संगमनेरच्या ‘गुन्हे प्रकटीकरण’चा मनमानी कारभार! गुन्ह्यांचे तपास नसूनही शाखा जोमात; संशयीत आरोपीच्या अमानवीय छळाचीही चर्चा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
एकेकाळी जातीय दंगलींच्या सावटाखाली वावरणार्‍या संगमनेर शहराने गेल्या काही दशकांत शांतता आणि सौहार्दाचा वारसा जपला आहे. मात्र, शहराच्या प्रगतीला आता खाकीतीलच काही ‘अकार्यक्षम’ घटकांमुळे ग्रहण लागल्याचे चित्र आहे. शहर पोलीस ठाण्यांतर्गत कार्यरत असलेल्या ‘गुन्हे प्रकटीकरण शाखे’चा (डीबी) कारभार तर सध्या संपूर्ण तालुक्यातच चर्चेचा आणि टीकेचा विषय ठरला आहे. अवैध धंद्यांना खतपाणी घालणे, आरोपींचा छळ करणे आणि गंभीर गुन्ह्यांचा तपास करण्यात मात्र पूर्णतः अपयशी ठरलेल्या या शाखेच्या कार्यपद्धतीवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून त्या उपरांतही त्यांचे ‘अस्तित्व’ शंका निर्माण करणारे ठरत आहे.


शहरातील गुन्हेगारीचा आलेख पाहता, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पूर्वी कधीही ऐकिवात नसलेल्या सशस्त्र गुंडांच्या टोळ्या, एमडी, गांजा, चरस या सारख्या अंमली पदार्थांचा वाढता विळखा, गोवंश कत्तलखाने, जुगार, मोबाईल मटका आणि वाळू तस्करी यासारख्या अवैध व्यवसायांनी शहराला अक्षरशः विळखा घातला आहे. या अवैध धंद्यांमधून मिळणारा मलिदाच या शाखेच्या ‘उदरनिर्वाहाचे’ साधन बनल्याचाही गंभीर आरोप आता उघडपणे होवू लागला आहे. गुन्हेगारांवर वचक ठेवण्याऐवजी, शाखच्या अधिकार्‍यांनी त्यांच्याशीच हातमिळवणी करुन गुन्ह्यांकडे डोळेझाक करण्याचे धोरण अवलंबल्याचे चित्रही सध्या शहर पोलीस ठाण्यात बघायला मिळत आहे.


संगमनेरच्या व्यापारी वर्गासाठी ही शाखा तर डोकेदुखी ठरली असून कोणत्याही चोरीचा तपासच लागत नसल्याचे पोलिसांवरील विश्‍वासच ढळू लागला आहे. तीन महिन्यांपूर्वी अकोले रस्त्यावरील एका गोदामातून चोरट्यांनी चक्क पिकअपमध्ये लाखों रुपयांच्या खाद्यतेलाचे डबे भरुन ते लंपास केले होते. या घटनेत पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज आणि ठसे तज्ज्ञांचे महत्त्वाचे पुरावेही लागल्याचे बोलले गेले होते. प्रत्यक्षात मात्र, इतके भक्कम पुरावे हातात असूनही केवळ ‘प्रकटीकरणा’चे नाव धारण करणार्‍या या शाखेला आरोपींचा छडा लावता आलेला नाही. या घटनेमुळे व्यापारी वर्गात संतापाची लाट असून, ज्यांच्याकडून सुरक्षित व्यवसायाची अपेक्षा त्यांच्याकडून गुन्हेगाराशी संगनमताचे आरोप होत आहेत.


गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी स्थापन झालेल्या या विशेष शाखेचे रुपांतर आता ‘अमानुष छळाच्या केंद्रा’त झाल्याचेही मागील काही घटनांमधून चर्चेत आले आहे. पोलीसी कसब वापरुन प्रत्यक्षात मैदानात काम करणं सोडून या शाखेचा अधिकारी संशयितांना अमानुषपणे मारहाण करीत असल्याचे आरोपही समोर येत असून मध्यंतरी एका संशयीताच्या पायांना चटके देण्याचा अघोरी प्रकारही घडला होता. या घटनेत आपण फसणार याची जाणीव होताच संबंधित अधिकार्‍याने घुलेवाडीच्या वैद्यकीय अधिकार्‍यांना हाताशी धरुन ‘बनावट’ तपासणी अहवाल तयार केला. या संशयिताला इतकी अमानुष मारहाण करण्यात आली की, त्याला गंभीर जखमा झाल्या. त्याला वाचवण्यासाठी संबंधित पोलीस अधिकार्‍याने चक्क आरोपी पळताना डांबरी रस्त्यावर घासल्याने ‘चटके बसले’ अशी हास्यास्पद नोंद वैद्यकीय अहवालात केली आहे. या प्रकरणातील ‘त्या’ वैद्यकीय अधिकार्‍याची मिलीभगत आणि पोलिसांची कृत्ये माणुसकीला काळीमा फासणारी आहेत.


या शाखेकडून संशयीतांचा केवळ शारीरिक छळच नव्हे, तर राजकीय आणि सामाजिक दबावाखाली येऊन निष्पापांना गोवण्यातही ही शाखा आघाडीवर आहे. निवडणुकांच्या काळात झालेली दोन कोटींची कारवाई असो, किंवा विमानतळ परिसरात सापडलेला गांजा समनापूर शिवारात दाखवून केलेली ‘बदली’ कारवाई, या सर्वांमागे तडजोडीचे आणि भ्रष्टाचाराचे राजकारण स्पष्ट दिसत आहे. डीबीचे हे कृत्य म्हणजे ‘गुन्हे प्रकटीकरण’ नसून गुन्हेगारांना ‘पाठीशी घालण्याचे’ कसब ठरले आहे. आजच्या घडीला या शाखेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरी असंतोषाचा कधीही उद्रेक होऊ शकतो. आता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संगमनेर पोलिसांच्या या ‘विशेष’ शाखेची झाडाझडती घेण्याची वेळ आली आहे.


संगमनेर शहरातील सध्याची पोलीस व्यवस्था गुन्हेगारी रोखण्यातच नव्हे, तर विश्वासार्हता टिकवण्यातही पूर्णपणे अपयशी ठरली आहे. प्रकटीकरण शाखेचे कारनामे केवळ एका विभागाची चूक नसून ती संपूर्ण यंत्रणेच्या सडीसडपणाचे लक्षण आहे. जेव्हा पोलीस दलच कायद्याची पायमल्ली करु लागते, तेव्हा गुन्हेगारांचे मनोबल वाढते आणि सर्वसामान्यांचा कायद्यावरील विश्वास उडतो. अवैध धंदे, छळ, बनावट अहवाल, खोटे गुन्हे दाखल करुन सामान्यांना त्रास देण्याची घटना फक्त आकड्यांत मोजण्यासारखी नसून, ती शहराच्या सामाजिक स्वास्थाला लागलेली कीडच आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी या प्रकारांची गंभीर दखल घेऊन या शाखेच्या कारभाराची सखोल चौकशी करण्यासोबतच नागरीकांना कोणताही दिलासा देण्यात अपयशी ठरलेल्या या शाखेचे अस्तित्वच संपवण्याची गरज आहे. अन्यथा या शाखेची कार्यपद्धती जनक्षोभाला निमंत्रण देणारी ठरेल.

Visits: 3 Today: 3 Total: 1850975

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *