कर्र्‍हेघाट प्रकरणाने तालुका पोलिसांच्या विश्‍वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह! ‘रक्षक’च बनले ‘मूक’ प्रेक्षक; वरिष्ठांकडून चौकशीची नागरी मागणी..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
श्रीरामपूरमधील हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येनंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तेथील पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सार्वजनिकपणे प्रश्न उपस्थित करत, गुन्हेगारांचे मनोबल वाढण्यामागे पोलिसांच्या धोरणांचाही विचार होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. त्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यात दोन दिवसांपूर्वी कर्र्‍हेघाटात उघडकीस आलेल्या गुटखा तस्करीच्या प्रकरणाने संगमनेरातही पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. कारवाईतील विलंब, रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या दोन संशयितांचे पलायन आणि मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यात दिसून आलेली संथ गती यामुळे नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यातच या प्रकरणातील मुख्यआरोपी युसुफ दादा चौगुले ‘मकोका’ कारवाईस पात्र असतानाही पोलिसांकडून त्याला वाचवण्याचा प्रयत्न संशयास्पद असून संगमनेरच्या सुसंस्कृत सामाजिक वातावरणाचे मातेरे होण्यापूर्वीच त्याची गंभीर दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.


कर्र्‍हेघाटात झालेल्या अपघातानंतर अपघातग्रस्त वाहनातून मोठ्या प्रमाणावर गुटखा जप्त झाला. प्राथमिक माहितीनुसार सुमारे 75 गोण्यांमध्ये भरलेला गुटखा त्या वाहनात आढळून आला. घटनास्थळी पोलिस तत्काळ पोहोचले असतानाही पुढील गुन्हा नोंदविण्याच्या प्रक्रियेत विलंब का झाला, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. सुरुवातीला अन्न व औषध प्रशासनाकडून फिर्याद दाखल होणार असल्याची माहिती समोर आली; मात्र त्यानंतर अखेरीस पोलिसांनीच गुन्हा नोंदविला. या दरम्यान गेलेल्या वेळेमुळे तपासाबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.


या प्रकरणातील गंभीर बाब म्हणजे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांचे तेथून पसार होणे. अपघातानंतर पोलिस बंदोबस्त किंवा आवश्यक सुरक्षा व्यवस्था पुरेशी होती का, या संदर्भातही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशा परिस्थितीत संशयित रुग्णालयातून निसटणे ही केवळ प्रशासकीय त्रुटी होती की त्यामागे अन्य काही कारणे होती, याबाबतही स्पष्टता अपेक्षित असल्याचे आता बोलले जावू लागले आहे.


या प्रकरणात घारगावच्या युसुफ दादा चौगुले याचे नाव उघड झाले आहे. संबंधित आरोपी विरोधात यापूर्वी अनेक गुन्हे नोंद असल्याची माहिती सार्वजनिक चर्चेत असून, अशा पार्श्वभूमीवर तपास यंत्रणेकडून अधिक कठोर आणि वेगवान कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र, या प्रकरणातील तपासाची दिशा आणि गती पाहता विविध स्तरांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. या सर्व बाबींची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.


राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाकडून वारंवार गुटखा तस्करीत पुनरावृत्ती करणार्‍या आरोपींविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाई करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. अशा स्थितीत या प्रकरणात त्या तरतुदींचा विचार का झाला नाही? त्यामागील कारणे काय, याबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. याच प्रकारच्या एका प्रकरणात बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे संबंधित यंत्रणांनी तातडीने कठोर कारवाई केल्याचे उदाहरण पुढे येत आहे. त्यामुळे संगमनेरातील प्रकरणातही समान निकष का लागू झाले नाहीत यावरुन संश बळावला आहे.


गेल्या काही महिन्यात वडगावपान येथील अ‍ॅसिडफेकपासून कौठे कमळेश्‍वर परिसरातील घरफोड्या तसेच इतर काही गंभीर गुन्ह्यांच्या तपासातील गतीबाबतही वेळोवेळी प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर कर्र्‍हेघाटातील गुटखा प्रकरणाने त्या चर्चेला नव्याने उधाण आले आहे. गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी तपासात वेग, पारदर्शकता आणि कठोरता आवश्यक असते. मात्र तालुका पोलिसांकडे याच गोष्टींची वाणवा असल्याने पोलिसांच्या निष्क्रियतेतून तालुक्याचे सामाजिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता वाढली आहे.


श्रीरामपूरमधील घटनेनंतर पालकमंत्र्यांनी व्यक्त केलेल्या चिंता आणि संगमनेरातील या प्रकरणामुळे समोर आलेले प्रश्न या दोन्हींकडे केवळ स्वतंत्र घटना म्हणून न पाहता, जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या व्यापक संदर्भात त्यांचा विचार होणे आवश्यक आहे. गुन्हेगारांविरुद्ध वेळेत आणि प्रभावी कारवाई झाली नाही तर कायद्यावरील नागरिकांचा विश्वास कमी होण्याची भीती असते याचे पोलिसांनी भान ठेवण्याची गरज आहे, अन्यथा काळ सोकावण्यास वेळ लागणार नाही.


कर्र्‍हेघाट प्रकरणात कारवाईच्या सुरुवातीच्या टप्प्यात विलंब का झाला? रुग्णालयात उपचार घेत असलेले संशयित पोलिसांच्या नाकावर टिच्चून कसे पसार झाले? गुन्हे पुनरावृत्तीच्या पार्श्वभूमीवर ‘मकोका’च्या तरतुदींचा विचार का केला गेला नाही? पोलिसांना अद्यापही या प्रकरणातील मुख्य सूत्रधार युसुफ चौगुले का सापडला नाहीे? आणि या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकार्‍यांकडून चौकशी होणार का? असे विविध प्रश्‍न उपस्थितीत झाले असून त्याच्या उत्तरातच संगमनेर तालुका पोलिसांची विश्‍वासार्हता अवलंबून आहे.

Visits: 34 Today: 34 Total: 1898401

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *