अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार! जाब विचारणार्या आईलाही धमकी; डिजिटल युगात पालकांच्या चिंतेत भर..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना आज बुधवारी (ता.15) पहाटे उघडकीस आली. या प्रकरणात अस्वस्थ करणारी बाब म्हणजे मुलीचा शोध घेत घटनास्थळी पोहोचलेल्या आईने सदरचा धक्कादायक प्रकार पाहिल्यानंतर आरोपीला जाब विचारला असता त्याने उलट त्यांनाच दमदाटी करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी आरोपी गणेश चंद्रभान गायकवाड यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यातील कलमांनुसार गुन्हा दाखल करुन आरोपीला गजाआड केले आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात संताप निर्माण झाला असून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेबाबत पालकांच्या चिंताही वाढल्या आहेत.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील पीडित मुलीच्या 33 वर्षीय आईने दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवारी रात्री पीडितेचे कुटुंबीय नेहमीप्रमाणे जेवण करुन झोपले होते. आज बुधवारी (ता.15) पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास संबंधित महिलेला जाग आली असता तिची 15 वर्षीय मुलगी बिछान्यावर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सुरुवातीला मुलगी नैसर्गिक विधीसाठी घराबाहेर गेली असावी, असा त्यांचा समज झाला. मात्र बराच वेळ उलटूनही ती परत न आल्याने त्यांच्या मनात शंका निर्माण झाली.

ग्रामीण भाग असल्याने अंधारात विविध शक्यता त्यांच्या मनात येऊ लागल्या. परिसरात शोध घेत असताना त्या घरालगतच्या शेताच्या दिशेने गेल्या. तेथे मुलगी आणि आरोपी एकत्र असल्याचे त्यांना दिसून आले. घडत असलेल्या प्रकाराचा जाब त्यांनी आरोपीला विचारला असता, त्याने आक्रमक भूमिका घेत पीडित मुलीला आईकडे जाऊ नकोस, तसेच कोण काय करते ते मी पाहतो, अशा आशयाची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे पीडित आई हादरुन गेली.

सकाळ होताच संबंधित महिलेने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात धाव घेत संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन पीडितेचे जबाब, वैद्यकीय तपासणी आणि अन्य पुराव्यांच्या आधारे आरोपी गणेश चंद्रभान गायकवाड याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या कलम 64, 351(2) तसेच पोक्सो कायद्यातील कलम 4, 6, 8 व 12 अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे करीत आहेत.

या घटनेने तालुक्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून अल्पवयीन मुलांच्या अज्ञानाचा किंवा विश्वासाचा गैरफायदा घेणार्या आरोपींविरोधात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे. बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये जलदगतीने तपास पूर्ण करुन दोषींना कठोर शिक्षा मिळणे आवश्यक असल्याची भावनाही व्यक्त होत आहे.

अल्पवयीन मुलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांकडे केवळ गुन्हा म्हणून पाहून चालणार नाही, तर त्यामागील सामाजिक कारणांचाही गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आज शिक्षण, माहिती आणि संवादासाठी मोबाईल व इंटरनेट अपरिहार्य झाले असले, तरी त्याच माध्यमांद्वारे अल्पवयीन मुलांपर्यंत अयोग्य मजकूरही सहज पोहोचत आहे. परिणामी, अनेक मुला-मुलींमध्ये शारीरिक आकर्षण, नातेसंबंध आणि लैंगिकतेबाबत अपुरी किंवा चुकीची माहिती पोहोचत असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. त्यामुळे पालकांच्या जबाबदार्या अधिक वाढल्या असून अशा घटना चिंता वाढवणार्या आहेत.

मुलांना मोबाईल देणे ही समस्या नाही, परंतु त्याच्या वापरावर कोणतेही नियंत्रण नसणे ही चिंतेची गोष्ट आहे. पालकांनी मुलांच्या ऑनलाईन सवयी, मित्रपरिवार, सोशल मीडियावरील संपर्क आणि वागणुकीतील बदल यावर लक्ष ठेवण्याबरोबरच त्यांच्याशी विश्वासाचे नाते निर्माण करणे अधिक महत्त्वाचे आहे. शाळा, पालक आणि समाज या तिन्ही घटकांनी बालसुरक्षा, ‘गुड टच-बॅड टच’, इंटरनेट सुरक्षितता आणि कायदेशीर परिणाम याबाबत सातत्याने जनजागृती करणे आजची गरज बनली आहे.

अल्पवयीन मुलांशी संबंधित प्रत्येक घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसते, तर तो संपूर्ण समाजासाठी इशारा असतो. त्यामुळे अशा गुन्ह्यांमध्ये दोषींना कठोर शिक्षा होण्याबरोबरच प्रतिबंधात्मक उपाययोजना, पालकांचे मार्गदर्शन आणि मुलांमध्ये योग्य मूल्यसंस्कार रुजविण्यावर अधिक भर देणे, हीच भविष्यात अशा घटनांना आळा घालण्याची प्रभावी दिशा ठरु शकते.

