भरधाव टेम्पोच्या धडकेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू! भेर्डापूर-मालुंजा रस्त्यावर झाला अपघात; टेम्पो चालकाने काढला पळ

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील भेर्डापूर-मांलुजा रस्त्यावर माती वाहतूक करणार्‍या भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. माती वाहतूक करणार्‍या (एमएच.21, डी.8977) क्रमांकाच्या टेम्पोने बुधवारी (ता.29) दुपारच्या सुमारास मालुंजा शिवारात दुचाकीस्वार जोडप्याला चिरडले. या अपघातात काशिनाथ कोळेकर (वय 50) व आदिकाबाई कोळेकर (वय 46, रा. मांजरी, ता. राहुरी) या जोडप्याचा दुर्वैवी अंत झाला.

कोळेकर पती-पत्नी एका कार्यक्रमाला सकाळी हजेरी लावून दुचाकीवर बेलापूरच्या दिशेने आपल्या घराकडे जात होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीला माती वाहतूक करणार्‍या टेम्पोची समोरून जोराची धडक बसली. त्यात दोघेही गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाले. दरम्यान, रस्त्यावरील प्रवाशांसह परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी मोठी गर्दी केली होती. तोपर्यंत टेम्पो चालकाने तेथून पळ काढला होता. अपघाताची माहिती मिळताच मालुंजा येथील सरपंच अच्युत बडाख, उपसरपंच रावसाहेब शेंडगे, कृष्णकांत बडाख, अ‍ॅड. कचेश्वर बडाख, संजय बडाख यांनी मदतीसाठी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

ग्रामस्थांनी तालुका पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी येवून पंचनामा केला. त्यानंतर उत्तरणीय तपासणीसाठी दोन्ही मृतदेह कामगार रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलिसांनी टेम्पो व दुचाकी ताब्यात घेवून याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण सुरशे अधिक तपास करीत आहे.

Visits: 183 Today: 1 Total: 2167520

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *