… तरच अगस्ति उर्जितावस्थेत येईल : डॉ. हापसे शेतकरी मेळावा आणि ऊस पीक परिसंवाद संपन्न
नायक वृत्तसेवा, अकोले
अगस्ति कारखान्याने सहा लाख टन गाळप केले तरच कारखाना उर्जितावस्थेत येईल, असे प्रतिपादन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे ऊस प्रजनन विभागाचे प्रमुख वरिष्ठ संशोधक डॉ. रमेश हापसे यांनी केले.
अकोलेतील अगस्ति सहकारी साखर कारखाना अकोले व स्मार्टफेम टेक्नॉलॉजी लिमिटेड (महाधन) पुणे यांच्यावतीने कारखाना कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त ऊस क्षेत्र व अधिकाधिक ऊस उत्पादन वाढविण्यासाठी मंगळवारी (ता.22) अकोले तालुक्यातील इंदोरी फाटा येथील साई लॉन्समध्ये शेतकरी मेळावा व ऊस पीक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर होते. तर उद्घाटक तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे होते. प्रमुख वक्ते म्हणून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे ऊस प्रजनन विभागाचे प्रमुख वरिष्ठ संशोधक डॉ. रमेश हापसे होते. तसेच महाधनचे जनरल मॅनेजर योगेश म्हसे, सुधाकर जगदाळे, शिवानंद कामदे आदी प्रमुख उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. रमेश हापसे म्हणाले, 5 ते 6 लाख मेट्रिक टन उस हवा म्हणजे कारखान्याचे बजेट व्यवस्थित चालते. एकरी 55 ते 60 टन उत्पादन हवे. पण तुमच्याकडे ते हेक्टरी 58 टन आहे. आंतरपीक घेऊनही उसाची शेती चांगली करता येते. ऊस उत्पादन वाढसाठी उसाच्या जाती महत्वाच्या आहेत असेही ते म्हणाले. कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर म्हणाले, अगस्ति कारखाना कोणत्याही परिस्थितीत बंद पडू देणार नाही. तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांनी कोणत्याही परिस्थितीत भूलथापांना बळी पडू नये. जास्तीत जास्त उसाची लागवड करा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक भांगरे, सर्व संचालक, उस उत्पादक, तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.