अहमदनगर जिल्ह्यात आता हस्तीदंताचीही होतेय तस्करी! स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; सहा जणांकडून मौल्यवान हस्तीदंत जप्त..

नायक वृत्तसेवा, अहमदनगर
विविध अंमली पदार्थांसह गावठी कट्टे व तलवारींच्या तस्करीचे केंद्र बनू पाहणार्‍या अहमदनगर जिल्ह्यातून आता मौल्यवान हस्तीदंताची तस्करीही होत असल्याचे समोर आले आहे. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेने नगर-औरंगाबाद महामार्गावर केलेल्या धडक कारवाईतून ही बाब समोर आली असून पोलिसांनी तस्करी करणार्‍या दोघांकडून लाखों रुपये किंमतीचे दोन हस्तीदंत जप्त केले असून ते खरेदी करण्यासाठी आलेल्या चौघांसह एकूण सहा जणांना अटक केली आहे. याबाबत औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शाखेकडून या प्रकरणाची पाळेमुळे खोदण्यास सुरु झाली आहे. या वृत्ताने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत स्थानिक गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी (ता.1) नगर-औरंगाबाद महामार्गावरील जेऊर टोलनाका परिसरात हस्तीदंत विक्रीचा व्यवहार होणार असल्याची गोपनीय माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना समजली. त्यानुसार त्यांनी गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना आवश्यक त्या सूचना देत कारवाईचे आदेश दिले. पो.नि.कटके यांनी सहाय्यक निरीक्षक गणेश इंगळे, उपनिरीक्षक सोपान गोरे, सहाय्यक फौजदार राजेंद्र वाघ, हेड कॉन्स्टेबल बापूसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक भिमराज खर्से, सुरेश माळी, शंकर चौधरी, रवी सोनटक्के, पोलीस शिपाई सागर ससाणे व मच्छिंद्र बर्डे यांचे पथक तयार करुन त्यांना साध्या वेशात जेऊर टोलनाका येथे सापळा लावण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार पोलीस पथकाने त्याठिकाणी जावून सापळा लावला असता काही वेळातच दोघेजण टोलनाका परिसरात आले. त्यांच्या वावरण्यावर पोलिसांना संशय आल्याने त्यांच्यावर नजर ठेवण्यास सुरुवात झाली असता त्यातील एकाच्या पाठीवरील सॅकमध्ये काहीतरी टोकदार वस्तु असल्याचे व ती सॅकच्या बाहेर आल्याने त्याला कापड गुंडाळलेले असल्याचे पोलिसांना दिसले. त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार हेच आरोपी असावेत असा पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर काही वेळातच एक राखाडी रंगाची कार त्या दोघांजवळ येवून उभी राहीली, त्यात चौघेजण होते. यावेळी त्या दोघांनीही आपल्या जवळील सॅकमध्ये ठेवलेली हस्तीदंतासारखी वस्तु बाहेर काढून ती त्यांना दाखवण्यास सुरुवात केली.

सदर मिळालेल्या माहितीची खातरजमा होताच एकमेकांना इशारा करीत आसपास दडून बसलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने एकाचवेळी त्यांच्यावर झडप घातली आणि आधी आलेल्या दोघांसह नंतर कारमधून आलेल्या चौघांच्याही जागीच मुसक्या आवळल्या. त्याच्या ताब्यातील सॅक जप्त करुन तिची तपासणी केली असता त्यात दोन हस्तीदंत असल्याचे पोलिसांना आढळले. त्यासर्वांसह हस्तीदंत व राखाडी रंगाची आय 20 कार ताब्यात घेवून त्यांना गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणल्यानंतर त्यांना त्यांची ओळख विचारण्यात आली असता सुरुवातीला हस्तीदंत घेवून जेऊर टोलनाक्यावर आलेल्या इसमांची नावे व्यंकटेश दुराईस्वामी (वय 40, ह.मु.दरेवाडी, ता.अहमदनगर) व महेश बाळासाहेब काटे (वय 30, रा.आखेगाव, ता.शेवगाव) असल्याचे सांगितले.

तर सदरचे हस्तीदंत खरेदी करण्यासाठी आलेल्या वाहनातील चौघांनी आपली ओळख महेश भगवान मरकड (वय 26, रा.गहिलेवस्ती, ता.शेवगाव), सचिन रमेश पन्हाळे (वय 33, रा.आखेगांव, ता.शेवगाव), निशांत उमेश पन्हाळे (वय 25, रा.भगतसिंग चौक, शेवगाव) व संकेत परशुराम नजन (वय 23, रा.पवारवस्ती, शेवगाव) असे असल्याचे सांगितले. सदरच्या हस्तीदंतांची तपासणी करण्यासाठी ते उपवन संरक्षण अधिकारी यांच्याकडे नेले असता त्यांनी हस्तीदंतासारखे दिसणारे ते दोन्ही दांत हत्तीचेच असल्याचे कळविले, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात त्याचे मूल्य अधिक असल्याने त्याची किंमत जाहीर करण्यास नकार दिला.

तस्करी होत असलेली वस्तू हस्तीदंतच असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी नगरच्या औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात वरील चौघांविरोधात भारतीय दंडसंहितेचे कलम 429 सह वन्यजीव संरक्षण अधिनियमाचे कलम 2 (16), 9 39, 44, 49 (ब), 50 व 51 प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्या सहाही जणांना गजाआड केले आहे. सध्या त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली असून त्यांनी सदरचे हस्तीदंत कोठून आणले, यापूर्वी त्यांनी अशाप्रकरची तस्करी केली आहे का? याचा पोलिसांकडून तपास केला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.


गेल्या काही वर्षात नगर-औरंगाबाद महामार्गाचा गुन्हेगारी हालचाली आणि कारवायांसाठी मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी गांजा तस्करी असो अथवा गावठी कट्ट्यांची तस्करी त्यासाठी याच महामार्गावरील वेगवेगळ्या गावांचा वापर केला गेला होता, आता त्यात हस्तीदंताच्या तस्करीचाही समावेश झाला असून जेऊर टोलनाका हे नवीन ठिकाण उदयास येवू पाहत आहे. याप्रकरणी अटक केलेल्या सहा जणांमधील तब्बल पाचजण एकट्या शेवगाव तालुक्यातील असल्याने नेवाशा पाठोपाठ आता शेवगावही गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनत असल्याचे दिसून येत आहे.

Visits: 126 Today: 1 Total: 1583198

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *