आशियाई स्पर्धेत गणेशवाडीच्या शिवम लोहकरेला रौप्यपदक भालाफेकीत नीरज चोप्रानंतर पदक जिंकणारा शिवम पहिलाच खेळाडू

नायक वृत्तसेवा, नेवासा
दक्षिण कोरियातील येचॉन येथे सुरू असलेल्या आशियाई ज्युनिअर अॅथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन खेळाडूंनी भारताला एक रौप्य व एक कांस्यपदक मिळवून दिले. त्यात अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील गणेशवाडीच्या शिवम लोहकरेने भालाफेकीत रौप्य जिंकले; तर कांस्यपदक जिंकणार्या भारतीय संघात सातारच्या अनुष्का कुंभारचा समावेश होता.

नेवासा तालुक्यातील गणेशवाडी, सोनई गावच्या 19 वर्षीय शिवमने पहिल्याच प्रयत्नात 72.34 मीटर अंतरावर भाला फेकला. सुवर्णपदकासाठी त्याची लढत तायपईच्या चाओ हुंगसोबत होती. चाओने 72.85 मीटर अंतरावर भाला फेकून सुवर्णपदक निश्चित केले; तर शिवमला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 2016 च्या स्पर्धेत नीरज चोप्राने रौप्यपदक जिंकले होते. त्यानंतर भालाफेकीत पदक जिंकणारा शिवम भारताचा पहिलाच खेळाडू होय. सुरुवातीला प्रशांत वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली भालाफेकीचे धडे गिरवल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून तो पुण्यात माजी आंतरराष्ट्रीय भालाफेकपटू काशिनाथ नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.

शिवमने यंदा तिरुवनमलाई येथे झालेल्या ज्युनिअर फेडरेशन करंडक स्पर्धेत 73.82 मीटर अंतरावर भाला फेकून सुवर्ण जिंकले होते. भारताला आज सिद्धार्थ चौधरीने गोळाफेकीत सुवर्णपदक मिळवून दिले. त्याने आपल्या तिसर्या प्रयत्नात 19.52 मीटर अंतरावर गोळा फेकला व सुवर्ण जिंकले. दुसर्या दिवशी भारतीय खेळाडूंनी सहा पदके जिंकली.
