चंदनापुरीमध्ये शेतातील रस्त्याच्या वादावरुन महिलेला मारहाण जीवे मारण्याचीही धमकी; तालुका पोलिसांत चौघांविरोधात गुन्हा दाखल
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील चंदनापुरी येथे शेतातील रस्त्याच्या वादातून महिलेसह पती, दीर, मुलगा यांना शिवीगाळ, दमदाटी करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना रविवारी (ता.4) दुपारी 4 वाजता घडली आहे. यामध्ये जखमी झालेल्या महिलेने सोमवारी (ता.5) संगमनेर तालुका पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, लताबाई रामनाथ रहाणे ही महिला चंदनापुरी येथे कुटुंबासोबत राहत आहे. दरम्यान, या महिलेसह दीराला रोहिदास नामदेव रहाणे, विलास नामदेव रहाणे, बाबासाहेब नामदेव रहाणे व पंढरीनाथ भिकाजी रहाणे हे म्हणाले की, ‘तुम्ही तुमच्या शेतातील बांधाच्या कडेला सोडलेला रस्ता हा आमच्या हद्दीत आहे. त्यामुळे तुम्ही रस्त्याने ये-जा करायची नाही.’ त्यावेळी महिलेचे पती रामनाथ रहाणे व दीर त्यांना म्हणाले की, हा रस्ता आमच्या शेतातील आहे. याचा राग आल्याने वरील चौघांनी महिलेसह पती व दीर यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की करु लागले. त्यावेळी महिला व मुलगा संदीप रहाणे हे भांडण सोडविण्यासाठी आले असता वरील चौघांनी त्यांना देखील शिवीगाळ करुन दमदाटी केली. तसेच रोहिदास रहाणे याने महिलेच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला जोराचा चावा घेऊन जबर दुखापत करत पुन्हा रस्त्याने गेले तर जीवे ठार करु अशी धमकी दिली.
या प्रकरणी जखमी महिला लताबाई रहाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी गुरनं.143/2021 भादंवि कलम 325, 323, 504, 506, 34 प्रमाणे वरील चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य हवालदार बिलाल शेख हे करत आहे.
शेतीच्या वादावरुन कायमच हाणामारी होण्याच्या घटना घडत आहे. यामध्ये शेजार्यांसह भाऊबंदीमध्येही टोकाचे वाद होवून थेट जीवे मारण्यापर्यंत मजल जात आहे. यामुळे शेतकर्यांनी किरकोळ वाद सामंजस्याने सोडवून कोर्ट-कचेरीच्या फेर्या टाळाव्यात. यासाठी शासनही प्रबोधन करत असून, शेतकर्यांनीही पुढाकार घेण्याची गरज आहे.