अखेर ग्रामीण रुग्णालयाला लागलेली ‘डॉ.प्रशांत थोरात’ नामक कीड नष्ट! ‘दैनिक नायक’च्या निर्भय पत्रकारितेचा विजय; आमदार अमोल खताळ यांचा आक्रमक पाठपुरावा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील आरोग्य यंत्रणा सर्वसामान्यांसाठी आधारस्तंभ मानली जाते, परंतु जेव्हा याच यंत्रणेत बसलेले काही लोक ‘देवत्व’ सोडून ‘दैत्य’ बनतात, तेव्हा समाजात संतापाची लाट उसळते. संगमनेर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत थोरात यांची कारकीर्द आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर असलेले गंभीर प्रश्नचिन्ह अखेर त्यांच्या निलंबनाच्या कारवाईने संपले आहे. या संपूर्ण घटनाक्रमात ‘दैनिक नायक’ने पत्रकारितेच्या कर्तव्याचे पालन करुन, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपली जबाबदारी पार पाडली. डॉ.थोरात यांनी मयत तरुणाच्या वडिलांसह त्याच्या नातेवाईकांना दिलेली अमानवी वागणूक आणि रुग्णालयातील मनमानी कारभार याविरोधात ‘दैनिक नायक’ने एल्गार पुकारला होता. कोणत्याही दबावाला बळी न पडता, सत्य आणि सर्वसामान्यांच्या बाजूने उभे राहिलेल्या या भूमिकेला संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी भक्कम पाठबळ दिले, ज्याचा सुखद शेवट या कीडी नागरीसेवतून निलंबनात झाला.

घुलेवाडीच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयावर सामान्य माणसाचा मोठा भरवसा आहे. यापूर्वी आणि आताही तो जपला जात होता. मात्र डॉ.प्रशांत थोरात यांच्यासारख्या अधिकार्यांची मुजोरी सर्वसामान्यांच्या त्याच विश्वासाला तडा देत होती. मयत तरुणाच्या वडिलांना आणि त्याच्या नातेवाईकांना ज्या पद्धतीने अमानवीय वागणूक देण्यात आली, ती पाहून माणुसकीचे सर्व नियम धाब्यावर बसल्याचे दिसून आले. एका शोकाकुल कुटुंबाची वेदना समजून घेण्याऐवजी, त्यांना जी वागणूक मिळाली, ती केवळ संतापजनकच नव्हती, तर ती गुन्हेगारी स्वरुपाची होती. या प्रकरणातील अन्यायाला ‘दैनिक नायक’ने आपल्या धारदार लेखणीतून वाचा फोडली. या घटनेचा सविस्तर ऊहापोह करताना, रुग्णालयातील गैरव्यवहार आणि अधिकार्यांची दादागिरी चव्हाट्यावर आणण्याचे काम दैनिक नायकने केले.

हा प्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर प्रशासकीय सुधारणा होण्याऐवजी, सत्य उघड करणार्या पत्रकारांच्या विरोधातच पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हा प्रकार म्हणजे भ्रष्ट पोलीस आणि आरोग्य यंत्रणेने समन्वयातून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि सर्वसामान्यांच्या न्यायाच्या अधिकारावर केलेले आक्रमणच होते. मात्र, ‘दैनिक नायक’चे संपादक गोरक्षनाथ मदने आणि कार्यकारी संपादक श्याम तिवारी यांनी माघार घेतली नाही. सत्याचा मार्ग कठीण असतो, पण तोच वास्तवाचा मार्ग असतो, हे ओळखून ‘दैनिक नायक’ने आपली भूमिका अधिक आक्रमक केली. रुग्णांची होणारी परवड, डॉक्टरांची मुजोरी आणि त्याला पाठीशी घालणारी प्रशासकीय यंत्रणा यावर दैनिक नायकने आपल्या वृत्तमालिकेतून प्रहार केला.

या संपूर्ण संघर्षात संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांचे योगदान महत्वाचे ठरले. त्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून केवळ शब्दाने नव्हे, तर कृतीने या अन्यायाविरुद्ध लढा दिला. डॉ.प्रशांत थोरात सारख्या प्रवृत्तींमुळे सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत आहेत, ते आमदार खताळ यांनी अनुभवले आणि अशा प्रवृत्तींना नागरी सेवेतून बाहेर काढण्याचा त्यांनी चंग बांधला. आरोग्य विभाग आणि मंत्रालयीन पातळीवर त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच ही कठोर कारवाई झाली आहे. दैनिक नायकने घेतलेली जनहितार्थ भूमिका आणि आमदार खताळ यांनी दिलेले राजकीय संरक्षण यामुळे या प्रकरणाला यश आले आणि मयतासह त्याच्या नातेवाईकांना एकप्रकारे न्याय मिळाला. या प्रकरणात आमदार खताळ आणि दैनिक नायकने बजावलेल्या भूमिकेचे समाजातून कौतुक होत आहे.

शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने गुरुवारी (ता.11) जारी काढलेल्या आदेशाद्वारे, डॉ.प्रशांत सुरेश थोरात यांना निलंबित करण्यात आले आहे. कार्यासन अधिकारी अनिल कुमेरिये यांच्या स्वाक्षरीने निघालेल्या या आदेशात डॉ.थोरात यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. वारंवार कर्तव्यात कसूर आणि गंभीर स्वरुपाच्या विविध तक्रारी प्राप्त झाल्याने त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. निलंबन कालावधीत डॉ.थोरात यांचे मुख्यालय छत्रपती संभाजीनगर जिल्हा रुग्णालय येथे राहील. सक्षम अधिकार्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही.

महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमातील तरतुदीनुसार, या कालावधीत त्यांना खाजगी नोकरी स्वीकारता येणार नाही अथवा अन्य कोणत्याही व्यापार किंवा उद्योगधंद्यामध्ये स्वतःला गुंतवता येणार नाही. निलंबन कालावधीत त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या कालातील प्रदाने) नियम, 1981 च्या नियम 68 नुसार निर्वाह भत्ता आणि इतर पूरक भत्ते दिले जातील.

डॉ.प्रशांत थोरात यांचे निलंबन ही केवळ एका व्यक्तीवर झालेली कारवाई नसून, ती भ्रष्ट आणि माणुसकी हरवलेल्या प्रवृत्तींवरील घाव आहे. ‘दैनिक नायक’ने निडरपणे मांडलेले प्रश्न आणि आमदार अमोल खताळ यांनी दिलेली साथ यामुळे संगमनेर ग्रामीण रुग्णालयाला लागलेली ही कीड आता कायमची दूर झाली आहे. लोकशाहीत जनतेचा आवाज बुलंद असला पाहिजे आणि तो आवाज ‘दैनिक नायक’ने या संपूर्ण प्रकरणात बुलंद ठेवला आहे. येणार्या काळात आरोग्य यंत्रणेत अधिक पारदर्शकता आणि माणुसकी जपली जाईल, अशी अपेक्षा आता व्यक्त होत आहे. ज्यांनी चुकीचे केले, त्यांना कायद्याच्या चौकटीत राहून शिक्षा मिळाली आहे, हा संदेश या निलंबनाने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला मिळाला आहे.

घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयातील डॉ.प्रशांत थोरात यांच्या अमानवीय वागणुकीला ‘दैनिक नायक’ने आपल्या लेखणीतून चव्हाट्यावर आणले होते. मयत तरुणाच्या नातेवाईकांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध ‘दैनिक नायक’ने घेतलेल्या या भूमिकेला आमदार अमोल खताळ यांचे खंबीर पाठबळ लाभले. त्यांच्या पाठपुराव्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाने गुरुवारी (ता.11) डॉ.थोरात यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित केले आहे. या कारवाईमुळे संगमनेरच्या आरोग्य यंत्रणेत सुधारणा होण्याची आशा निर्माण झाली असून पत्रकारांच्या जिद्दीचे आणि आमदार खताळांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.

