महिलांमुळेच आत्तापर्यंत कुळाचार टिकून राहिला ः डॉ. मालपाणी संगमनेर शहरात श्री जिव्हेश्वर सभागृहाचे थाटामाटात लोकार्पण

नायक वृत्तसेवा, संगमनेर
श्री जिव्हेश्वर सभागृहाचे लोकार्पण करण्यासाठी स्वकुळ साळी समाजाच्या पुरुषांनी वेळ आणि पैसाही दिला. यात खरी प्रेरणा ही महिलांची आहे. महिलांमुळेच कुळाचार टिकला, रीतीरिवाज आणि देवी-देवतांची उपासना टिकून राहिली असल्याचे गौरवोद्गार उद्योजक डॉ. संजय मालपाणी यांनी काढले.

श्री लक्ष्मीनारायण देवस्थान ट्रस्ट संगमनेरच्यावतीने निर्माण करण्यात आलेल्या श्री जिव्हेश्वर सभागृहाचा लोकार्पण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, ट्रस्टचे अध्यक्ष वैभव ढोरे, स्वकुळ साळी समाजाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अविनाश दांडेकर, अविनाश साळी, उद्योजक जनार्दन दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

संगमनेर शहराच्या वैभवात भर घालणारी ही इमारत असून सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष वैभव ढोरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून दिली. तर उद्योजक डॉ. मालपाणी यांनी महिलांच्या कर्तृत्वासह स्वकुळ साळी समाजाच्या पुरुषांनी सभागृहासाठी घेतलेल्या मेहनतीवर प्रकाश टाकला. यानिमित्ताने सभागृहाला मदत करणार्या व्यक्तींचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या सभागृहात जिव्हेश्वर महाराजांचे मंदिर असून, विवाह आणि इतर धार्मिक कार्यक्रमांसाठी हा सभागृह तयार करण्यात आला आहे. यामुळे स्वकुळ साळी समाजाला याचा मोठा फायदा होणार आहे. या कार्यक्रमास आळंदीचे विश्वस्त चंद्रकांत हावरे, विजया भागवत, श्री लक्ष्मीनारायण देवस्थानचे विश्वस्त यांच्यासह स्वकुळ साळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल कडलग आणि मनोज उपरे यांनी केले. तर नंदा मेंद्रे यांनी आभार मानले.
