संगमनेरात पुन्हा सोनसाखळ्या चोरांची दहशत! महिलेचे तोंड दाबून भररस्त्यात लुटले; गुन्हे शाखेला प्रतिमा उजाळण्याची संधी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्याकाही दिवसांत काहीशा थंडावलेल्या जिल्ह्यातील सोनसाखळी चोरीच्या घटनांनी पुन्हा डोके काढायला सुरुवात केली असून सोमवारी गोल्डनसिटीजवळ महिलेचे तोंड दाबून दीड लाखांचे दागिने ओरबाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अतिशय वर्दळीच्या रस्त्यावर घडलेल्या या घटनेत नेहमीप्रमाणे पाठीमागून अथवा समोरुन येत गंठण ओरबाडण्याचा पर्याय असताना चोरट्यांनी पायी चालत येवून महिलेचे तोंड दाबले व त्यानंतर त्यांच्या अंगावरील सर्व दागिने ओरबाडून पळ काढला. सोनसाखळी चोरीच्या आजवरच्या घटनांमध्ये चोरट्यांनी पहिल्यांदाच वापरलेली ही पद्धत बहुधा या क्षेत्रात नव्या टोळीच्या प्रवेशाची चाहूलही ठरु शकते. या घटनेने ऐन सणासुदीच्या काळात महिलांमध्ये दहशत निर्माण झाली असून पोलिसांसमोर तपासाचे आव्हान आहे. जिल्ह्यात यापूर्वी नित्याच्या असलेल्या सोनसाखळी चोरीच्या प्रकरणांमध्ये एलसीबीने केलेले ‘प्रताप’ जिल्ह्याला चांगलेच अवगत आहेत, त्यामुळेच जिल्हा पोलीस प्रमुखांनी या शाखेच्या प्रमुखांसह 39 जणांचा खांदेपालट करुन मोठी स्वच्छता मोहीमही राबवली. त्यांचा विश्वास सार्थ ठरवून मागील दोन वर्षात खालावलेली प्रतिमा उजाळण्याची संधीही या प्रकरणातून गुन्हे शाखेला मिळाली आहे. त्यांच्याकडून ती साधली जाते की, ये रेऽ माझ्या मागल्या प्रमाणेच कारभार सुरु राहतो हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

याबाबत तक्रारदाराकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदरची घटना सोमवारी (ता.18) रात्री साडेआठच्या सुमारास अकोले बायपास रस्त्यावरील गोल्डनसिटीच्या प्रवेशद्वाराजवळ घडली. या परिसरातील गोविंदनगरमध्ये राहणार्या सुवर्णा रमेश काळे कॉर्नरवरील किराणा दुकानातून आवश्यक
वस्तू घेवून घराकडे निघाल्या होत्या. यावेळी बायपास रस्त्यावरुन दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळही बर्यापैकी सुरु होती. काळे यांनी बायपासवरुन गोल्डनसिटीकडे वळण घेताच रस्त्यावर थांबलेल्या एका दुचाकीवरील पाठीमागे बसलेल्या चोरट्याने काही क्षणात त्यांच्या पाठीमागून जावून त्यांचे तोंड दाबले. अचानक घडलेल्या या प्रकाराने घाबरलेल्या 62 वर्षीय सुवर्णा काळे यांना ओरड्याची संधीही मिळत नसल्याने त्या हतबल झाल्या, त्याचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण व 30 ग्रॅम वजनाचे चांदीचे शिवलिंग असा जवळपास दीड लाखांचा मुद्देमाल ओरबाडून जवळच उभ्या असलेल्या दुचाकीवरुन नाशिकच्या दिशेने पळ काढला.

मंगळवारी (ता.19) दुपारी त्यांनी आपल्या पतीसह शहर पोलीस ठाण्यात येवून तक्रार दाखल केली आहे. त्यावरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम 309 (4) प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग यांच्याकडे दिला आहे. या
घटनेतून गेल्या काही दिवसांपासून थंडावलेल्या सोनसाखळी चोरीच्या प्रकारांनी पुन्हा डोके काढायला सुरुवात केल्याचे दिसत असून यावेळी चोरट्यांनी रस्त्यावर थेट तोंड दाबून दागिने ओरबाडल्याने महिलांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलिसांवरील दबावही वाढणार असून या प्रकरणाचा तपास लावून महिलांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

सोनसाखळी चोरीच्या बहुतेक प्रकरणांमध्ये आंतरतालुका व आंतरराज्य टोळ्यांचा सहभाग असतो. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेकडून जिल्ह्यात घडणार्या अशा घटनांचा समांतर तपास केला जातो. सोमवारी संगमनेरात घडलेल्या प्रकरणातही स्थानिक पोलिसांसह एलसीबीकडूनही चोरट्यांचा
माग शोधला जात आहे. गेल्या दोन-अडीच वर्षांच्या काळात स्थानिक गुन्हेशाखेचा कारभार विचारात घेतल्यास जिल्ह्यात घडलेल्या सगळ्याच अशा घटनांचे तपास स्वतःकडे घेवून या शाखेने अक्षरशः धिंगाणा घातला होता. दक्षिणेतील एखाद्या चित्रपटाचे कथानक शोभावे अशापद्धतीने जिल्ह्याने अनुभवलेला हा काळ आता सरलाय खरा, मात्र त्याची अनुभूती अद्यापही नसल्याने सर्वसामान्याना झालेला बदलही आभास वाटत आहे.

कधीकाळी जिल्ह्याच्या गुन्हेगारी वर्तुळात ‘धाक’ असलेल्या स्थानिक गुन्हेशाखेला नव्या दमाच्या शिलेदारांसह गेल्या दोन-अडीच वर्षात या शाखेने गमावलेली पत, विश्वास पुन्हा मिळवण्याची, मलिन झालेली प्रतिमा सुधारण्याची संधी चालून आली आहे. त्याचे सोनं करण्यात ही शाखा यशस्वी ठरते की मागच्याच पदचिन्हांवर पाऊल ठेवून येरेऽ माझ्या मागल्याची पुनरावृत्ती करते हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. तूर्त संगमनेरातील या अनोख्या सोनसाखळी चोरीच्या प्रकरणाने ऐन सणासुदीच्या कालावधीत महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

चार वर्षांपूर्वी तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी संगमनेर उपविभागातील सोनसाखळी चोरीच्या घटना गांभीर्याने घेताना श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील विनोद उर्फ खंग्याची टोळी उध्वस्त केली होती. त्यांच्या या धाडशी कारवाईनंतर दीर्घकाळ उपविभागासह बहुतेक जिल्ह्यातील सोनसाखळी चोरीच्या घटनांना चाप लागला होता. मात्र
गेल्या दोन-अडीच वर्षात एलसीबीने जिल्ह्यातील गुन्हेगारीची व्याख्याच बदलून टाकल्याने या कालावधीत घडलेल्या अशा घटना ‘अज्ञात’ ठरल्या. त्यातून शाखेसह जिल्हा पोलीस दलाची प्रतिमाही मलिन झाली. ती सुधारण्यासाठी पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेत अमुलाग्र बदल केले असून अनेक वतनदारांची वतनंही खालसा केली आहेत, आता या शाखेने आपले कसब दाखवण्याची वेळ आली असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष गुन्हे शाखेच्या कामगिरीकडे लागले आहे.

