संगमनेरच्या साहित्य वैभवाला कचर्याच्या ढिगांचा विळखा! फटकाकार फंदींच्या समाधीची प्रचंड दूरवस्था; ऐतिहासिक पाऊलखुणा पुसल्या जाण्याची भीती..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
ज्यांनी मराठी साहित्याला ’फटका’ हा नवा काव्यप्रकार दिला, ज्यांच्या लेखणीने उत्तर पेशवाईत मिरजेपासून मालवापर्यंत आपला डंका वाजवला, त्या महान कवी आणि शाहीर अनंत फंदी यांच्या संगमनेरातील समाधीला आज अवकळा प्राप्त झाली आहे. प्रवरा नदीच्या काठावर असलेल्या त्यांच्या ऐतिहासिक स्मारकाभोवती सध्या कचर्याचे ढीग साचले असून, पालिकेच्या दुर्लक्षामुळे समाधीची प्रचंड दूरवस्था झाली आहे. हा प्रकार संगमनेरचा सांस्कृतिक इतिहास जपण्याऐवजी तो धुळीस मिळवण्याचा असून नदीसुधारच्या नावाखाली कोट्यवधींच्या विकासाचे स्वप्नं दाखवणार्या नगरपालिकेने शहरात शिल्लक राहिलेल्या ऐतिहासिक खुणा जपण्याची गरज आहे.

‘बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको! संसारामधे ऐस आपल्या, उगाच भटकत फिरु नको!’ असे अजरामर शब्द ज्यांच्या लेखणीतून अवतरले, त्याच अनंत फंदींच्या स्मृतीस्थळाकडे जाण्यासाठी आज ’धोपट मार्ग’ उरलेला नाही. नदीसुधार प्रकल्पाच्या नावाखाली पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले, मात्र शहराची अस्मिता असलेल्या या स्मारकाचा कायापालट करण्याची इच्छाशक्ती प्रशासनाने दाखवली नाही. खरेतरं विधी परिसराचा विकास साधताना या समाधीला केंद्रस्थानी ठेवून तेथील विकास कामांची रचना व्हायला हवी होती. प्रत्यक्षात मात्र पालिकेला या स्मारकाचे ऐतिहासिक महत्त्वच गावी नसल्याने ठेकेदाराने अक्षरशः समाधीचा भाग सोडून उर्वरीत भागाचे सुशोभिकरण केले आहे. त्यामुळे एका बाजूला असलेल्या या समाधीचा कोपरा आता विधीच्या सामग्रीतून उरलेल्या टाकावू वस्तू व कचरा टाकण्याचे ठिकाण बनले असून हा प्रकार संगमनेरच्या प्रदीर्घ सांस्कृतिक वारशासाठी लांछनास्पद ठरत आहे.

कवी अनंत फंदींचे जीवन हे कोणत्याही चित्रपटापेक्षा कमी रोमांचक नाही. सुरुवातीच्या काळात तमाशा आणि लावणीत रमलेल्या फंदींचे आयुष्य महेश्वर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या भेटीनंतर बदलले. अहिल्यादेवींनी त्यांना ‘तुमची लेखणी लोकरंजनापेक्षा लोकशिक्षणासाठी वापरा’ असा कानमंत्र दिला आणि तिथूनच फंदींचे मनपरिवर्तन झाले. त्यानंतर त्यांनी अध्यात्म, नीती आणि समाजप्रबोधन यावर आधारित फटके आणि कवणे रचली. पेशवे दरबारातही त्यांच्या बुद्धिमत्तेचा आणि काव्यांचा मोठा सन्मान होता. अशा थोर पुरुषाचे मूळगावी असलेले स्मारक आज अडगळीत पडले आहे.

शहराच्या सुशोभीकरणाचे मोठे दावे करणार्या संगमनेर नगरपालिकेला या समाधीची दूरवस्था दिसत नाही का? असा रोकडा सवाल या समाधीची अवस्था पाहणारे संगमनेरकर करीत आहेत. संगमनेर नगरपालिकेने नदीसुधार संकल्पनेअंतर्गत नदी परिसराचे कॉक्रीटीकरण करताना कोट्यवधींचा निधी खर्च केला आहे. पुढील टप्प्यात त्यावर शेकडों कोटींचा खर्चही प्रस्तावित आहे. मात्र त्याच नदीच्या काठावर ज्या कवीने या मातीचे नाव त्याकाळात देशभर गाजवले, त्यांच्या स्मारकाकडे अशाप्रकारे दुर्लक्ष व्हावे हा प्रकार संतापजनक आहे. गेली दोनशे वर्ष ऊन, वारा, पाऊस आणि प्रवरेच्या महापुरातूनही बचावलेल्या या स्मारकाची कोणीतरी इतिहासप्रेमीने डागडूजी केल्याने ते आजही उभे आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्यास येणार्या काळात ते नामशेष होण्याची भीती आहे.

कवी अनंत फंदींच्या लावण्या आणि फटक्यांचे मराठी मनावर आजही गारुड आहे. मात्र, पालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे हे वैभव नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. वेळीच या समाधीचे संवर्धन झाले नाही आणि परिसराची स्वच्छता करुन स्मारकाच्या मूळजागेचा परिपूर्ण विकास करुन आकर्षक स्मारक उभारले गेले नाही, तर भावी पिढ्यांपर्यंत त्यांचा सांस्कृतिक वारसा पोहोचणार नाही. त्यामुळे संगमनेरच्या साहित्यप्रेमी आणि इतिहासप्रेमी नागरिकांनी या विरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. पालिकेने केवळ ’नदी सुधार’चे कागदी घोडे न नाचवता, प्रत्यक्षात या ऐतिहासिक ठेव्याचे रक्षण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आता नदीकाठावरुन येवू लागला आहे. त्याकडे पालिका किती गांभीर्याने पाहते हे महत्त्वाचे ठरणार आहे.

कोण होते कवी अनंत फंदी?
संगमनेरच्या जुन्या बाजारपेठेत राहणार्या एका ब्राह्मणकूळात 1744 साली अनंत घोलप यांचा जन्म झाला. त्यांच्या बालपणीच वडिलांचे निधन झाल्याने सुरुवातीचा त्यांचा काळ उनाडपणात गेला. प्रवराकाठावरील भवानीबुवांच्या सान्निध्यात आल्यानंतर त्यांच्यात परिवर्तन झाले आणि त्यांना काव्य स्फूरण्यास सुरुवात झाली. अतिशय खेळकर आणि कलंदर स्वभावाच्या अनंतला तमाशात विशेष रस होता. त्यातूनच त्यांनी मलिक, रतन व राघव फंदी या तिघांबरोबर मिळून तमाशाचा फड सुरु केला. त्याकाळी त्यांच्या तमाशातील वगनाट्य आणि लावण्या इतक्या गाजल्या की त्याचा डंका थेट मिरज-सांगलीपासून ते मालवा-बुंदेलखंडपर्यंत कानावर येवू लागला. शीघ्रकवी, डफावर नियंत्रण आणि खडा पहाडी आवाज यामुळे त्यांची कीर्ती उत्तरपेशवाईत माधवरावांपर्यंत पोहोचली आणि त्यांनी कवी अनंत फंदींना दरबारी कवी म्हणून आपल्या सदरी ठेवून घेतले.

1795 सालच्या खर्डा येथील लढाईवर त्यांनी लिहिलेला पोवाडा श्रवणार्याला साक्षात युद्धाचे चित्रच दिसायचे. माधवरावांनंतर गादीवर बसलेल्या दुसर्या बाजीरावांच्या काळातही त्यांची कीर्ती टिकून होती. बाजीरावाच्या सांगण्यावरुनच कवी अनंत फंदी यांनी माधवरावांच्या पेशवाईकाळाचा मागोवा घेणारा ‘श्री माधवग्रंथ तथा माधव निधान’ हे बखर वजा 359 ओव्या आणि 365 ओळींचे दीर्घ काव्य लिहिले. त्यांची ‘श्रीकृष्ण आणि सुदाम्याची भेट’ ही आख्यानपर रचना खूप प्रसिद्ध आहे. त्यांनी त्याकाळी लिहिलेल्या लावण्यांमध्येही शृंगारापेक्षा भक्तिभाव आणि सामाजिक प्रबोधनाकडचा कल दिसायचा.

मालवा प्रांतातील तमाशाचा कार्यक्रम आटोपून महेश्वर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या दरबारी हजेरी लावण्यासाठी गेलेल्या अनंत फंदींच्या रचना ऐकून पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी त्यांना ‘तुमची लेखणी लोकरंजनापेक्षा लोकशिक्षणासाठी वापरा’ असा मंत्र दिला आणि तेथून कवी अनंत फंदींच्या जीवनाला कलाटणी मिळाली. नंतरचे संपूर्ण आयुष्य त्यांनी कीर्तन आणि प्रवचनात घालवले. 1819 साली वयाच्या 75 व्या वर्षी त्यांचे संगमनेरातच निधन झाले. त्यांच्या स्मृती म्हणून प्रवराकाठावरील केशवतीर्थ घाटावर त्यांची समाधीही बांधण्यात आली. मात्र गेली दोनशे वर्ष ऊन, वारा. पाऊस आणि प्रवरेचे महापूर सोसून आज त्याची प्रचंड दूरवस्था झाली असून त्याचे संवर्धन होण्याची आणि संगमनेरचा हा ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा जतन करण्याची नितांत गरज आहे.

संगमनेरच्या बाजारपेठेतील जुन्या कटारिया कॉर्नरजवळील एका वाड्यात कवी अनंत फंदी यांचा जन्म झाला होता. तो वाडा गेल्याकाही वर्षांपर्यंत तसाच होता. या दरम्यान संगमनेरातील काही साहित्यिकांसह इतिहासप्रेमींनी वारंवार याकडे लक्ष वेधून हा वाडा पालिकेने जतन करावा अशी मागणी केली. त्यासाठी जागेच्या मूळ मालकाने अनेकवर्ष ही वास्तू तशीच ठेवली. मात्र पालिकेने कवी अनंत फंदी यांच्या स्मृती जतन करण्यात कधीही रस दाखवला नाही. त्याचा परिणाम अवघ्या देशावर आपल्या शब्दसंपदेतून गारुड घालणार्या शाहीर व कवी अनंत फंदी यांचे जन्मस्थळ पाडले गेले. आता नदीकाठावरील त्यांच्या अखेरच्या स्मृतींचीही प्रचंड दूरवस्था झाली असून त्याकडे वेळीच लक्ष दिले गेले नाही तर, संगमनेरचा हा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसाही मातीमोल होण्याची भीती आहे. कोट्यवधीचा नदीसुधार आराखडा करणार्या नगर पालिकेने याकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

