पायी दिंडीत कंटेनर घुसविणार्‍या चालकाला तीन वर्ष कारावास! संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल; घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दितील घटना..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरुन चाललेल्या दिंडीत मालवाहू कंटेनर घुसवून पायी जाणार्‍या वारकर्‍यांना चिरडल्याच्या गंभीर प्रकरणात संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी चालकाला विविध कलमांतर्गत कारावासाची शिक्षा सुनावली. या अपघातात आठ वारकर्‍यांना कंटेनरने धडक देत चिरडले होते, तर सुमारे 15 ते 16 वारकरी गंभीर जखमी झाले होते. तीन वर्षांपासून सुरु असलेल्या या खटल्यात न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे.


तीन वर्षांपूर्वी घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास हा भीषण अपघात घडला होता. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 वरील खंदरमाळवाडी शिवारात पायी जाणार्‍या दिंडीत एक कंटेनर घुसला. कंटेनरने दिंडीमध्ये पायी चालणार्‍या वारकर्‍यांना धडक दिल्यानंतर तो पलटी होऊन पुढे आदळला. या दुर्घटनेत अनेक वारकरी गंभीर जखमी झाले होते. घटनेनंतर नागरिकांनी कंटेनर चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते.


या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात सदोष मनुषहत्येसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास पूर्ण करुन आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. तत्कालीन पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता डॉ.रेश्मा जाधव यांनी प्रभावी युक्तिवाद केला. सुनावणीदरम्यान फिर्यादी, साक्षीदार, पंच तसेच तपासी अंमलदार यांच्या साक्षी आणि सरकारी पक्षाने सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी छोटेलाल आलमू पाल याला दोषी ठरविले.


न्यायालयाने भारतीय दंडसंहितेच्या कलम 304 अंतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास, कलम 279 अंतर्गत चार महिने, कलम 337 अंतर्गत सहा महिने आणि कलम 338 अंतर्गत एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसारही कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. या खटल्याचे कामकाज सरकार पक्षाच्यावतीने अभियोक्ता डॉ.रेश्मा जाधव यांनी पाहिले. सहाय्यक फौजदार प्रवीण जाधव, सहाय्यक फौजदार सुरेश कदम आणि घारगाव पोलीस ठाण्यातील संबंधित पोलिस कर्मचार्‍यांनी खटल्याच्या कामकाजासाठी सहकार्य केले.

Visits: 15 Today: 15 Total: 2184336

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *