पंधरवड्यापूर्वीच्या घटनेत आणखी सात तोळे दागिन्यांची भर! बसस्थानकातील चोरी; यावेळी पोलिसांच्या सोन्याचा भाव आणखी खालावला..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गुन्हेगारी घटना असूनही दाखल करण्यात टाळाटाळ, अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करुन तक्रारदाराची बोळवण, अवैध धंद्यांना खुले समर्थन आणि कर्तव्याचा मात्र विसर अशा असंख्य गोष्टींनी काळवंडलेल्या संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आता कर्तव्य सोडून सुवर्ण परीक्षण करणार्‍यांचीही भर पडली आहे. यातून घटनेचे गांभीर्य कमी करुन ‘चामडी’ वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु असून त्यात आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. या घटनेत गेल्या पंधरवड्यापूर्वीच्या रविवारी (ता.7) संगमनेर बसस्थानकातील चोरीच्या दोन घटनांमध्ये आता त्यावेळी राहुन गेलेल्या तिसर्‍या घटनेचाही समावेश झाला असून यावेळी पोलिसांच्या मुखी सोन्याचा दर आणखी खालावला असून त्याचे मूल्य अवघे साडेदहा हजारांवर आले आहे. ‘त्या’ दिवशीच दुपारी चार वाजता घडलेल्या या प्रकारात एका वृद्ध दाम्पत्याचे बाजारमूल्याने सव्वाचार लाख रुपये किंमतीचे मात्र पोलिसांच्या ‘ज्ञानानुसार’ अवघ्या 75 हजारांचे सात तोळे वजनाचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पंधरवड्या पूर्वीच्या रविवार आणि सोमवार अशा दोनच दिवसांत संगमनेर बसस्थानकातून तब्बल पंधरा लाख रुपये किंमतीचे तब्बल 25 तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबवल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना रविवारी (ता. 7 मे) संगमनेर बसस्थानकात घडली. या घटनेत सेवानिवृत्त असलेले मूळचे पिंपळगाव नाकविंदा येथील मात्र सध्या ठाण्यात स्थायिक असलेले पंढरीनाथ कारभारी लगड दुपारी चारच्या सुमारास आपल्या पत्नीसह बसची वाट बघत होते. याचवेळी चोरट्यांनी आपला कार्यभाग उरकीत त्यांच्या पिशवीतील पाच तोळ्यांचे गंठण व दोन तोळ्यांची पोत लांबविली. तत्पूर्वी चोरट्यांनी शहरातील मेहेरमळा येथे राहणार्‍या बद्रीनाराण लोहे यांचे गळ्यातील दोन तोळ्याची पदकं असलेली सोनसाखळी व पिंपळगाव माथा येथील शांताबाई काशिनाथ सावंत (वय 65) यांच्या पिशवीवर डल्ला मारीत सोन्याची नथ व हातकडे (ब्रासलेट) असा एकूण सात तोळ्यांहून अधिक ऐवज लंपास केला होता.

या घटनेची फिर्याद बद्रीनारायण लोहे यांनी नोंदविली, त्याचवेळी सदरील वृद्ध दाम्पत्य तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले होते. मात्र तेथे पोहोचल्यावर लगड यांच्या पत्नीला घबराहट व अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी तक्रार देण्याचे टाळून घर गाठले. गेल्या पंधरवड्यात त्यांनी उपचार घेवून आराम केल्यानंतर सोमवारी (ता.22) हे दाम्पत्य पुन्हा शहर पोलीस ठाण्यात आले व त्यांनी सात मे रोजी घडलेल्या घटनेची पोलीस दप्तरी नोंद केली. त्यानुसार त्याच दिवशी दुपारी चार वाजता पंढरीनाथ लगड आणि त्यांची पत्नी बसची वाट पाहत असतांना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पिशवीतून पाच तोळ्याचे गंठण आणि दोन तोळ्याची पोतं असा बाजारभावाने 4 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला.

शहर पोलीस ठाण्यातील तज्ज्ञ सुवर्ण परिक्षकांनी मात्र त्याचे मूल्य 10 हजार 700 रुपये तोळ्याप्रमाणे गृहीत धरुन 75 हजार रुपयांचे दागिने चोरीला गेल्याची नोंद केली व हवालदार धनवट यांच्याकडे तपास सोपविला. या घटनेच्या दुसर्‍याच दिवशी सोमवारी (ता.8) दुपारी दीडच्या सुमारास निवृत्त मुख्याध्यापिका रजनी सूर्यभान सहाणे या सोनईला जाणार्‍या बसमध्ये चढत असतांना अज्ञाताने त्यांच्या पिशवीतून साडेदहा तोळ्यांचे आणि 6 लाख 30 हजार रुपये मूल्याचे दागिने लांबविले. लागोपाठ दोन दिवस घडलेल्या या चार घटनांमध्ये चोरट्यांनी जवळपास 15 लाख रुपये किंमतीचे 25 तोळे सोन्याचे दागिने ओरबाडून नेले. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपध्दतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

Visits: 196 Today: 3 Total: 1110835

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *