संगमनेरच्या गजबजलेल्या नेहरु चौकात लाखोंची घरफोडी! सिगारेटच्या खोक्यांसह रोकड लंपास; व्यापारी वर्गात चोरट्यांची दहशत..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दाट लोकवस्ती आणि सलग दुकानांची श्रृंखला या कारणांनी आजवर सुरक्षित वाटणार्या शहरातील ऐतिहासिक बाजारपेठेत चोरट्यांनी भररस्त्यावरील दुकान फोडून पोलिसांनाच आव्हान दिले आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत गुरुनानक मार्केट परिसरात असलेल्या साईनाथ ट्रेडींग कंपनी या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी दुकानातून चक्क उंची सिगारेटच्या खोक्यांसह दीड लाखांची रोकड मिळून सहा लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. काल सकाळी काहींना दुकानाची कुलुपं तुटलेल्या स्थितीत दिसल्यानंतर हा प्रकार समोर आला. चोरीची घटना दुकानातील सीसीटीव्हीमध्येही कैद झाली असून त्यावरुन चोरट्यांचा माग काढला जात आहे. विशेष म्हणजे लाखांवर लोकसंख्या पोहोचलेल्या संगमनेर शहराच्या कक्षा मर्यादा ओलांडून लगतच्या ग्रामीणभागात विस्तारल्यानंतरही तालुक्याची प्रमुख बाजारपेठ आजही गावठाणातच टीकून आहे. अतिशय दाट लोकवस्तीमूळे हा परिसर सुरक्षित क्षेत्र म्हणून आजवर ओळखला जात. मात्र या घटनेने त्याला छेद दिला असून पोलिसांनी या प्रकरणाचा गतीने तपास करुन व्यापार्यांना दिलासा देण्याची गरज आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार सदरची घटना सोमवारी (ता.19) पहाटेच्या सुमारास नेहरु चौकातील गुरुनानक मार्केट परिसरात घडली. संगमनेरच्या ऐतिहासिक बाजारपेठेला हमरस्त्यासह गावठाणाच्या गाभ्यात घेवून जाणारा नेहरु चौक म्हणजे कधीकाळी शहराच्या चळवळीचे केंद्र. स्वातंत्र्यपूर्व काळात पुणे-नाशिकच्या दिशेने प्रवास करण्यासाठी याच चौकात वाहने थांबत असतं. या चौकाने अनेक वक्त्यांचे शब्दही आपल्या आठवणीत साठवून ठेवलेले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातील काही मोजक्या ठिकाणी स्वातंत्र्याचे स्मृतीस्तंभ उभारले गेले, त्यात नेहरु चौकातील स्तंभाचा समावेश असून 15 ऑगस्ट 1947 रोजी या ठिकाणी स्वतंत्र भारताच्या सशस्त्र पोलिसांनी पहिले ध्वजारोहणही केले होते.

पूर्वी दर शनिवारी संगमनेरात भरणारा आठवडे बाजार म्हणजे महाराष्ट्रातील काही मोजक्या मोठ्या बाजारांमध्ये गणला जायचा. संगमनेर-अकोल्यातील शेकडों गावातील लोकांसह आसपासच्या तालुक्यांमधील व्यापारी व ग्राहक मोठ्या संख्येने या बाजारात यायचे. त्यामुळे शेतकर्यांच्या शेतीमालापासून सर्वकाही येथील बाजारपेठेत सहज उपलब्ध होते अशी ख्यातीही शहराने मिळवलेली. 2300 वर्षांचा इतिहास असलेल्या संगमनेरच्या बाजारपेठेला सातवाहनांच्या राजवटीपासून खूप महत्त्व आहे. तेव्हापासूनच तेव्हाचे संगमिका आणि आताचे संगमनेर व्यापारासह विविध सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय चळवळींचे केंद्रही राहीले आहे. अशा या शहरातील ऐतिहासिक बाजारपेठेच्या हृदयस्थानी असलेल्या नेहरु चौकात घडलेल्या चोरीच्या या घटनेने एकप्रकारे चोरट्यांनी पोलिसांनाच आव्हान दिले आहे.

नेहरु चौकातील साईनाथ ट्रेडींग कंपनी या नावाने असलेल्या कॉस्मेटीक्स, ड्रायफ्रूट, अगरबत्ती व पानमसाला विक्रीच्या दुकानात घरफोडीची ही घटना घडली. सोमवारी (ता.19) सकाळी पावणेसातच्या सुमारास दुकानाच्या आसपास राहणार्या काही नागरिकांनी दुकानाच्या छोट्या शटरचे कुलुपं तुटलेल्या अवस्थेत व एकाबाजूने ते उचकटल्याचे पाहीले. संशय आल्याने त्यांनी लागलीच याबाबत दुकानदार तनेशकुमार राजपाल यांना फोनवरुन कळवले. त्यातून काहीतरी अघटीत तर घडले नसावे? या संशयातून त्यांनीही तात्काळ दुकानाकडे धाव घेतली असता चोरट्यांनी दुकानात यथेच्छ लुट केल्याचे त्यांना दिसले. कष्टातून उभारलेल्या दुकानात चोरट्यांनी अस्ताव्यस्त केलेल्या वस्तू, उचकापाचक, नासधूस आणि बँकेत भरण्यासाठी गल्ल्यात ठेवलेल्या दीड लाखांच्या रोकडचा विचार मनात येवून त्यांना भोवळच आली.

आसपासच्या अन्य व्यापारी व रहिवाशांनी त्यांना धीर देत घटनेची माहिती पोलिसांना कळवली. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत आवश्यक पुराव्यांची जुळवाजुळव सुरु केली. सदरील घटना दुकानातील सीसीटीव्हीसह पळून जाताना आसपासच्या काही ठिकाणीही चित्रीत झाल्याने पोलिसांनी त्यावरुन चोरट्यांचा माग काढण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे चोरीचा हा प्रकार घडल्यानंतर गेल्या मालाची मोजदाद सुरु असताना दुसरीकडे अखिल सिंधी समाजातील ज्येष्ठ नागरिक, प्रतिथयश व्यापारी व राजपाल समूहाचे अध्वर्यू जोगींदर राजपाल यांचे निधन झाल्याने तनेशकुमार राजपाल यांचे लक्ष विचलीत झाले.

त्यामुळे प्राथमिक पाहणीत दुकानातून चोरीला गेलेल्या एकूण मुद्देमालात दुकानातील गल्ल्यात ठेवलेल्या दीड लाख रुपयांच्या रोकडसह एक लाख तीन हजार 800 रुपये किंमतीचे गोल्ड फ्लॅक प्रिमीयमच्या 12 हजार सिगारेट, गोल्ड फ्लॅक व मार्लबरो अॅडव्हान्स सिगारेटचे प्रत्येकी 80 हजार रुपये किंमतीचे प्रत्येकी 25 बॉक्स, गोल्ड फ्लॅक किंग व क्लासिक आईस बस्ट सिगारेटचे 64 हजार किंमतीचे प्रत्येकी 20 व ब्रिस्टोल कंपनीच्या 76 हजार 800 रुपये किंमतीच्या 12 हजार सिगारेट असलेला बॉक्स असा एकूण 6 लाख 18 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याचे समोर आले आहे. त्यावरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडीसह चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. अतिशय गजबजलेल्या बाजारपेठेच्या भागात घरफोडीचा हा प्रकार घडल्याने व्यापारी वर्गात दशहत निर्माण झाली असून पोलिसांसमोरही तपासाचे आव्हान आहे.

2011 सालच्या जनगणनेनुसार संगमनेर शहराची लोकसंख्या 65 हजार असली तरीही प्रत्यक्षात मात्र शहरासह आसपासच्या ग्रामीणभागात विस्तालेल्या उपनगरांसह शहरात दररोज एक लाखांहून अधिक माणसांचा राबता असतो. जरासंधाच्या नगरीपासूनचा इतिहास सांगणार्या आणि सातवाहनांच्या राजवटीत संगमिका असा उल्लेख सापडणार्या संगमनेरच्या बाजारपेठेलाही खूप मोठा इतिहास आणि महत्व आहे. शिवकाळात महाराजा शहाजीराजांसह राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचे वास्तव्य असताना त्यांनीही येथील बाजारपेठेत वेळ घालवल्याचे दाखले इतिहास देतो. त्यामुळे साहजिकच येथील बाजारपेठ अतिशय दाटीत आणि लोकवस्तीत विस्तारलेली आहे. एकमेकांना खेटून इमारती असल्याने चोरी, घरफोडी, दरोडे या सारख्या गोष्टी शहराच्या गावठाणात अभावानेच समोर आल्या आहेत. या घटनेत मात्र चोरट्याने थेट प्रचंड दाट लोकवस्तीच्या नेहरु चौकातील दुकानाला लक्ष्य करुन चक्क लाखों रुपयांच्या सिगारेट लंपास केल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. अनपेक्षित असलेल्या भागात घडलेल्या या धाडसी घटनेने पोलिसांसमोरही आव्हान उभे राहीले आहे, त्यांच्याकडून या प्रकरणाचा तात्काळ तपास होईल आणि व्यापार्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

