मुलींनी फोडली संगमनेरच्या साळीवाड्यातील मानाची दहीहंडी! श्रीकृष्णाष्टमी उत्सवाची धूम; मटकी सजावट व वेशभूषा स्पर्धांचेही आयोजन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शुक्रवारी देशभरात साजर्या झालेल्या दहीहंडी उत्सवाची धूम संगमनेरातही बघायला मिळाली. येथील साळीवाड्यातील रेणुकामाता उत्सव समिती व गणपती मंडळाने संयुक्तपणे आयोजित केलेल्या या उत्सवात मुलींनी बाजी मारली. साळीवाड्याच्या प्रशस्त मैदानात बांधलेली हंडी तीनस्तराचे थर रचताना सोनाली जीतकर या मुलीने फोडीत इतिहास रचला. या उत्सवादरम्यान आयोजित केलेल्या मटकी सजावट व वेशभूषा स्पर्धेलाही मोठा प्रतिसाद मिळाला. नागरीकांनी आपापल्या दारांपुढे एकापेक्षा एक सजवलेल्या आकर्षक दहीहंड्या बांधून परिक्षकांनाच बुचकळ्यात टाकल्याने अखेर सर्व सहभागींना समान पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
आपली संस्कृती आणि परंपरांचे जतन करण्यात आघाडीवर असलेल्या साळीवाड्यात दरवर्षी विविध सण-उत्सवांचे मोठ्या प्रमाणात आयोजन होते. सन 1895 साली रंगारगल्लीतील सोमेश्वर मंदिरात सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेल्यानंतर दोन वर्षांनी 1897 साली साळी समाजाच्या लक्ष्मीनारायण मंदिरामध्येही हा उत्सव सुरु झाला. येथील श्रींची स्थापना करण्यासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्वतः उपस्थित होते असेही या परिसरातील जुने नागरिक सांगतात. याशिवाय या परिसरात असलेल्या रेणुकामाता मंदिरातही वर्षभरातील उत्सवांसह नवरात्रौत्सवात दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रम व अनुष्ठानांचे आयोजन होते. कोजागिरी पोर्णिमेच्यानिमित्त या मंदिरात मोठा उत्सव होतो आणि त्यानिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रमही मोठ्या भक्तिभावाने केला जातो.
अन्य उत्सवांसोबतच दरवर्षी साळीवाड्यात दहीहंडी उत्सवाचीही मोठी धूम बघायला मिळते. रेणुकामाता उत्सव समिती व साळीवाडा गणेश मंडळाच्यावतीने आयोजित होणार्या या उत्सवात अधिकाधिक नागरिकांचा सहभाग लाभावा यासाठी विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात येते. यंदा मटकी सजावट व लहान मुलांसाठी वेशभूषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या नागरिकांनी इतक्या आकर्षकपणे मटक्यांची आणि आसपासच्या परिसराची सजावट केली की कोणाला गुण द्यावेत आणि कोणाचे कमी करावेत अशा संभ्रमात परीक्षक पडले होते. वेशभूषा स्पर्धेच्या बाबतीतही असेच घडले. राधा-कृष्ण, श्रीकृष्णाचे सवंगडी, बलराम आणि सुदामा यांचे पेहराव करुन वावरणारी ही मंडळी पाहून परिक्षकांनी सरसकट सर्वांना विजयी घोषीत करुन त्यांना पारितोषिकांचे वितरण केले.
दहीहंडीच्या मुख्य कार्यक्रमापूर्वी जमलेल्या गोपाळांनी लक्ष्मीनारायण मंदिरापासून मिरवणूक काढीत तेथून भडंगबाबा, रंगारगल्ली, नवशा गणपती, चव्हाणपूरा, जेधे कॉलनी आणि साळीवाडा या मार्गावरील घराघरासमोर बांधलेल्या आकर्षक हंड्या फोडल्या. त्यानंतर साळीवाडा मैदानावरील मुख्य दहीहंडीच्या कार्यक्रमात यंदा हंडी फोडण्याचा मान मुलींना देण्यात आला. यासाठी तीनस्तरीय थर रचण्यात आला. अपूर्वा येखे, प्रेरणा कोदे, साक्षी काकडे यांच्यासह अन्य मुलींच्या मदतीने तिसर्या थरावरुन दहीहंडीपर्यंत पोहोचलेल्या सोनाली जीतकर या मुलीने हंडी फोडीत यंदा इतिहास घडवला. यावेळी जोरदार टाळ्यांचा गजर करुन व गोपालकृष्ण महाराज की जयचा घोष करीत उपस्थित असलेल्या नागरीकांनी या सर्व मुलींचे कौतुक केले. माजी नगरसेवक शैलेश कलंत्री व सामाजिक कार्यकर्ते योगेश बिचकर यांचे या उपक्रमाला सहकार्य व मार्गदर्शन लाभले. आकाश मेहेरकर, चेतन कळसकर, बिट्टू गुंजाळ, अक्षय तुपसाखरे, बबलु गवंडी, अनिकेत चांगटे, अंकीत परदेशी व विजय बकरे यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.