प्रेयसी सोबतच्या नाजूक संबंधाची छायाचित्रे सोशल माध्यमात! प्रियकराला शहर पोलिसांकडून अटक; तिघा अज्ञात मित्रांचाही गुन्ह्यात समावेश..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संबंधातच असलेल्या तरुणीशी ओळख काढून नंतर तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण करीत जवळीक वाढवली. एकांतात भेटण्याच्या प्रसंगात त्याने तिचे विवस्त्र आणि अश्‍लिल छायाचित्र व व्हिडिओ काढले. त्याचाच वापर करुन त्याने संगमनेर तालुक्यातील 23 वर्षीय तरुणीला ‘ब्लॅकमेल’ करुन चक्क ‘ती’ सर्व छायाचित्रे व व्हिडिओ सोशल माध्यमात व्हायरल करुन पीडित तरुणीच्या नातेवाईकांनाही ‘शेअर’ केली. त्याच्या या कृत्याविरोधात पीडितीने गेल्यावर्षी तक्रारही दाखल केली, मात्र त्याचा कोणताही परिणाम त्याच्यावर झाला नाही. यावेळी तर त्याने सोशल माध्यमावर अश्‍लिल नावाने खाते उघडून त्यावर पीडितेच्या संपूर्ण नावाचा उल्लेख करीत अतिशय संतापजनक मजकूर लिहून प्रसारित केला. या प्रकाराने घाबरलेल्या तरुणीने विचारणा केली असता उलट त्याने ‘एकतर आत्महत्या कर, नाहीतर माझ्याकडे ये..’ अशी उद्धट धमकी देतं तिला नाशिकला भेटण्यासाठी बोलावले, पीडितेने नकार देताच त्याच्या तिघा साथीदारांनी वेगवेगळ्या क्रमांकावरुन फोन करीत तिला सामुहीक बलात्काराची धमकी दिली. यासर्व प्रकारांनी भयभीत झालेल्या पीडितेने अखेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यावरुन पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेसह माहिती तंत्रज्ञान अधिनियमातंर्गत गुन्हा दाखल करुन देवठाण येथे राहणार्‍या आरोपी आदित्य जगदीश शेळकेला बेड्या ठोकल्या आहेत.


याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी वैद्यकिय प्रयोगशाळा तंत्रज्ञ असलेल्या संगमनेर तालुक्यातील एका 23 वर्षीय तरुणीने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार तिच्या दूरच्या नातेवाईकांमध्ये असलेल्या अकोले तालुक्यातील देवठाण येथील आदित्य जगदीश शेळके याच्याशी तिची ओळख झाली व नंतर त्याचे रुपांतर प्रेमात झाले. त्यातून दोघांमधील जवळीकही वाढल्याने दोघांनी एकांतात क्षणही घालवले. मात्र या दरम्यान आरोपी शेळकेने तिच्यासोबतच्या प्रसंगात तिची विवस्त्र व अश्‍लिल छायाचित्रे व व्हिडिओ काढले. कालांतराने त्यांचाच वापर करुन त्याने सोशल माध्यमात ‘ती’ छायाचित्र व्हायरल केली व धक्कादायक म्हणजे त्याने पीडित तरुणीच्या नातेवाईकांना जाणीवपूर्वक ती शेअरही केली.


या संतापजनक प्रकाराबाबत पीडितेने गेल्यावर्षी 16 मे रोजी आरोपी विरोधात तक्रारही दाखल केली होती. त्यानंतर त्याच्यात सुधारणा होईल असे अपेक्षित असताना गेल्या दोन महिन्यांपासून त्याने पुन्हा पीडित तरुणीला त्रास देण्यासह तिची बदनामी करण्यास सुरुवात केली. या दरम्यान त्याने अतिशय अश्‍लिल टॅगलाईनचा वापर करुन सोशल माध्यमात बनावट खाते उघडले. त्यात त्याने पीडितेच्या संपूर्ण नावाचा वापर करुन त्यापुढे संतापजनक मजकूरही लिहिला आणि पीडितेसोबतच्या नाजूक प्रसंगातील छायाचित्रे व व्हिडिओ टाकून ती त्याने पीडितेच्या नातेवाईकांना पुन्हा शेअर केली.


पुन्हा पुन्हा मानसिक छळवणुकीच्या या प्रकाराबाबत पीडितेने आरोपीला फोन करुन विचारणा केली असता, उलट त्यानेच उद्धटपणे उत्तर देत; ‘एकतर आत्महत्या कर, नाहीतर माझ्याकडे ये..’ अशी धमकी दिली. कालांतराने त्याने तिला फोनवरुन नाशिकला भेटण्यासाठी येण्यास सांगितले. मात्र पीडितेने तसे करण्यास नकार दिल्यानंतर आरोपी आदित्य शेळकेच्या तिघा अज्ञात मित्रांनी वेगवेगळ्या मोबाईलवरुन फोन करुन ‘तु आदित्यला भेटायला आली नाहीस, आता आम्ही तुझ्या रुमवर येतो, तुला ‘रेप’ काय असतो ते सांगतो, तुझ्या घरच्यांना जिवंत मारुन टाकतो’ अशी धमकही त्या सर्वांनी भरली.


पीडितेचा इतका सगळा मानसिक छळ कमी पडला म्हणून की काय आरोपीने दोन दिवसांपूर्वी ‘त्या’ बनावट सोशल खात्यावर पुन्हा पीडितेच्या विवस्त्र छायाचित्रांसह नाजूक प्रसंगातील व्हिडिओ शेअर केल्यानंतर पीडितेने अखेर या प्रकरणाचा सोक्षमोक्ष करीत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी आरोपी आदित्य जगदीश शेळके (रा.देवठाण, ता.अकोले) याच्यासह त्याच्या तिघा अज्ञात साथीदारांवर भारतीय न्यायसंहितेच्या कलम 78, 351 (4) सह माहिती व तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम 67 (अ) प्रमाणे गुन्ह्याची नोंद करुन मुख्य आरोपी आदित्य शेळकेला बेड्या ठोकल्या आहेत, आज त्याला न्यायालयासमोर हजर केले जाईल. या प्रकाराने तालुक्यात खळबळ उडाली असून एखाद्या तरुणीला प्रेमपाशात फसवून तिची अशाप्रकारे बदनामी करण्याच्या प्रकाराने संताप निर्माण झाला आहे.


या प्रकरणातील 23 वर्षीय पीडित तरुणी वैद्यकिय प्रयोगशाळेत तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. संगमनेर तालुक्यातील शेतकरी कुटुंबाची पार्श्‍वभूमी असलेल्या या तरुणीने प्रेमसंबंधात फसून आरोपीला मनमानी करु देण्याची मूभा दिल्याने त्याने तिचा पूर्ण गैरफायदा घेवून तिचे आयुष्यच उध्वस्थ करण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा गुन्हा दाखल होवून जेलवारी घडलेली असतानाही आरोपीने पुन्हा कायद्याचे उल्लंघन केले. त्यावरुन सदरील व्यक्ति विकृत असल्याचेही दिसून येते. इतकंसगळं केल्यानंतरही त्याने पीडितेला नाशिकला बोलावले, तिने नकार दिल्यानंतर त्याच्या तिघा मित्रांनी पीडितेला फोनवरुन बलात्काराच्या धमक्या दिल्या. त्यावरुन पीडितेला नाशिकला बोलावून आरोपीला नेमकं काय करायचं होतं? असाही प्रश्‍न उपस्थित झाला असून पोलिसांनी सदरचे प्रकरण गांभीर्याने घेवून आरोपीच्या तिघा साथीदारांनाही गजाआड घेण्याची गरज आहे.

Visits: 146 Today: 2 Total: 1565741

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *