महायुतीच्या अमोल खताळ यांचा प्रचारात झंझावात! गाववस्त्यांवर जावून भेटीगाठी; मतदारांकडूनही होतंय स्वागत..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील गाववस्त्यांपर्यंत पोहोचलेल्या महायुतीच्या अमोल खताळ यांचा प्रचारात झंझावात सुरु असून शिल्लक कालावधीत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा मानस आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील स्वच्छ प्रतिमेचा तरुण उमेदवार म्हणून मतदारही त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करीत आहे. ‘तुम्ही त्यांना चाळीस वर्ष सत्ता दिलीत, आता मला फक्त पाच वर्ष द्या, मी विकासाची गती दाखवून देतो’ असे सांगत ते मतदारांकडून मतांचे दान मागत आहेत. आज सकाळी रणखांबपासून सुरु झालेला त्यांच्या प्रचाराचा झंझावात आता पठारभागात पोहोचला असून दिवसभर मतदारांच्या भेटीगाठी, प्रचारफेर्‍या आणि कॉर्नर सभांचा धडाका सुरु आहे.


शेवटच्या क्षणापर्यंत महायुती उमेदवाराच्या नावाबाबत उत्कंठा दाटलेल्या संगमनेर विधानसभा मतदारसंघात भाजपचे विधानसभा प्रमुख अमोल खताळ यांची ऐनवेळी शिवसेनेत पाठवणी करुन त्यांना संगमनेरची उमेदवारी देण्यात आली. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या विश्‍वासू गोटातील स्वच्छ प्रतिमेचा तरुण म्हणून त्यांना ओळखले जाते. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी मोठे परिश्रम घेतले. काही महिन्यांपूर्वी सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत तालुक्यातील अधिकधिक पात्र महिलांना लाभ मिळावा यासाठी त्यांनी व्यापक काम केले. पक्षाने त्यांच्यावर मतदारसंघाच्या प्रमुखपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर त्यांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांची मूठ बांधून स्थानिक पदाधिकार्‍यांच्या हातात हात घालून पक्षाला निवडणुकीसाठी सज्ज करण्याची भुमिका बजावली.


माजी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांनी पक्षाला संगमनेरची जागा मिळवून देण्याचा चंग बांधून आचारसंहिता लागू होताच तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गटनिहाय सभांचा धडाका लावून तालुक्यात परिवर्तनाची नांदी असल्याचे वातावरण निर्माण केले. त्यांच्या प्रत्येक मंचावर अमोल खताळ यांची प्रमुख उपस्थिती त्यांच्या उमेदवारीचे संकेत देत असतानाच प्रचाराचा झंझावात पाहुन डॉ.सुजय विखे-पाटील यांचेही नाव चर्चेत आले. स्थानिक पातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमत करुन तीन नावे पाठवण्याच्या पक्षाच्या आदेशानंतर संगमनेरातून गेलेल्या सीलबंद पाकिटातही डॉ.विखे-पाटील यांच्यानंतर खताळांच्या नावाला पसंदी दिली गेली होती. त्यामुळे डॉ.विखे-पाटील किंवा खताळ या दोघातील एक उमेदवार निश्‍चित मानला गेला होता.


मात्र या उपरांतही उमेदवारी दाखल करण्याच्या अंतिम पूर्वसंध्येपर्यंत पक्षाकडून उमेदवाराच्या नावाची घोषणाच होत नसल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला होता. जागावाटपात 1995 पासून संगमनेर मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने त्यावरुनच घोडं अडल्याचीही चर्चा कानावर आली. सरतेशेवटी अमोल खताळ यांची शिवसेनेच्या शिंदेगटात पाठवणी करुन त्यांच्या नावावर एकमत झाले आणि 28 ऑक्टोबररोजी रात्री दहा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची अंतिम यादी जाहीर करताना त्यांच्या महत्त्वकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे संगमनेरात व्यापक काम करुन तब्बल 1 लाख 33 हजार महिलांना त्याचा लाभ मिळवून देणार्‍या अमोल खताळ यांच्या उमेदवारीची घोषणा केली.


सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील स्वच्छ प्रतिमेच्या लढाऊ कार्यकर्त्याला शिवसेनेची उमेदवारी मिळाल्याने संगमनेरात या निर्णयाचे स्वागत झाले. विखे-पाटलांनीही यावेळी विजयाचा निर्धार बांधून संगमनेर मतदारसंघात पूर्ण लक्ष घातल्याने स्थानिक महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मोठे बळ मिळाले असून महायुतीने प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. सामान्य कुटुंबातील असल्याने सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांची आपल्याला पूर्णतः जाणीव आहे. राज्यात असलेले विद्यमान सरकार जनतेच्या मनातील असल्याने या निवडणुकीच्या माध्यमातून महायुतीचीच पुन्हा सत्ता येणार आहे. त्यामुळे तालुक्याच्या गाववस्त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण जमीनीवर दिसतील अशाप्रकारचे प्रयत्न करु असे आश्‍वासक शब्द देत ते मतदारांकडून मतांचे दान मागत आहेत.


ठिकठिकाणी महायुतीचे स्थानिक कार्यकर्ते त्यांच्यासोबत जावून गावातील ज्येष्ठ-श्रेष्ठांशी त्यांची भेट घडवित असल्याने संगमनेरची निवडणूक रंगात येवू लागली आहे. ‘तुम्ही त्यांना 40 वर्ष दिली आहेत, आता महायुतीला फक्त पाच वर्ष द्या. विकास काय असतो, त्याची गती काय असते याचे वास्तव चित्र आम्ही आपणांस दाखवू’ असे भावनिक आवाहन करीत ते मतदारांचे आशीर्वाद मागत आहेत. त्यांच्या या प्रचार पद्धतीला मतदारांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अमोल खताळ यांनी आज सकाळपासून रणखांब, दरेवाडी, कुंभारवाडी, वरवंडी, खांबे, खरशिंदे, कणसेवाडी, चौधरवाडी, कौठे मलकापूर, बिरेवाडी, मांडवे बु., शिंदोडी, साकूर, जांबूत खुर्द व बुद्रुक, हिवरगाव पठार, गिर्‍हेवाडी आणि शेवटी कान्हेगाव या गावांना भेटी देण्याचे नियोजन केले असून ठिकाठिकाणी गावभेटी, प्रचार फेर्‍या व कॉर्नर सभांचे आयोजन करण्यात आले आहे.


महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांच्या मंचावरील फलकांवर महायुतीच्या प्रमुख नेत्यांसह दिवंगत नेते बाळासाहेब विखे-पाटील, कॉ.दत्ता देशमुख व बी.जे.खताळ-पाटील यांच्या छायाचित्राचा वापर होत असून खूद्द महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भाषणातूनही या सर्वांसह साथी भास्करनाना दुर्वे यांचाही नामोल्लेख होत आहे. विखे-पाटील तर आपल्या भाषणांमधून या सर्वांचे तालुक्याच्या उभारणीत मोठे योगदान असल्याचे व आता त्यांना अडगळीत टाकले गेल्याचे सांगत त्यांच्याकडून काँग्रेसच्या मूळ विचारणीलाही चुचकारण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे बोलले जात आहे.

Visits: 51 Today: 1 Total: 112911

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *