अकोले तालुक्यात लवकरच शिंदे गटाचा मेळावा ः दराडे बाजीराव दराडेंनी पत्रकार परिषदेतून दिली माहिती


नायक वृत्तसेवा, अकोले
हिंदुत्व शिवगर्जना अभियानांतर्गत शिंदे शिवसेना गटाचा उत्तर नगर जिल्ह्यातील पहिला मेळावा खासदार सदाशिव लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले तालुक्यात लवकरच होणार असून, सुमारे दहा हजार सच्चे शिवसैनिक या मेळाव्यास उपस्थित राहतील असा विश्वास व्यक्त करुन उत्तर नगर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरेंचे वक्तव्य लोकशाहीला न शोभणारे असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे यांनी म्हंटले आहे.

अकोलेतील बाजीराव दराडे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसैनिक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस संजय वाकचौरे, सुरेश भिसे, सुदाम नवले, बाळासाहेब मालुंजकर, संपत पवार, साहेबराव दातखिळे, अनिल गायकवाड आदी उपस्थित होते. पुढे बोलताना बाजीराव दराडे म्हणाले, 21 सप्टेंबरला राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई व खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर येथे दक्षिण नगर जिल्ह्याचा हिंदुत्व शिवगर्जना अभियान मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यास अकोलेतून परस्पर दीडशेच्या वर सच्चे शिवसैनिक उपस्थित होते. हा मेळावा संपल्यावर शिवसेना उत्तर नगर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी खासदार सदाशिव लोखंडे यांनी बिगर पोलीस बंदोबस्तात उत्तर नगर जिल्ह्यात मेळावा घेऊन दाखवावा असे आव्हान दिले. त्या आव्हानाला उत्तर देण्यासाठी व आव्हान स्वीकारले म्हणून सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतली आहे.

अकोले तालुक्यात होणार्‍या या मेळाव्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक कार्यकर्ते शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार असून हा मोठा राजकीय भूकंप होणार आहे, असा दावाही त्यांनी केला. तसेच अकोले तालुक्यात शिंदे गटाची शिवसेना एक नंबरला राहील असे आम्ही काम करणार आहोत. राज्यात एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाल्यापासून उत्साह आहे. दोन अडीच महिन्यात अनेक विकासकामांचा धडाका लावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार सदाशिव लोखंडे यांच्या माध्यमातून अकोले तालुक्यात विकासकामे करणार आहोत. प्रलंबित कामे लवकर सुरू होणार आहे. दरम्यान, ज्यांच्यावर तालुक्यात शिवसेनेची जबाबदारी होती त्यांनी कोणतीही विकासकामे आणली नाही, संघटन वाढवले नाही, शिवसेना ही प्रायव्हेट कंपनी केली, त्यांनी कार्यकर्त्यांवर दडपशाही करू नये. आता शिवसेनेचे दोन घरे झाली आहेत, तुम्ही आहे तेथे सुखी राहा. अराजकता माजविण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही मेळावा घेणारच आहोत. कोणी आडवे येण्याचा प्रयत्न करू नका, असा इशाराही बाजीराव दराडे यांनी दिला आहे.

अहमदनगर येथील मेळाव्याला 150 ते 200 सामान्य शिवसैनिक गेले तर त्यांना तालुक्यातील काहीजण फोन करुन धमक्या देवून तुम्हाला कोण घेऊन गेले, कशाला गेले अशी दडपशाही करत आहे. मात्र आता अशा दडपशाहीला कोणी शिवसैनिक घाबरणार नाही व धमकावून कोणी थांबणार नाही असा इशारा बाजीराव दराडे यांनी देवून जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरेंना आम्हांला विकासाची कामे करायचे, आम्ही कुठे जायचे हे तुम्ही सांगायची गरज नाही असे म्हणाले.

Visits: 167 Today: 1 Total: 1787967

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *