कत्तलीसाठी संगमनेरातून परराज्यात ‘गोवंशा’चा पुरवठा! आणखी एक धक्कादायक उद्योग; पोलिसांनी ‘दहा’ टायरचा कंटेनरच पकडला..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहराच्या पूर्वेकडील भागात गेली वर्षानुवर्षे सुरु असलेले बेकायदा कत्तलखाने शहराच्या नावाला बट्टा लावत असताना आता संगमनेरातून थेट परराज्यात कत्तलीसाठी गोवंशाचा पुरवठाही होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या पथकाने प्राप्त माहितीच्या आधारावर आनंदवाडीच्या जावळे वस्तीनजीक संशयावरुन थांबवलेल्या कर्नाटक नोंदणीच्या दहा टायर कंटेनरमध्ये तब्बल 28 गोवंश जनावरे निर्दयीपणाने कोंबून त्यांची वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले. सदरील जनावरे कुरणमध्ये राहणार्‍या आरबाज राजू शेखने भरुन दिल्याचे व ती कर्नाटकच्या कित्तूरला घेवून जात असल्याचे अटक केलेल्या कंटेनर चालकाने सांगितले. या कारवाईत पोलिसांनी 32 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून प्रचलित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत संगमनेर तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार उपविभागीय पोलीस कार्यालयातील कर्मचारी राहुल सारबंदे यांना पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास याबाबतची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार त्यांनी पोलीस उपाधिक्षक कुणाल सोनवणे यांना त्याबाबत सूचित केल्यानंतर पोलिसांनी फौजफाट्यासह हिवरगाव पावसा टोलनाक्यापासून चंदनापूरीच्या दिशेने गस्त सुरु केली. या दरम्यान आनंदवाडीजवळील जावळेवस्ती परिसरातून भरधाव वेगाने पुण्याच्या दिशेने जाणार्‍या अशोक लेलन्ड कंपनीच्या (क्र.के.ए.51/बी.8920) या दहा टायरच्या कंटेनरवर संशय बळावल्याने त्याला थांबण्याचा इशारा करण्यात आला.


वाहन चालकाला त्याची ओळख विचारता त्याने तो कर्नाटकच्या होले नरसीपूरचा रहिवाशी सय्यद रिजवान दस्तगीर (वय 32) असल्याचे सांगितले. वाहनात काय असल्याबाबत विचारणा केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवी केली, मात्र पोलिसांनी दहा अंशाच्या थंडीत त्यांच्या कानांना ऊब देताच त्याने कुरणच्या आरबाज राजू शेख याच्या मालकीची 28 गोवंश जनावरे, अतिशय निर्दयीपणाने, दाटीवाटीने भरुन ती कर्नाटकातील कित्तूरच्या गोवंश कत्तलखान्यात घेवून जात असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी जनावरांसह त्याला ताब्यात घेत गोवंशाची रवानगी जीवदया पांजरपोळमध्ये केली.


याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांच्या तक्रारीवरुन तालुका पोलिसांनी वरील आरोपी विरोधात प्राण्यांना निर्दयीपणाने वागणूक देण्यास प्रतिबंध करणार्‍या अधिनियमांसह महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यातील विविध तरतुदींनुसार गुन्हा दाखल करुन आरोपी वाहनचालकाला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 20 लाख रुपयांच्या दहा टायर कंटेनरसह प्रत्येकी 45 हजार रुपये किंमत असलेल्या 12 लाख 60 हजार रुपये किंमतीच्या 28 गोवंशाची कत्तलीपासून सुटका केली आहे. या कारवाईत सारबंदे यांच्यासह पोलीस नाईक बापूसाहेब हांडे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील ढाकणे आदींचा सहभाग होता.


गोवंश जनावरांच्या बेकायदा कत्तलीचे आगार म्हणून यापूर्वीच बट्टा लागलेल्या संगमनेरातून आता कत्तलखान्यांसाठीच्या जनावरांचा पुरवठा करणारी साखळीही समोर येवू लागली आहे. हरयाणा, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, दिल्ली अशा उत्तरेकडील बहुतांश राज्यातून गोतस्करीसाठी होणारा कंटेनर वापराचा फार्म्यूला वापरुन कुरणमधील आरबाज राजू शेख नावाच्या गोतस्कराने पराराज्याची नोंदणी असलेला दहा टायर कंटेनर वापरुन त्याद्वारे गोवंशाची चोरटी वाहतूक केल्याचे उघड झाले. हा प्रकार संगमनेरच्या संस्कृतीला आणखी एक डाग लावणारा असून तालुका पोलिसांनी प्रामाणिक तपास करुन गोतस्करीचे संपूर्ण नेटवर्क उध्वस्त करण्याची आवश्यकता आहे, मात्र पहाटे साडेचारच्या सुमारास झालेल्या या कारवाईचा प्रत्यक्ष गुन्हा दाखल करण्यात झालेला विलंब पाहता तपासापूर्वीच संशयाचा धूरही उठू लागला आहे.

Visits: 60 Today: 1 Total: 1414552

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *