अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्यास तीन वर्षांचा कारावास! पाच वर्षांपूर्वी खंडेरायवाडीत घडला होता प्रकार; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन तिला दमदाटी व धमकी देणार्या तरुणाला संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षांची सक्तमजुरी व पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्याचा आदेशही जिल्हा न्यायाधीश आर.आर.कदम यांनी दिला आहे. सदरची घटना पाच वर्षांपूर्वी पठारावरील खंडेरायवाडी येथे घडली होती. या प्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक दिलीप निघोट यांनी सखोल तपास करुन आरोपी आदेश भाऊसाहेब चाचण याच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते.

सन 2017 मध्ये तालुक्याच्या पठारावरील खंडेरायवाडीतील आरोपी आदेश चाचण याने गावातीलच एका सतरावर्षीय मुलीचा विनयंभंग केला होता. याबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याचीही धमकीही त्याने पीडितेला दिली होती. सदरची बाब पीडितेने तिच्या घरी सांगितल्यानंतर या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात आरोपी चाचण याच्याविरोधात भा.द.वी.354 (अ), 504, 506 तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्या कायद्याचे (पोक्सो) कलम 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. घारगावचे तत्कालीन पोलीस निरीक्षक दिलीप निघोट यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करुन संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

जिल्हा न्यायाधीश आर.आर.कदम यांच्या समोर झालेल्या सुनावणीत सरकारपक्षाकडून सहा साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणात पीडितेने न्यायालयासमोर दिलेला जवाब आणि प्रत्यक्ष घटना पाहणार्यांनी दिलेली साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. या प्रकरणात सरकारी वकील बी.जी.कोल्हे
यांनी हाती असलेल्या पुराव्यांसह जोरदार युक्तीवाद केला. तो ग्राह्य धरताना न्यायालयाने आरोपी आदेश भाऊसाहेब चाचण याला भा.दं.वि. कलम 354 (अ) नुसार दोषी धरतांना दोन वर्षांची सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिन्यांची साधी कैद, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्या कायद्याचे कलम 8 नुसार तीन वर्षांची सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिन्यांची शिक्षा सुनावली. या शिक्षेतून वसुल होणारा दंड पीडितेला देण्याचा हुकूमही न्यायालयाने दिला. या प्रकरणात सरकारी वकील बी.जी.कोल्हे यांना पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलीस काँस्टेबल स्वाती नाईकवाडी, दीपाली दवंगे, सहाय्यक फौजदार सुनील सरोदे, कैलास कुर्हाडे, पोहेकॉ.प्रवीण डावरे यांची मदत केली. या निकालाकडे पठारभागातील नागरिकांचे लक्ष लागून होते. या प्रकरणात आरोपीला शिक्षा झाल्याने पीडितेसह तिच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले आहे.

