खंडोबा देवस्थानचा ‘क’ वर्गात समावेशासाठी प्रयत्न करणार : आ. डॉ. लहामटे वनकुटे येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कलाशारोहण व ध्वजारोहण सोहळा संपन्न
नायक वृत्तसेवा, घारगाव
श्री स्वयंभू खंडोबा देवस्थानचा ‘क’ वर्गात समावेश व्हा म्हणून तुम्ही लवकरात लवकर प्रस्ताव तयार करा आणि तो जिल्हा परिषदेत पोहोच करा. त्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे आल्यानंतर मंजूर करण्याचे काम मी करेल असे आश्वासन आमदार डॉ. किरण लहामटे यांनी वनकुटे ग्रामस्थांना दिले.
संगमनेर तालुक्यातील वनकुटे येथील श्री स्वयंभू खंडोबा मंदिर जिर्णोद्धार, कलाशारोहण व ध्वजारोहण सोहळा तसेच अखंड हरिनाम कीर्तन महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, माजी पंचायत समिती सदस्य संतोष शेळके, एनएसयूआयचे गौरव डोंगरे, जयहिंद युवा मंचचे सुहास वाळुंज, आंबीदुमालाचे सरपंच जालिंदर गागरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आमदार डॉ. किरण लहामटे म्हणाले, वनकुटे ग्रामस्थांनी खंडोबाचे सुंदर मंदिर बांधले असून मूर्तीही अतिशय सुंदर आहे. आता पुन्हा एकदा खंडोबा देवस्थान विकासासाठी अजून वीस लाख रुपयांचा निधी देतो. त्याचबरोबर खंडोबा देवस्थान ‘क’ वर्गात आले तर तुम्हांला आमच्याकडे निधी मागण्याची गरज भासणार नाही. कारण सरकारकडूनच ‘क’ वर्गासाठी मोठा निधी मिळत असतो. त्यामुळे लवकरात लवकर ‘क’ वर्गाचा प्रस्ताव तयार करा आणि ती जिल्हा परिषदेत पोहोच करा. त्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे आली की मंजूर करण्याचे काम मी करेल असा शब्दही आमदारांनी ग्रामस्थांना दिला. खरेतर आपली लोकचं सुंदर आहे आणि खूप भोळीभाबडीही आहेत. राजकारण, समाजकारण करायचे तर गावाच्या हिताचे करा. गावच्या यात्रौत्सवामध्ये कधीच राजकारण आलू नका. कोणीही जरी पुढारी आले तर ते आपल्या सगळ्यांना सारखे आहे. कुणाला उण्याधुण्याची वागणूक देवू नका. तसेच वनकुटे येथे मधल्या मार्गाने येताना ब्राह्मणवाडापासूनचा जो रस्ता राहिला आहे तो मुख्यमंत्री सडक योजनेतून घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अजय फटांगरे म्हणाले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे वनकुटे गावावर प्रचंड प्रेम आहे. भोजदरी ते वनकुटे या मधल्या रस्त्याने शाळकरी मुलांना जाण्यासाठी खूप त्रास होत होता. त्या रस्त्याचे कामही मार्गी लावले. तसेच कोठे बुद्रुक ते खंडोबा मंदिर या रस्त्याचे काम केले आहे. खरोखर आपल्याला डॉ. आमदार किरण लहामटे यांच्या रूपाने नवीन आमदार मिळाले आहे. त्यांनी अनेक विकास कामे केली आहे. आपण कोठे येथील देवस्थान ‘क’ वर्गामध्ये केल्यानंतर आमदार डॉ. लहामटे यांनी भिंतीसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला. तर बाकीच्या उरलेल्या कामासाठीही आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून दिल्याचे सांगितले. दरम्यान त्रिदिनात्मक पंचकुंडीय मूर्ती प्राणप्रतिष्ठा, श्री स्वयंभू खंडोबा मंदिर जिर्णोद्धार, कलाशारोहण, ध्वजारोहण सोहळा व अखंड हरिनाम कीर्तन महोत्सवासाठी मोठ्या संख्येने भाविक आले होते.