केंद्राच्या धोरणानुसार शेतकर्यांना एफआरपीप्रमाणे एकरकमी पेमेंट अदा करा!
केंद्राच्या धोरणानुसार शेतकर्यांना एफआरपीप्रमाणे एकरकमी पेमेंट अदा करा!
नेवासा मतदारसंघाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची मागणी
नायक वृत्तसेवा, नेवासा
केंद्र सरकारच्या धोरणानुसार एफआरपीप्रमाणे शेतकर्यांना पंधरा दिवसांतच एकरकमी पेमेंट अदा करावे, अशी मागणी नेवासा मतदारसंघाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी ज्ञानेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात माजी आमदार मुरकुटे यांनी सर्वप्रथम सुरू होणार्या गळीत हंगामासाठी शुभेच्छा देत मागणी केली आहे की, केंद्र सरकारच्या धोरणानुसार शेतकर्यांना एफआरपीनुसार एकरकमी पेमेंट पंधरा दिवसांच्या आत देणे बंधनकारक आहे. उसाचे उपपदार्थ मद्यार्क, इथेनॉल व सहवीजनिर्मिती प्रकल्प यामधून होणार्या नफ्याच्या पन्नास टक्के रकमेतून दुसरे व अंतिम टप्प्याचे पेमेंट अदा करण्यात यावे, त्याचप्रमाणे यावर्षीच्या गळीत हंगामात आपण 16 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करणार आहे; उर्वरित 6 ते 7 लाख मेट्रिक टन अतिरिक्त उसाची काय विल्हेवाट लावणार आहात याबाबत खुलासा करण्यात यावा असाही सवाल निवेदनातून करण्यात आला आहे.
1 जून ते 15 जूनच्या 20 टक्के उस लागवड नोंदी असताना आपण तोडणी कार्याक्रमाचे नियोजन कसे करणार आहात याबाबत खुलासा करण्यात यावा, ऊस लागवड नोंदणी ही उसतोड नियोजन तोडणी अधिकार्यांनी केलेल्या नोंदणीप्रमाणे होणार का याबाबत खुलासा करावा, कारखान्याची स्थावर मालमत्ता किती आहे व कारखान्यावर एकूण कर्ज किती आहे याबाबत खुलासा करावा अशा विविध मागण्या मुरकुटे यांनी केलेल्या आहेत. तर नेवासा, शेवगाव तालुक्यात खासगी कारखाना होत असताना आपण त्यास विरोध करत आहात. परंतु या कारखान्याच्या शुभारंभ कार्यक्रमास आपण उपस्थित होतात, कारखान्याच्या विरोधात आपण न्यायालयात याचिका देखील केली असून त्यावर आपण सभासद शेतकर्यांचा अनावश्यक पैसा खर्च करत आहे.
यांसह स्वतःच्या खासगी कारखान्याचे नियोजन करत आहात का हे स्पष्ट करुन कामगारांना दिवाळीसाठी बोनस किती करणार आहात, राज्यात सर्वात जास्त उसाचे गाळप आपण करत आहात तरी उस उत्पादक शेतकर्यांना राज्यात सर्वात जास्त ऊस दर देणार का ते किती देणार आहेत हे जाहीर करावे, ऊस वाहतूक रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे असताना दुरुस्ती कामे सुरु झाली नाहीत, ऊस तोडणी मजुरांना कोरोना-19 चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी व उपचारांसाठी आपण काय उपयोजना केली आहे, याबाबतही खुलासा करावा असे आवाहनही माजी आमदार मुरकुटे यांनी ज्ञानेश्वर कारखाना अध्यक्षांना निवेदनाद्वारे केले आहे.