न्यायालयाच्या आवारातील ‘भाईगिरी’ अन् कायदा-सुव्यवस्थेचा खेळखंडोबा! संगमनेर पोलिसांचे वाभाडे काढणारी घटना; कायद्याची ऐशीतैशी करणार्या 28 जणांवर गुन्हा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
न्यायालयाच्या अत्यंत संवेदनशील आणि सुरक्षित मानल्या जाणार्या आवारातच पोलिसांच्या डोळ्यादेखत एका गुन्हेगाराचे उदात्तीकरण करत ‘आयेगा तो अपना राज, सागर पगारे संगमनेर का बॉस’ अशा गर्जना देऊन बेकायदेशीर जमावाने माजविलेला उच्छाद म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील, विशेषतः संगमनेर शहरातील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारा प्रकार आहे. पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत सदाकाळ यांच्या फिर्यादीवरुन भारतीय न्यायसंहितेतंर्गत 28 जणांच्या हुल्लडबाज टोळक्यावर गुन्हे दाखल झाले असले, तरी या गंभीर घटनेने पोलिसांच्या तथाकथित धाकाची लक्तरे चव्हाट्यावर आणली आहेत. केवळ गुन्हे दाखल करुन घेण्यातच धन्यता मानणार्या संगमनेर पोलिसांनी शेजारच्या नाशिक पोलिसांचा आदर्श घेण्याची गरज आहे. संगमनेरातील हा धक्कादायक प्रकार न्याय मंदिराच्या आवारातच घडल्याने गुन्हेगारांचे उघड उदात्तीकरण करणार्यांवर पोलिसांनी उचललेला कायद्याचा बडगा स्वागतार्हच आहे, मात्र या निमित्ताने संगमनेर शहरातील सडलेली ‘खाकी’ व्यवस्था, अवैध व्यवसायांचे बोकाळलेले साम्राज्य, हप्तेखोरी आणि राजकीय दाबापोटी होणारी ‘हुजरेगिरी’ चव्हाट्यावर आली आहे.

संगमनेर शहराचा राजकीय आणि गुन्हेगारीचा इतिहास पाहिला तर आजची स्थिती अत्यंत स्फोटक आणि सामाजिक शांततेला नख लावणारी बनली आहे. न्यायालयाच्या आवारात आरोपी सागर पगारे याला हजर करताना त्याचे मित्र यश सुनील धात्रक, रितेश शाम बिडवे, आनंद गांधी आणि त्यांच्या इतर 20 ते 25 साथीदारांनी ज्या निर्लज्जपणे त्याचे व्हिडिओ शूटिंग केले आणि गोंधळ घातला, ते पाहता या गुन्हेगारांना कायद्याचे किंवा पोलिसांचे कसलेही भय उरलेले नाही असे दिसून येते. आज संगमनेर शहर हद्दीत गुन्हेगारी, अवैध व्यवसाय आणि खोट्या गुन्ह्यांचे सर्रास वाढते प्रमाण पाहिले तर खाकीचा वचक पूर्णपणे निकालात निघाल्याचे दिसते. पोलीस अधिकारी कर्तव्य विसरुन, कायदा धाब्यावर बसवून केवळ आपल्या मनाला येईल त्या पद्धतीने राजकीय दबावाखाली राहून परिस्थिती हाताळत आहेत. त्यामुळे वास्तवाची धग वाढली असून, आगामी काळात एखाद्या किरकोळ घटनेतूनही शहरात मोठा सामाजिक उद्रेक होण्याची भीती निर्माण झाली आहे.

या संपूर्ण सावळ्यागोंधळाला कारणीभूत म्हणजे राजकाण्यांना लागलेली यंत्रणांची चटक. एकमेकांचे राजकीय वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आणि उणीदुणी काढण्यासाठी पोलीस यंत्रणेचा खुलेआम आणि खुबीने वापर सुरु आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे, जनसामान्यांचे रक्षण करण्याचे सोडून पोलीस अधिकारी केवळ राजकारण्यांचे बडवे होऊन ‘जी हुजुरी’ करण्यातच धन्यता मानत आहेत. या राजकीय दबावातून आणि लाळघोटेपणातून भलेही ‘रामराज्या’चे आभासी चित्र निर्माण केले जात असेल, परंतु हे चित्र किती पोकळ आहे याची प्रचिती न्यायालयाच्या आवारातील या घटनेने उघड केली आहे. पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी केवळ खुर्च्या उबवण्यात मग्न असल्याने गुन्हेगारांचे मनोबल गगनाला भिडले आहे, ज्याचा फटका सामान्य नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे रोजचेच चित्र आहे.

संगमनेरसह जिल्ह्याची बेताल झालेली व्यवस्था सुधारण्यासाठी भारतीय पोलीस सेवेतील कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळख असलेल्या सुदर्शन मुम्मका यांनी जेव्हा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार हाती घेतला, तेव्हा जिल्ह्यातील सुज्ञ नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यांच्या कडव्या प्रशासनिक शिस्तीतून बेताल झालेली व्यवस्था स्थिरस्थावर होईल आणि कर्तव्य विसरलेल्या अधिकारी व कर्मचार्यांना त्यांच्या मूळ कर्तव्याची जाणीव होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांनाही पदभार घेऊन आता महिना लोटला आहे, तरीही संगमनेर किंवा संपूर्ण जिल्ह्याच्या गुन्हेगारी स्थितीत फार काही बदल झाल्याचे अद्याप दृष्टीस पडलेले नाही. मुम्मका यांच्याकडून जिल्ह्याला खूप अपेक्षा आहेत, परंतु सर्वत्र बोकाळलेली गुन्हेगारी, प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत विस्तारलेले अवैध जुगार, मटका, दारु आणि वाळूचे धंदे राजरोसपणे सुरुच आहेत.

माध्यमांतून वारंवार चर्चा होऊन, गंभीर आरोप होऊनही काही अधिकारी आणि कर्मचारी आजही खुर्चीला खिळून आहेत. अशा अधिकार्यांच्या बदल्या करण्याचे धाडस अद्यापही प्रतिक्षीत आहे. संगमनेरसारख्या सतत राजकीय प्रभावात राहणार्या आणि संवेदनशील असलेल्या पोलीस ठाण्यासाठी अनुभवी, कार्यक्षम आणि निष्पक्ष वरीष्ठ पोलीस अधिकार्याची गरज आहे. त्याचप्रमाणे, राजकीय दबावाला बळी न पडता कायद्याचा बडगा उगारु शकणार्या कसदार उपविभागीय पोलीस अधिकार्याचीही आवश्यकता आहे. अन्यथा, येणार्या काळात राजकीय दाबातून सुरु असलेल्या गुन्हेगारीच्या या धांगडधिंग्याचा मोठा उद्रेक होऊन शहराची आणि पर्यायाने संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याची सामाजिक शांतता व सुव्यवस्था मोडीत निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

न्यायालयीन आवारातील ही उद्दामता केवळ एका गुन्हेगारी टोळक्याची हुल्लडबाजी नसून, ती संगमनेरच्या सडत चाललेल्या पोलीस व्यवस्थेवर आणि राजकीय दबावाखाली असलेल्या खाकीवर पडलेली सणसणीत चपराक आहे. त्यामुळे आतातरी आयपीएस सुदर्शन मुम्मका यांनी कागदी घोडे नाचवण्याचे सोडून कर्तव्यशून्य असलेल्या अधिकार्यांची उचलबांगडी करुन जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे कंबरडे मोडण्याची गरज आहे, त्याशिवाय जिल्ह्यातील गुन्हेगारीवर कायद्याचा धाक निर्माण होण्याची दूरान्वयेही शक्यता नाही.

