‘दैनिक नायक’च्या धारदार लेखणीच्या  विश्वासार्हतेवरआरोग्य विभागाचे शिक्कामोर्तब!  ‘मुजोर’ वैद्यकीय अधिकाऱ्याचे निलंबन;  ​मृतदेहाची ३६ तास विटंबना करणारी घटना..  

​नायक वृत्तसेवा, संगमनेर
​संगमनेरच्या घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील अमानुष कारभार, मृतदेहांची विटंबना आणि त्याविरोधात आवाज उठवणाऱ्या ‘दैनिक नायक’च्या संपादक आणि कार्यकारी संपादकांवर गुन्हा दाखल करुन दडपशाहीचा प्रयत्न करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत सुरेश थोरात यांना अखेर राज्याच्या आरोग्य विभागाने तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या ‘कसाई’ डॉक्टरवर झालेली ही कारवाई म्हणजे ‘दैनिक नायक’ने मांडलेल्या सत्याचा विजय असून, संगमनेरच्या आरोग्य व्यवस्थेतील भ्रष्ट व्यवस्थेला सणसणीत चपराक बसली आहे.
घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात मयत सिद्धांत नितीनकुमार कादरी याच्या मृतदेहाची ३६ तास विटंबना झाली. या धक्कादायक प्रकारावर ‘दैनिक नायक’ने माणुसकीच्या नात्याने अत्यंत झणझणीत प्रकाश टाकला होता. मात्र, आपल्या कर्तव्यातील त्रुटी मान्य करुन दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी, डॉ. प्रशांत थोरात या महाभागाने जणू आपण ‘साव’ असल्याचा आव आणला. ‘नायक’चे वृत्त आपली बदनामी करणारे असल्याचा खोटा कांगावा करत, त्यांनी पोलिसांना हाताशी धरुन थेट संपादक गोरक्षनाथ मदने व कार्यकारी संपादक श्याम तिवारी यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याची खेळी खेळली.
शासकीय नियमांनुसार, टीकात्मक बातम्यांनंतर संबंधित अधिकाऱ्याने खुलासा देणे अपेक्षित असते. परंतु, डॉ. थोरातांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता, ‘साटेलोटे’ असल्यासारखे वागत पोलिसांकडे धाव घेतली. प्रशासकीय शिस्त आणि वैद्यकीय नीतिनियम धाब्यावर बसवून ‘नायक’ला दाबण्याचा हा प्रयत्न आता त्यांच्याच अंगलट आला आहे.
मयत सिद्धांत कादरी यांच्या वडिलांची तक्रार आणि ‘दैनिक नायक’ने चालवलेली वृत्तमालिका यांची गंभीर दखल घेत आमदार अमोल खताळ यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना सक्त कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. चौकशी समितीने ‘नायक’ने उपस्थित केलेले सर्व प्रश्न आणि आरोप हे सत्य असल्याचे सिद्ध केले. या अहवालावर शिक्कामोर्तब होताच राज्याच्या आरोग्य विभागाने डॉ. प्रशांत थोरात यांना निलंबित केले आहे.
निलंबनाच्या कालावधीत डॉ. थोरात यांना छत्रपती संभाजीनगर रुग्णालयात मुख्यालयी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली असून, या काळात कोणताही ‘खाजगी उद्योग’ केल्यास थेट बडतर्फीची कारवाई करण्याचा कडक इशारा देण्यात आला आहे.
​’नायक’चा नैतिक विजय..!
दैनिक ‘नायक’च्या निर्भय पत्रकारीतेमुळे मयत सिद्धांत यांच्या पित्याला अखेर न्याय मिळाला आहे. “ग्रामीण रुग्णालय की कसाईखाना” असा सवाल उपस्थित करुन ‘नायक’ने ज्या जिद्दीने या प्रकरणाचा पाठपुरावा केला, त्यामुळे संगमनेरच्या जनतेतून या रोखठोक भूमिकेचे कौतुक होत आहे. सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या ‘नायक’ला अशा कारवायांनी कधीही दाबले जाऊ शकत नाही, हेच या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
Visits: 9 Today: 9 Total: 1852410

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *