पालिकेकडून अंतर्गत रस्त्यांच्या साफसफाईला सुरुवात! कारवाईचा ‘फार्स’ की ‘आश्‍वासनां’ची पूर्तता; अचानकच्या कारवाईने अतिक्रमणधारकांची पळापळ..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
अतिक्रमणं मुक्त सुरक्षित रस्ते आणि शिस्तबद्ध वाहतुकीचे आश्‍वासन देवून सत्तेत बसलेल्या संगमनेर सेवा समितीला गेल्या सात महिन्यांत प्रत्यक्षात ती हटवण्यात मात्र वारंवार अपयश आले. दोन भागातील अतिक्रमण काढण्यात होणारा दुजाभाव आणि दरवेळी सामान्यांवर कोसळणारी कुर्‍हाड यातून नाराजीही उफाळल्याने दोनवेळा सुरु झालेली मोहीम वाहनांचे तुरळक डिझेल जाळून थांबवण्यात आली. या दरम्यान जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे अस्त्रही हाती आले, मात्र त्यांनी ज्यांना जबाबदारी सोपवली तेच निष्क्रिय निघाले. परिणाम समितीची आश्‍वासने ‘हवा’ वाटत असतानाच आज सकाळी मुख्याधिकार्‍यांनी लवाजमा आणि सोबतीला तगडा बंदोबस्त घेवून चावडीपासून बुलडोझर फिरवण्यास सुरुवात केली. त्याचा परिणाम शहरातील धास्तावलेल्या अतिक्रमणधारकांनी जागोजागी आपल्या टपर्‍या, हातगाड्या आणि पथार्‍या घेवून पलायन केल्याने कधीनव्हे ती संगमनेरातील अंतर्गत रस्त्यांची रुंदी समोर आली. यावेळी काही जणांनी नेहमीप्रमाणे शिरजोर होण्याचाही प्रयत्न केला, मात्र पोलिसांसमोर त्यांना माघार घ्यावी लागली. या कारवाईने पुढील काही दिवस संगमनेरचे रस्ते मोकळे आणि सुरक्षित अनुभवायला मिळतील, मात्र अशी स्थिती किती दिवस कायम राहील याबाबत साशंकता आहे.


संगमनेर शहराच्या गावठाणभागात दाट लोकवस्तीसह मुख्य बाजारपेठाही विस्तारलेल्या आहेत. शहराला ऐतिहासिक वारसा असल्याने तत्कालीन व्यवस्थेनुसार शहराची रचना झाली आहे. त्यानुसार एकमेकांना खेटून असलेली बहुमजली घरं, दुकानं आणि अंतर्गत रस्ते मात्र अरुंद आणि निमूळते. त्यात अलिकडच्या काळात व्यावसायिक स्पर्धा वाढत गेल्याने आपल्या दुकानातील अधिकाधिक वस्तूंचे प्रदर्शन करुन ग्राहकांना आकर्षित करण्याची चढाओढ सुरु झाली. त्यातून वर्दळीच्या अरुंद रस्त्यांवरही दुकानांपुढे अर्धी दुकाने येवून उभी राहू लागली. त्यात फेरीवाले, पथारीवाले यांची मोठी भर पडण्यासह भंगारातील रिक्षा घेवून मोक्याचे चौक व्यापणारे बेकायदा रिक्षाथांबेही निर्माण झाले. या सगळ्यांचा परिणार शहरातील गचाळपणा, अव्यवस्था आणि बेशिस्तीत वाढ होवून अंतर्गत वाहतुकीचा बोजवारा उडाला, महिला व मुलींच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ होवून सामाजिक शांतताही भंग होवू लागली.


मध्यंतरी मार्चमध्ये पालिकेने निवडणुकीतील आश्‍वासनांची पूर्तता करण्यासाठी बुलडोझर एक्शन सुरु केली, मात्र त्याचा प्रभाव एकाच वर्गावर राहिल्याने नाराजी निर्माण झाली. त्यातून राजकीय नफा-नुकसान, सध्याची राजकीय स्थिती या सगळ्यांचा विचार होवून चावडीपासून सुरु झालेली मोहीम छत्रपतींच्या स्मारकापर्यंत येतायेता गुंडाळली गेली, ती आज पुन्हा सुरु झाली. या दरम्यान गेल्या महिन्यात (10 जून) शासन धोरणांचे पालन करताना जिल्हाधिकार्‍यांनी शहरातील सर्व प्रकारची अतिक्रमण निष्काशित करावी यासाठी प्रांताधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना करुन 15 दिवसांत ‘अंतिम’ कारवाई अहवाल सादर करण्याचे आदेश देत हलगर्जीपणा केल्यास कठोर कारवाईचा इशाराही दिला. मात्र संगमनेरच्या प्रांताधिकार्‍यांनी त्यालाही केराची टोपली दाखवल्याने त्यातून निर्माण झालेली आशाही मालवली.


पालिकेची कचखाऊ भूमिका आणि त्याला प्रांताधिकार्‍यांचीही साथ यातून निवडणुकीतील आश्‍वासन हवेतच विरणार असे चित्र निर्माण होत असतानाच आज (ता.15) सकाळी पालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी पालिकेतील अधिकारी, कर्मचारी, दोन जेसीबी, चार ट्रॅक्टर, अनेक मजूर आणि सोबतीला पोलीस निरीक्षक समीर बारवकर व त्यांच्या कर्मचार्‍यांसह अचानक मोहीमेचा शंख फूंकला. या मोहीमेत सहभागी कर्मचार्‍यांना नेमकी कारवाई कोठे होणार? याबाबत कोणतीही माहिती नसल्याने त्यांच्यातही उत्सुकता होती. सकाळी अकराच्या सुमारास पालिकेतून निघालेला हा लवाजमा मेनरोडवरुन चावडीच्या दिशेने वळाला आणि त्याचे कंप थेट नाशिकरोड, नवीन नगररोडपर्यंतच्या रस्त्यांवर जाणवले.


चावडीपासून सुरु झालेल्या या मोहीमेत ओटे, पायर्‍या, दुकानासमोर दुकाने लावून ठेवलेला माल, बाहेर आलेले दुकानांचे बोर्ड, पत्रे काढण्यात आले. या दरम्यान मोमीनपूर्‍यात किरकोळ शाब्दीक अडथळा निर्माण झाला. मात्र पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करीत तो मोडून काढला. चावडी ते छत्रपती स्मारकादरम्यान सुरु झालेल्या या कारवाईची चर्चा मात्र क्षणात गावभर पसरल्याने जागोजागी, रस्त्यारस्त्यावर पोटाच्या नावावर सर्वसामान्यांच्या जीवावर उठलेले असंख्य फेरीवाले, फळ व भाजी विक्रेते, पथार्‍या मारुन रस्ते अडवणारे, मनाला वाटेल तीथे भररस्त्यात दुचाकी-चारचाकी उभ्या करणारे, भंगारातील रिक्षांचा प्रवाशी वाहतुकीसाठी वापर करीत चौका-चौकात बेकायदा थांबे उभारणार्‍यांनी धसका घेत आजमात्र पलायन केल्याचे दिसले. त्यामुळे शहरातंर्गत बहुतेक रस्त्यांसह पुणे-नाशिक आणि कोल्हार-घोटी या दोन्ही महामार्गावरील गचाळपणा नाहीसा होवून सुरळीत आणि शिस्तबद्ध वाहतुकीचा अनुभव येत होता.


अर्थात, पालिकेकडून पहिल्यांदाच अशाप्रकारची मोहीम राबवली गेली असेही काही नाही. यापूर्वी शेकडोंवेळा अशा मोहीमा झाल्या आणि संपल्या. मात्र त्यातील एकाही कारवाईनंतर त्यात कधीही सातत्य नसल्याने त्या दरवेळी पालिका किंवा प्रशासनाचा फार्सच ठरल्या. यावेळीही पालिकेने मोठ्या धाडसाने चावडी, अशोक चौक, मोमीनपुरा, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या भागातून पुन्हा एकदा या मोहीमेचा शुभारंभ केला आहे, मात्र त्याच्या सातत्यावरच त्याचे यश अवलंबून आहे.


संगमनेरातील अतिक्रमणं, पालिकेकडून होणारे त्यांचे लांगुनचालन यातून निर्माण होणारा गचाळपणा आणि अव्यवस्था यातून सुरक्षित मार्ग काढून शहराच्या वाहतुकीला शिस्त लावण्याचे, शहराच्या सौंदर्यात वाढ करण्याचे आश्‍वासन देवून पालिकेच्या सत्तास्थानी बसलेल्या संगमनेर सेवा समितीला त्यांच्या घोषणापत्रामुळेच यश मिळाले आहे. त्यामुळे त्यातील प्रत्येक आश्‍वासनाची पूर्तता करण्याचा दबाव त्यांच्यावर आहे. शहरातील अतिक्रमण हा खूप कळीचा मुद्दा आहे, त्यातून छोटा दुकानदार, टपरीधारक, फेरीवाले यांच्या रोजीरोटीचा प्रश्‍नही निर्माण होवू शकतो. मात्र एखाद्याच्या प्रपंचाचा विचार करुन संपूर्ण समाजासाठी अव्यवस्था स्वीकारणे कधीही सर्वमान्य होवू शकत नसल्याने शहरातील प्रचंड अतिक्रमणांबाबत पालिकेने अधिक कठोर भूमिका घेवून त्याचे समूळ निर्मुलन करणारी मोहीम सतत सुरु ठेवण्याची आवश्यकता आहे.

Visits: 2 Today: 2 Total: 1901167

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *