महिन्याभरानंतरही ‘दत्तधाम’चा ‘मास्टरमाईंड’ पसारच! तालुका पोलिसांच्या अपयशाची श्रृंखला; ‘अ‍ॅसिड फेक’ प्रकरणाच्या फाईलवरही धूळ..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
अवघ्या बारा वर्षाच्या मुलीवर ‘अ‍ॅसिड’ हल्ला होवून तब्बल 96 दिवसांचा काळ उलटूनही आरोपीची साधी ओळख पटवण्यातही अपयशी ठरलेल्या संगमनेर तालुका पोलिसांच्या अपयशाची श्रृंखला आजही कायम आहे. संपूर्ण तालुक्यात संताप निर्माण करणार्‍या ‘अ‍ॅसिड फेक’ प्रकरणानंतर त्याच गावात गेल्या अनेक वर्षांपासून दैवी चमत्काराने दुर्धर आजार बरा करण्याचा दावा करणार्‍या ‘दत्तधाम सरकार’ या भोंदूगिरीच्या ठिकाणावरही कारवाई झाली. या धक्कादायक प्रकरणात दैवीशक्ति संचारत असल्याचा दावा करणार्‍या राजेंद्र गडगेसह त्याची मुलगी ज्ञानेश्‍वरी, डॉ.मोहन पुरी, मधुकर शिंदे व सुरज शिंदे अशा पाचजणांवर गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी गडगेसह मधुकर शिंदेला अटक केली, मात्र उर्वरीत तिनही आरोपी पसार झाले. या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीत डॉ.पुरीवरील संशय बळावल्यानंतर सखोल तपासातून तोच ‘मास्टरमाईंड’ असल्याचेही स्पष्ट झाले. मात्र पोलिसांना अद्यापही त्याचा माग शोधता आलेला नाही. एकीकडे पोलिसांकडून आरोपीच्या मागावर असल्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे तोच आरोपी शहरातील एखाद्या नामांकित वकिलांना भेटतो, वकिलपत्रावर सह्या करतो आणि अटकपूर्वसाठी धडपडतो तरीही पोलिसांना तो सापडत नसल्याने मोठा ‘संशय’ निर्माण झाला आहे. भारतीय पोलीस सेवेतून आलेल्या सुदर्शन मुम्मका यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्याला हादरवणार्‍या या दोन्ही प्रकरणांच्या तपासाला गती येण्याची अपेक्षा होती, मात्र आता ती देखील फोल ठरल्याने ‘अ‍ॅसिड फेक’ पाठोपाठ ‘शिवधाम सरकार’च्या फाईलीवरही धूळ साचण्याची शक्यता आहे.


तीन महिन्यांपूर्वी 17 मार्चरोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास शाळा सुटल्याने घराकडे निघालेल्या अवघ्या 12 वर्षांच्या चिमुरडीवर वडगाव पानमधील महादेवमळा रस्त्यावर एका विकृताने अ‍ॅसिड फेकले. दुचाकीवरुन आलेल्या आरोपीने सुरुवातीला पत्ता विचारण्याचा बहाणा करुन तिला थांबवले व काही क्षणातच सोबत आणलेल्या बाटलीतील अ‍ॅसिड फेकून तो पसार झाला. या घटनेने अवघ्या राज्यात खळबळ उडून थेट विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहातही त्यावर सखोल चर्चा झाली. त्यातून पोलिसांवरील दबाव वाढल्याने अगदी विशेष पोलीस उपमहानिरीक्षकांसह अपर अधिक्षकांपर्यंत प्रत्येक वरीष्ठ अधिकार्‍याने या प्रकरणाच्या तपासात जीव ओतला. मात्र या घटनेला आता 96 दिवसांचा कालावधी उलटला आहे.


या दरम्यान जंग जंग पछाडूनही तालुका पोलिसांना अ‍ॅसिड फेकणार्‍या आरोपीची ओळख पटवण्यातही सपशेल अपयश आल्याने इतक्या गंभीर आणि राज्याला हादरवणार्‍या प्रकरणानंतरही ‘तो’ विकृत आरोपी मोकाटच राहण्याची दाट शक्यता आहे. या घटनेने जिल्ह्यात अनेक ठिकाणी निषेधाची आंदोलने झाली. वडगावपान फाट्यावर सर्वपक्षीयांनी एकत्र येवून रोष व्यक्त केला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पीडित अल्पवयीन मुलीच्या उपचाराची जबाबदारी स्वीकारली व तिचा चेहरा खराब होवू देणार नाही अशी ग्वाही दिली. या सगळ्या गोष्टी घडून आता मोठा काळ गेला आहे, या प्रकरणात भाजलेली चिमुरडी ‘प्रवरा’च्या मदतीने पुन्हा मूळ स्वरुपात आली आहे. मात्र तिला विनाकारण हा त्रास भोगायला लावणारा विकृत अजूनही कायद्यापासून खूप दूर आहे.


एकीकडे वडगावपानच्या अ‍ॅसिडफेकीवरुन जिल्ह्यातील विद्यार्थीनींच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर असतानाच 18 एप्रिलरोजी याच गावच्या शिवारात राजरोसपणे ‘दत्तधाम’ अशा धार्मिक नावाचा वापर करुन दैवी चमत्कारातून दुर्धर आजारावर उपचार करणार्‍या केंद्रावर पोलिसांनी छापा घातला. यावेळी पोलिसांना मोठ्या प्रमाणात औषधांचा साठाही मिळाला, त्यासोबतच भोंदूबाबाचा प्रचार करण्यासाठी निर्माण केलेली आधुनिक डिजिटल व्यवस्था, विविध महागडी उपकरणेही जप्त झाली या प्रकरणी राजेंद्र गडगे, त्याची मुलगी ज्ञानेश्‍वरी, सिन्नर तालुक्यातील डॉ.मोहन पुरी आणि रहिमपूरच्या मधुकर व सुरज शिंदे अशा पाचजणांवर गुन्हा दाखल झाला आणि भोंदू गडगेसह मधुकर शिंदेला अटक झाली. सध्या दोघेही न्यायालयीन कोठडीत असून जिल्हा न्यायालयाने त्यांचे नियमित जामीन फेटाळले आहेत.


पोलिसांच्या कारवाईत ‘दत्तधाम’ मधून मोठ्या प्रमाणात औषधे सापडल्याने त्याच्या तपासाचे धागे पसार असलेल्या तिघांमधील डॉ.मोहन पुरीच्या सिन्नर तालुक्यातील ‘शिवधाम सरकार’ पर्यंत जावून पोहोचले. न्यायालयाच्या आदेशाने त्या आश्रमावरही छापा घातला गेला. त्यावेळी आरोपीचा शोध तर लागला नाहीच, शिवाय तेथील औषधांचा कारखाना आणि त्यातील उत्पादन प्रक्रिया मात्र सुरु होती. त्याबाबत पथकाने अधिक चौकशी केली असता सदरचे उत्पादन अधिकृत असल्याचे व दत्तधाममधील औषधांशी मिळते असल्याने या प्रकरणात डॉ.पुरीची भूमिका सखोलपणे तपासली असता या प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ तोच असल्याचे स्पष्ट झाले. भोंदू राजेंद्र गडगेसारख्या असंख्य भोंदूबाबांना त्याच्याकडून औषधांचा पुरवठा होत असल्याचाही पोलिसांना संशय आहे. मात्र त्या उपरांतही त्याचा शोध घेण्यात तालुका पोलीस आजही अपयशीच आहेत.


या दरम्यान डॉ.मोहन पुरीसह राजेंद्र गडगेची मुलगी ज्ञानेश्‍वरी आणि पंटर सुरज शिंदे यांनी संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी नामांकित वकिलांमार्फत अर्जही दाखल केला. गेल्या गुरुवारी (ता.21) त्यावर सुनावणी होवून न्यायालयाने तिघांचेही अर्ज फेटाळले, तर सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या राजेंद्र गडगे व मधुकर शिंदे यांचे नियमित जामीन अर्जही फेटाळण्यात आले. या प्रकरणातही गुन्हा दाखल होवून आता महिन्याभराहून अधिक काळ लोटला आहे. प्रकरणाच्या तपासात डॉ.मोहन पुरीच मास्टरमाईंड असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याला अटक झाल्याशिवाय राज्यात असे किती धार्मिक ‘धाम’ उभारुन रुग्णांची फसवणूक सुरु आहे याचा तपास लागण्याची शक्यता नाही. त्याची अटक अतिशय महत्वाची असून वडगाव पानमधील कारवाईनंतरही ‘चमत्कारा’चा हा खेळ अद्याप उघड झालेला नाही. मात्र तालुका पोलिसांची कार्यशैली पाहता या प्रकरणाच्या फाईलवरही धूळ साचण्याचीच अधिक शक्यता आहे.


कडवी शिस्त आणि सखोल तपासाचा आग्रह धरणार्‍या भारतीय पोलीस सेवेतील नूतन पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांच्याकडून राज्याला हादरवणार्‍या या दोन्ही प्रकरणांकडे गांभीर्याने पाहीले जाईल असे अपेक्षित होते. मात्र आता त्यांना पदभार घेवूनही आठवडा उलटला असून या दरम्यान मुख्य सूत्रधारासह तिघांचे अटकपूर्वही फेटाळले गेल्याने त्यांचा संभाजीनगरच्या खंडपीठात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, मात्र त्यांना अटक करण्याबाबत तालुका पातळीवरुन कोणताही उत्साह दिसत नसल्याने या प्रकरणावर संशयाची मोहोर उमटून तपास गुंडाळला जाण्याचीच अधिक शक्यता निर्माण झाली आहे.

Visits: 5 Today: 5 Total: 1828285

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *