) अल्लाउद्दिन महेमूद पटेल, आझीम मुनवर शेख (काल्या), नाझीम मुनवर शेख (बड्या), बीचू आज्जू व नावेद पठाण (सर्व रा.कुरण) या पाचजणांनी त्यांच्या घरात घुसून मयत अल्ताफ याने त्यांच्या जावयाला त्यांच्या मुलीचे फोटो पाठवल्याचा आरोप करीत बेदम मारहाण केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.


तेव्हापासून तणावाखाली असलेला अल्ताफ मंगळवारी (ता.6) सकाळी आठ वाजता आपण त्या पाच जणांविरोधात आज पोलीस ठाण्यात जावून तक्रार देवू असे सांगत घराबाहेर पडला. साडेदहा वाजून गेल्यानंतरही तो परतला नाही, त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला असता तो लगत म्हाळुंगी नदीच्या पात्रातील एका झाडाला गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळून आला. मयत तरुणाचा गेल्यावर्षीच विवाह झाला होता, त्याला दोन महिन्यांची मुलगी आहे. या प्रकरणात वरील पाचजणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे. दखलपात्र असलेल्या या कलमान्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना कोठडीत घेवून तपास केला जातो. त्यामुळे या सातही जणांवर अटकेची टांगती तलवार आहे.


यातील तिसर्‍या प्रकरणात सुकेवाडी शिवारातील पावबाकीत राहणार्‍या गौरी आदेश सातपुते या 21 वर्षीय तरुणीने घरात गळफास घेवून आत्महत्या केली. तिला अत्यवस्थ अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून जाहीर करण्यात आले. या प्रकरणी सदरील रुग्णालयाच्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अद्याप कोणीही तक्रारदार समोर आला नसल्याने आत्महत्येमागील कारणही अजून अस्पष्ट आहे. मात्र एकाच दिवशी घडलेल्या तीन वेगळ्या ठिकाणच्या या घटनांनी संपूर्ण तालुक्यात खळबळ उडवली असून त्यात दोघा कर्त्या गृहस्थांचा बळी गेल्याने हळहळही व्यक्त होत आहे.


आर्थिक अथवा नैतिक कारणांनी वाढणारा ताण, होणारे आरोप असह्य झाल्याने त्याचा मुकाबला करुन मार्ग काढण्याचे सोडून थेट नैराश्याच्या गर्तेत अडकून आत्महत्येचा मार्ग निवडण्याचे प्रकार हल्ली वाढीस लागले आहेत. कोणत्याही समस्येवर हमखास तोडगा असतोच हे माहित असतानाही काही क्षणांसाठी न्यूनतम पातळीवर घसरलेल्या नैराश्याला बळी पडून जीव देण्यासारखे टोकाचे पाऊल उचलण्याचे असे वाढते प्रकार समाजाला चिंतन करायला लावणारे आहेत. अशा घटनांमधून माणूस परिस्थितीशी संघर्ष करण्यापासून, संकटाचा धैर्याने सामना करण्यापासून दूर चाललाय की काय अशीही शंका एकाच दिवशी घडलेल्या या तिनही घटनांमधून अधोरेखीत होत आहे.

Visits: 2 Today: 2 Total: 2184330

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *