शिर्डीच्या खासदारांचे ‘विकासा’च्या नावाने दुसर्‍यांदा पलायन! संगमनेर-अकोल्याने दिले होते मताधिक्क्य; रेल्वेमार्गावर ‘सोन्याचा नांगर’ फिरवण्याची संधी..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
मुंबई-नाशिक-पुणे हा राज्याचा ‘गोल्डन ट्रँगल’ मानला जातो. या तीनही मोठ्या शहरांना जोडणार्‍या ‘पुणे-नाशिक’ सरळ रेल्वेमार्गाचे स्वप्न गेल्या अनेक दशकांपासून उत्तर महाराष्ट्राच्या पाच तालुक्यांतील नागरिक पाहत होते. मात्र, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प तांत्रिक कारणांचा आधार घेत रद्द केल्याची घोषणा केली आणि या भागातील विद्यार्थ्यांपासून उद्योजकांपर्यंत सर्वांच्याच स्वप्नांवर अक्षरशः ‘गाढवाचा नांगर’ फिरवला गेला. या निर्णयानंतर संपूर्ण पट्ट्यात संतापाची लाट उसळली असतानाच, दुसरीकडे राजकीय वर्तुळात धक्कादायक घडामोड घडली. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ‘विकासा’चे कारण देत पुन्हा एकदा ठाकरे गट सोडून शिंदेसेनेच्या गोटात प्रवेश केला आहे. या राजकीय ‘स्ट्राईक’मुळे आता मतदारसंघातील जनमाणसात प्रश्नांचे काहूर माजले असून विकासाच्या नावाने झालेल्या दुसर्‍या पलायनातून मतदारसंघाचा विकास होणार की खासदारांचा असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे, राजकीय वचप्यातून रद्द झालेल्या ‘पुणे-नाशिक’ सरळ रेल्वेमार्गाच्या पूर्ततेतून त्याचे उत्तर देण्याची नामी संधीही त्यांना मिळाली आहे.


पुणे-नाशिक रेल्वेमार्गाच्या रद्द होण्यामागे ‘जीएमआरटी’चे तांत्रिक कारण दिले जात असले, तरी प्रत्यक्ष व्यवहारात या रेल्वेमार्गाच्या पट्ट्यात येणार्‍या तीनही मतदारसंघांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला भरभरुन मते दिली होती. केंद्राच्या या निर्णयाकडे स्थानिक पातळीवर ‘राजकीय वचपा’ म्हणूनच पाहिले जात आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे ज्येष्ठनेते तथा माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, हा मार्ग केवळ राजकीय नसून विकासाचा आहे. भूसंपादनासाठी शेतकर्‍यांना पाचशे कोटींहून अधिक रक्कम दिली गेली आहे. आता हा मार्गच रद्द करणे अत्यंत दुर्दैवी आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी आपल्याला राजकारण विरहित हा सरळ मार्ग मिळवून देण्यासाठी लढावेच लागेल. तर, आमदार सत्यजित तांबे यांनी हा निर्णय उत्तर महाराष्ट्राच्या विकासात ‘खो’ घालणारे ‘पाप’ असल्याची तिखट प्रतिक्रिया दिली आहे.


एकीकडे रेल्वेमार्गासाठी संघर्ष सुरु असताना, दुसरीकडे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी सत्ताधारी शिंदेसेनेशी हातमिळवणी केली आहे. वाकचौरे यांच्या राजकीय कारकीर्दीचा आलेख पाहिल्यास, 2009 मध्ये खासदार असताना त्यांनी याच रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण घडवून आणले होते. मात्र त्यानंतर आतापर्यंत त्यांची वाट संघर्षाचीच राहिली आहे. ‘गद्दारी’चा शिक्का बसून झालेला पराभव, त्यानंतर भाजपमधील प्रवेश, अपक्ष म्हणून झालेली फजिती आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मातोश्रीवर नाक घासून मिळवलेले तिकीट अशी त्यांची आजवरची राजकीय कारकीर्द आहे. संगमनेर आणि अकोले तालुक्याच्या जीवावर विजय मिळवल्यानंतर, केंद्रातील ‘रालोआ’ सरकारच्या काळात निधी मिळवणे कठीण झाल्याचे कारण देऊन त्यांनी पुन्हा एकदा राजकीय ‘यू-टर्न’ घेतला आहे.


राजकीय योगायोगाने, त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांचे स्वप्न उध्वस्त झाले असतानाच त्यांनी ‘विकासा’चा ढोल वाजवत पुन्हा पलायन केले. आता त्यांनी शिंदेसेनेच्या माध्यमातून महायुतीत प्रवेश केल्याने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या निर्णयावर सोन्याचा नांगर फिरवण्याची नामी संधी त्यांना मिळाली आहे. संगमनेर आणि अकोलेकरांनी 80 हजारांहून अधिक मताधिक्क्य देत त्यांच्यावर विश्वास दाखवला, त्याचे पांग आता ते फेडणार का?, दोनवेळा लागलेला ‘गद्दारी’चा शिक्का ते विकासाच्या कामातून पुसून टाकणार का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पुढील तीन वर्षांत त्यांना द्यावी लागणार आहेत. साईबाबांच्या नावाने शपथा घेऊन पुन्हा सोईची भूमिका घेणारे वाकचौरे, खर्‍या अर्थाने विकास साधून मतदारांचा रोष शांत करुन तो पश्चातापात बदलू शकतील का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


इतिहास घडवण्याची नामी संधी..
खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासाठी आता ‘करों या मरों’ची स्थिती आहे. राजकीय कुरघोड्यांच्या पलीकडे जाऊन जर त्यांनी ‘पुणे-नाशिक व्हाया संगमनेर’ रेल्वेमार्ग पुन्हा मार्गी लावला, तर ते त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील सर्वात मोठे ‘लक्ष्य’ ठरेल. जनतेने दिलेल्या मतांचे मोल त्यांनी विकासाच्या रुपात दिले, तर ‘गद्दारी’च्या शिक्क्यावरुन ते थेट ‘विकासाचे शिल्पकार’ म्हणून स्वतःचा इतिहास घडवू शकतात. त्यांच्या राजकीय आयुष्यातील ही सर्वात मोठी संधी असून, ते या संधीचे सोने करतात की पुन्हा स्वतःच्या राजकीय अस्तित्वाच्या गोंधळात अडकतात, हे येणारा काळच ठरवेल.

Visits: 12 Today: 12 Total: 1862701

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *