तरुणाला धडक देणार्या वाळूतस्कराविरोधात गुन्हा दाखल! सोमवारी पहाटे साळीवाड्यात घडली होती घटना; जखमी तरुण अत्यवस्थ..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सुसाट वेगाने वाळू वाहतूक करणार्या ट्रॅक्टरची जोरदार धडक बसून घुलेवाडीतील एक तरुण अत्यवस्थ होण्याची घटना सोमवारी पहाटे समोर आली होती. या घटनेनंतर ट्रॅक्टरचालक आपल्या वाहनासह पसार झाल्याने आत्तापर्यंत ‘अज्ञात’ होता. मात्र आता जखमी तरुणाच्या भावाने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यावरुन पोलिसांनी इम्तियाज शेख याच्या मालकीच्या ट्रॅक्टरवरील अज्ञात आरोपीविरोधात हयगयीने वाहन चालवून दुखापत करणे व मालमत्तेचे नुकसान केल्यासह मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत जखमी झालेल्या स्वप्नील काशिनाथ घुले या तरुणावर सध्या नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत शहर पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदरची घटना गेल्या सोमवारी (ता.6) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास साळीवाड्यातील राज फोटो स्टुडिओसमोर घडली होती. घुलेवाडीतील अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज परिसरात राहणारा स्वप्नील काशिनाथ घुले (वय 24) हा तरुण कामानिमित्त पुण्याला गेला होता. जाताना त्याने आपली दुचाकी (क्र.एम.एच.17/सी.जे.6530) राऊळ फेटेवाले यांच्या दुकानासमोर ठेवली होती. पहाटे पुण्याहून परतल्यानंतर त्याने सदर ठिकाणाहून आपली दुचाकी घेतली व घुलेवाडीकडे जाण्यासाठी रंगारगल्लीतून माळीवाड्याकडे निघाला.
त्याची दुचाकी साळीवाड्यातील राज फोटो स्टुडिओ जवळ आली असता नगरपालिकेच्या दिशेने रंगारगल्लीकडे सुसाट निघालेल्या वाळूतस्कराच्या ट्रॅक्टरची त्याच्या दुचाकीला जोराची धडक बसली. त्यात तो खाली कोसळला, त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्रावही सुरु झाला. मात्र ट्रॅक्टरचालक अपघातानंतर न थांबता दुप्पट गतीने तेथून पसार झाला. या अपघातानंतर काही क्षणातच पाठीमागून आलेल्या एका कारचालकाने जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या तरुणाला पाहून वाहन थांबवले आणि आसपासच्या नागरिकांना उठवून व पोलिसांना माहिती देत त्यांच्या मदतीने त्याला तत्काळ रुग्णालयात पाठविले, त्यामुळे त्याचा जीव वाचला.
या घटनेनंतर वाळूतस्करांबाबत शहरात क्षोभ निर्माण झाला होता. या घटनेत जखमी झालेल्या तरुणाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नाशिकला हलविण्यात आले. त्या दरम्यान मंगळवारी त्याचा मोठा भाऊ नीलेश याने शहर पोलीस ठाण्यात येवून याबाबत फिर्याद दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी इम्तियाज शेख याच्या मालकीच्या ट्रॅक्टरवरील अज्ञात इसमाविरोधात भा.दं.वि. कलम 279, 337, 338, 427 मोटर वाहन कायद्याचे कलम 184, 134 (ए)(बी) / 177 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.