घरासमोर मांडव घालून होताहेत शेकडोंच्या उपस्थितीत विवाह समारंभ! मंगल कार्यालयांवर कारवाईचा बडगा; मात्र अशा सोहळ्यांना मिळते पूर्ण मोकळीक

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आपल्या मुला-मुलींचे मंगलकार्य जोरात व्हावे यासाठी तालुक्यात रस्सीखेच सुरू झाली असून कोणाच्या कार्यात अधिक गर्दी होते याची जणू स्पर्धाच लागली आहे. सरकारने कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी होणार्या कार्यक्रमांना बंदी घातली आहे. त्यासाठी मंगल कार्यालय व लॉन्स चालकांना नोटिसा बजावून पन्नासपेक्षा अधिक जणांची उपस्थिती आढळल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा देत दोन कार्यालयांवर कारवाई देखील केली आहे. मात्र ग्रामीणभागात घरासमोर होणार्या अशा कार्यक्रमांना शेकडो जणांची उपस्थिती कोविड नियमातील विरोधाभास दर्शविणारी ठरत आहे. कार्यालयात लग्न झाल्यास कोविड होतो, मात्र घरासमोरील कार्यक्रमात मात्र कोविडचा विषाणू फिरकतच नाही अशीही चर्चा या निमित्ताने सुरु झाली आहे.

कोविड संक्रमणाच्या दुसर्या लाटेच्या उंबरठ्यावर असलेल्या राज्यातील बाधितांची संख्या जलदगतीने वाढू लागली आहे. त्यावरील उपाययोजनेचा भाग म्हणून शासनाने गर्दी होणार्या सर्वप्रकारच्या कार्यक्रमांना बंदी घालताना लग्न सोहळ्यांसारख्या कार्यक्रमांच्या उपस्थितीवर मर्यादा आणल्या आहेत. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील मंगल कार्यालये व लॉन्स चालकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून पन्नासपेक्षा अधिक उपस्थिती आढळल्यास संबंधितावर दंडात्मक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. त्यानुसार गुंजाळवाडी शिवारातील अमृता लॉन्स आणि घुलेवाडीतील पाहुणचार लॉन्सवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

कार्यालयांवर प्रशासनाची करडी नजर असल्याने त्यांच्या संचालकांनी नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र त्याचा परिणाम आता विवाह सोहळे रद्द करुन ग्रामीणभागातील आपल्या घरासमोर, धार्मिकस्थळी अथवा समाजाच्या सभागृहाचा पर्याय निवडून अनेकजण शेकडो जणांच्या उपस्थितीत कोविडकडे सपशेल दुर्लक्ष करीत आपल्या मुला-मुलींचे लग्नकार्य उरकताना दिसत आहे. ढोबळ माहितीप्रमाणे प्रशासनाने मंगल कार्यालयांवर उपस्थितीचा नियम लागू केल्यापासून आत्तापर्यंत पंधरा ते वीस विवाहांची मंगल कार्यालयाची नोंदणी रद्द करण्यात आली आहे, मात्र त्यातील बहुतेक विवाह ठरल्या दिवशीच मोठ्या उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे.

मंगल कार्यालयांमध्ये नियम लागू असल्याने ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा थोडीफार संख्या अधिक होत असली तरीही बहुतेक मंगल कार्यालयांचे अथवा लॉन्सचे चालक मुखपट्टी (मास्क), सामाजिक अंतर व सॅनिटायझर यासारख्या गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष देत असल्याचे आढळून आले. मात्र त्याचवेळी स्वतःच्या घरासमोर, शेतात अथवा गावातील धार्मिक स्थळी अथवा समाजाच्या सभागृहात होणार्या अशा सोहळ्यांमध्ये नियमांची सर्रास पायमल्ली केली जात असून उपस्थित पाहुणे मंडळींना कोविडचा विसर पडत असल्याचे भयान दृष्य दिसू लागले आहे.
![]()
संगमनेरात कोविडचा उद्रेक होण्यामागील प्रमुख कारणांमध्ये प्रादुर्भाव सुरू असताना काही पांढरपेशांनी आपली ताकद वापरुन साजरे केलेले भव्य-दिव्य समारंभही कारणीभूत आहेत. इतका मोठा अनुभव पाठिशी असतानाही मंगल कार्यालय अथवा लॉन्स सोडून घरासमोर लग्नकार्य उरकण्याची धडपड संगमनेरात पुन्हा ‘लॉकडाऊन’ची स्थिती निर्माण करणारा ठरणार आहे. शहराप्रमाणेच ग्रामीणभागातील अशा सोहळ्यांवर कारवाईसाठी ग्रामसुरक्षा समितीला जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र स्थानिक पातळीवरील संबंधांमुळे समितीचे सदस्य कारवाई करण्यास धजावत नसल्याने तालुक्यात कोविडचा पुन्हा एकदा उद्रेक होण्याची शक्यता दाटली आहे.

मंगल कार्यालये, लॉन्स अशा ठिकाणी होणार्या कार्यक्रमांसाठी पन्नास जणांच्या उपस्थितीची कमाल मर्यादा घालण्यात आली आहे. त्यासाठी महसूल, पालिका, पोलीस प्रशासन व ग्रामपंचायतीला दंडात्मक कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. शहरी भागातील यंत्रणा आपले काम बजावित आहे, मात्र ग्रामीणभागातील जबाबदारी असणारे मात्र आपले हितसंबंध सांभाळण्यातच व्यस्त असल्याने कोविडची दुसरी लाट तालुक्याच्या उंबरठ्यावर उभी असून अशा कार्यक्रमांवर तत्काळ नियंत्रण न मिळविल्यास तालुक्यात कोविडचा उद्रेक होण्याची भीती निर्माण झाली आहे.

