नायक वृत्तसेवा, संगमनेर
वाढत्या रुग्णसंख्येने अख्खा तालुका हादरलेला असताना तालुक्याच्या पठार भागातून अत्यंत धक्कादायक असे वृत्त हाती आले आहे. चक्क साकुर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या नाकावर टिच्चून दोन होमिओपॅथी डॉक्टर परस्पर रुग्णांच्या एंटीजेन चाचण्या करून त्यांच्यावर उपचारही करीत असल्याचे समोर आले आहे. दोनच दिवसांपूर्वी निमगाव भोजापूर येथे चक्क पदवी नसतानाही रुग्णांवर उपचार करणाऱ्या मुन्नाभाईचा पडदा फार्श झाला होता. त्यानंतर आता साकुर मधून हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने तालुक्याच्या आरोग्य विभागाचे धिंदवडे निघाले आहेत. साकुरच्या ग्रामीण रुग्णालयाला वैद्यकीय अधीक्षक दर्जाचा अधिकारी लाभला आहे. भला मोठा पगार आणि दिमतिला सुविधांचा भंडार यात मस्त झालेल्या या अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे काही दिवसांपूर्वी याच डॉक्टरांनी उपचार केलेल्या व नंतर अत्यंत गंभीर अवस्थेत संगमनेरात दाखल झालेल्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला होता. सर्वसामान्य रुग्णांचा आधार समजल्या जाणाऱ्या तालुक्याच्या आरोग्य विभागाला आलेली ही सुस्ती झटकण्यासाठी आता संगमनेरच्या नेतृत्वालाच डोळे मोठे करावे लागणार आहेत, अन्यथा कोविडच्या नावाखाली सर्वसामान्य रुग्णांच्या जीवाशी खेळ करून, त्यांचा आर्थिक खून पाडण्याचा हा भयंकर प्रकार असाच अखंड सुरु राहील. राज्याचे नेतृत्व करणाऱ्या नामदार बाळासाहेब थोरात यांच्या तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेला गेल्या पंधरा वर्षात 60 बोगस डॉक्टरही शोधता आलेले नाहीत. आणि विशेष म्हणजे निमगाव भोजापूर येथील बोगस डॉक्टर असो, किंवा साकुर येथील डॉक्टरांचे बेकायदा गुन्हेगारी कृत्य असो ही दोन्ही प्रकरणं संगमनेरचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे व इन्सिडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम यांनी उघड केली आहेत. यात तालुका आरोग्य विभागाचा काडीचाही संबंध नाही.

गेल्या काही दिवसांपासून संगमनेर तालुक्यातील मृत्यु दरात मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. रुग्ण बरे होण्याच्या जिल्ह्याच्या एकूण सरासरीपेक्षा संगमनेर तालुक्यातील रुग्ण बरे होण्याची सरासरी उत्तम असताना तालुक्याच्या मृत्यु दरात अचानक वाढ होऊ लागल्याने त्याचे कारण शोधण्यासाठी संगमनेरच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी डॉ.शशिकांत मंगरुळे यांच्या नेतृत्वाखाली मंथन केले. त्यातून ग्रामीण भागातील डॉक्टर परस्पर संशयित रुग्णांवर उपचार करीत असल्याने व ते देखील चुकीचे होत असल्याने रुग्ण स्थानिक ठिकाणीच गंभीर होतो. त्यानंतर घाबरलेला डॉक्टर रुग्णाला पुढील उपचारांंसाठी संगमनेरला घेऊन जाण्याचा सल्ला रुग्णाच्या नातेवाईकाला देतो. संगमनेरला येईपर्यंत रुग्णाची अवस्था अतिशय गंभीर होते. त्यातच त्याच्यासाठी ऑक्सिजन अथवा वेंटीलेटर ची व्यवस्था मिळवण्यासाठी त्याच्या नागरिकांना या रुग्णालयातून त्या रुग्णालयात धावपळ करावी लागते आणि त्यातच रुग्णाचा मृत्यू होतो. अशा असंख्य घटना समोर आल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्याचा निश्चय करुन आपणच या मोहीमेचे सारस्थ करण्याचा निर्णय प्रशासनातील तिनही अधिकाऱ्यांनी घेतला.

त्यानुसार डॉ.मंगरुळे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे व तहसीलदार अमोल निकम हे तिघेही आज दुपारी तालुक्याच्या पठार भागातील आरोग्य व्यवस्थेची पाहणी करीत होते. यावेळी साकुरच्या ग्रामीण रुग्णालयाच्या अंतर्गत येणाऱ्या गावांचा, तेथील संस्थात्मक विलगीकरण व उपचार केंद्रांचा आढावा घेत असताना साकुर येथील डॉ.अविनाश रासने व डॉ.संजय टेकुडे हे दोघे अनुक्रमे समर्थ हॉस्पिटल व ओमसाई हॉस्पिटल या ठिकाणी कोविड रुग्णांवर उपचार करीत असल्याचे त्यांना समजले. तेथील व्यवस्था पाहण्यासाठी अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी भेट दिली असता दोन्हीही डॉक्टर होमिओपॅथीक पदवीधारक असून त्यांना ॲलोपॅथी उपचार देण्याची परवानगी नाही. यासोबतच संबंधित ठिकाणी बेकायदेशीररित्या साठवून ठेवलेल्या रॅपिड एंटीजेन चाचणीच्या किटही अधिकाऱ्यांना आढळून आल्या. अधिक चौकशी करता संबंधित दोन्ही डॉक्टर रुग्णांच्या परस्पर एंटीजेन चाचण्या करून पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांवर कोणतीही परवानगी नसताना बेकायदेशीरपणे कोविडचे उपचार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

यावेळी तिन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित दोन्ही होमिओपॅथिक डॉक्टरांचा जागेवरच पाणउतारा केला. यावेळी मोठी गर्दी जमा झाली होती. विशेष म्हणजे पठार भागातील साकुर म्हणजे पठाराच्या राजधानीचा दर्जा असलेली मोठी बाजारपेठ. संगमनेर व पारनेर तालुक्यातील व्यापाऱ्यांची मोठी वर्दळ असलेल्या साकुरचा व्यावसायिक परीघही मोठा असून आजूबाजूला तुरळक तुरळक लोकसंख्येची अनेक गावे व वाड्या-वस्त्या आहेत. आदिवासी वस्त्यांची किनार असलेल्या या भागासाठी साकुर येथे ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय अधीक्षक दर्जाचा वैद्यकीय अधिकारी नियुक्त आहे. असे असतानाही त्यांच्या नाकावर टिच्चून भर लोकं वस्तीतील दोन रुग्णालयांमध्ये कोणतीही कायदेशीर परवानगी नसताना व मुळात उपचार करण्याचा अधिकारच नसतानाही कोविड रुग्णांवर बिनधास्तपणे दोन डॉक्टरांचा ‘धंदा’ जोमात सुरु असूनही त्याची भणक साकुरच्या वैद्यकीय अधीक्षकांना लागू नये याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. तालुक्याच्या पठार भागात अधीक्षक महोदयांच्या आशीर्वादाने अजून अशी किती बेकायदा रुग्णालये सुरू असतील याचाही शोध घेण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

प्रशासनाने वारंवार मनाई करूनही संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात अजूनही नागरिक शहरातील रुग्णालयांकडे येण्यास घाबरत आहेत. त्यामुळे भीतीपोटी अनेक नागरिक अशा डॉक्टरांच्या जाळ्यात अडकून आपल्या जीवाला अशा डॉक्टरांच्या हवाल्यावर सोडीत आहेत. मुळात होमिओपॅथी उपचार पद्धती आणि ॲलोपॅथी उपचार पद्धतीत खुप फरक आहे. सध्या कोविडवरील उपचार ॲलोपॅथी पद्धतीने केले जातात. त्यामुळेे ही उपचार पद्धती संबंधितांना माहीत नसते. त्यामुळे त्यांच्याकडून चुकीचेे उपचार होण्याचीच शक्यता अधिक असते. त्यामुळे संसर्ग होऊन जसेेेेेे जसे दिवस उलटतात, तसा रुग्णाच्या शरीरातील संसर्ग वाढत जातो. संसर्ग झाल्यापासून पाचव्या ते आठव्या दिवसापर्यंत तो जवळपास अत्यवस्थ अवस्थेत पोहोचतो.

अशावेेेळी घाबरलेला स्थानिक डॉक्टर रुग्णांना तत्काळ संगमनेरातील रुग्णालयांमध्ये हलविण्याचा सल्ला देतात. मग सुरू होते रुग्णवाहिकेेेची शोधाशोध, रुग्णालयाची शोधाशोध, सापडलेच तर मग ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची शोधाशोध. अशात खूप वेळ निघून जातो आणि रुग्णालय सापडण्यापूर्वीच अनेक रुग्णांंचे प्राण पाखेरु रस्त्यातच उडून जातात. आत्तापर्यंत अशा अनेक घटना समोर आल्याने तालुक्याच्या मृत्युुदरात अचानक वाढ झाली आहे. मात्र तालुक्याची ढिसाळ झालेली आरोग्यव्यवस्था इतक्या गंभीर स्थितीतही आपली व्यवस्था सुधारण्याचे नाव घेत नसल्याने संगमनेर तालुक्याच्या नेतृत्वालाच आता आरोग्य यंत्रणेकडे लक्ष द्यावे लागणार आहे. अन्यथा येणाऱ्या काळातील संक्रमणाचे अंदाज लक्षात घेता संगमनेर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांची अवस्था बिकट होण्याची दाट शक्यता आहे.

आपल्या कार्यक्षेत्रात एकही बोगस डॉक्टर नाही असे प्रतिज्ञापत्र तालुक्यातील दहा ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून लिहून घेण्यात आलेले होते. निमगाव भोजापूर येथे सापडलेला मुन्नाभाई जवळेकडलग प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत आहे. असे असतानाही तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ.उषा नंदकर यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले. या कारणास्तव तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना नोटीसही बजावली आहे. गेल्याच आठवड्यात ही घटना समोर आल्यानंतर उडालेली खळबळ शांत होते तोच आता साकुर येथील चक्क ग्रामीण रुग्णालयाच्या नाकावर टिच्चून अधिकार नसतानाही दोन-दोन रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांवर उपचार सुरु होते व तेथून संगमनेरात पाठवलेल्या दोन रुग्णांचा अलीकडेच मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे. गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांनी साकुरच्या वैद्यकीय अधीक्षकांना संबंधित दोन्ही रुग्णालयांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. डॉ.अविनाश रासने याचे समर्थ हॉस्पिटल व डॉ.संजय टेकुडे यांचे ओमसाई हॉस्पिटल सील करण्यात आले आहे. याबाबत साकुरच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक किती प्रामाणिकपणे संबंधित दोघांवर कठोर कायदेशीर कारवाई करतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

निमगाव भोजापूर येथील बोगस डॉक्टरचे प्रकरण असो अथवा साकुर येथील बेकायदेशीर कोविड उपचार केंद्र असो यांचा परदा फार्श करण्यात संगमनेरचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे व तहसीलदार अमोल निकम या तीन अधिकाऱ्यांचा सहभाग आहे. प्रशासनातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना अशा पद्धतीच्या कारवाया कराव्या लागत असतील तर मुळात ती करण्याची जबाबदारी असलेले उच्चपदस्थ, लाखो रुपये पगार घेणारे वैद्यकीय अधिकारी काय करतात असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तर चक्क आपल्या पत्नीच्या नावावर मालदाड रोड येथे खासगी कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. आता तेथे कमाई होत असताना आणि वर शासकीय पगारही सुरू असताना तालुक्यात कोण जगतं आणि कोण मरतं याच्याशी त्यांना काही घेणंदेणं नसल्यागत चित्र आहे. निमगाव भोजापूर प्रकरणात दुपारी छापा पडूनही प्रत्यक्ष गुन्हा दाखल करण्यास मध्यरात्र उलटली होती. यावरूनच तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचे संपूर्ण चित्र स्पष्ट होते. महामारीच्या काळात या संपूर्ण अनागोंदीचे दुष्परिणाम संपूर्ण तालुक्याला भोगावे लागतील. त्यामुळे तालुक्याच्या नेतृत्वाने या गोष्टीला गांभीर्याने घेऊन तालुक्याच्या आरोग्य व्यवस्थेत बदल करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.

Visits: 200 Today: 1 Total: 1415652
Post Views:
3,821