शेतीच्या वादातून जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू मडके येथील बापलेकांवर शेवगाव पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल


नायक वृत्तसेवा, शेवगाव
तालुक्यातील मडके येथे शेताच्या बांधावरील काट्या काढल्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने पोलिसांनी त्यास मारहाण करणार्‍या बापलेकांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सीताराम रणजीत वडघणे (55) व नामदेव सीताराम वडघणे (35, रा. दोघेही मडके, ता. शेवगाव) असे खुनाचा गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांना तत्काळ अटक केली आहे. तर योगेश दिलीप वडघणे (22) असे या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मडके येथे शेतीच्या बांधावरील बोरीच्या काट्या का काढल्या या कारणाने 8 जुलै रोजी वडघणे कुटुंबात वाद होऊन त्यात योगेश दिलीप वडघणे व त्याची आई रुक्मिणी दिलीप वडघणे यांना संशयित बापलेकांनी लाकडी काठ्यांनी मारहाण केली होती. यात दोघेही जबर जखमी झाले होते. योगेशच्या डाव्या हाताला जबर मारहाण झाल्याने गंभीर दुखापतीमुळे अहमदनगर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते.

परंतु दुखापत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला औरंगाबाद येथे खाजगी रुग्णालयामध्ये 12 जुलै रोजी दाखल केले होते. त्याच्यावर उपचार सुरू असताना काही तासांत योगेश वडघणे याचा उपचारादरम्यान बुधवारी (ता.13) मृत्यू झाला. यामुळे शेवगाव पोलिसांनी संशयितांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना रात्री अटक करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक विश्वास पावरा, काळोखे, राजू ढाकणे हे करीत आहेत.

Visits: 155 Today: 1 Total: 1583697

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *