लग्नाचे आमिष दाखवून दोन महिने तरुणीवर अत्याचार! पीडितेचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न; आरोपी झाला गजाआड..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
ओळखीला प्रेमाचा साज चढवून अकोले नाक्यावरील एका तरुणाने एकोणावीस वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवित गेल्या दोन महिन्यांपासून वेळोवेळी तिच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. सदर तरुणीने लग्नाची विचारणा केली असता संबंधित तरुणाने लग्नास नकार दिल्याने हताश झालेल्या तरुणीने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या कुटुंबियांनी वेळीच तिला रुग्णालयात दाखल केल्याने ती वाचली. याप्रकरणी पोलिसांनी रुग्णालयात जावून तिचा जवाब नोंदविला असता वरीलप्रमाणे घटनाक्रम समोर आल्यानंतर शहर पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरुन अकोले नाका परिसरातील अरबाज पठाण याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करुन त्याला गजाआड केले आहे.

याबाबत संगमनेर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अकोले नाका परिसरातील कासारवाडी रस्त्यावर राहणार्‍या एका एकोणावीस वर्षीय तरुणीशी आरोपी अरबाज पठाण याची ओळख होती. त्यातून दोघांमध्ये भेटीगाठी व चर्चा होत असत. कालांतराने या ओळखीचे रुपांतर एकमेकांच्या प्रेमात झाले. संशयित आरोपी अरबाज पठाण हा ‘त्या’ तरुणीच्या घरी जात असत. तिच्या घरी कोणी नसल्याचा फायदा घेत त्याने गेल्या दोन महिन्यांपासून पीडितेसोबत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या दरम्यान वेळोवेळी तिने लग्नाचा तगादाही लावला, मात्र आरोपीने तिच्याशी गोडगोड बोलून आपले इप्सित साध्य केले.

गेल्या शुक्रवारी (ता.10) आरोपी पठाण याने असेच गोड बोलून तिच्या मनाविरुद्ध तिच्यावर अत्याचार केला. यावेळी तिने पुन्हा एकदा लग्नाचा विषय काढला असता आरोपीने ‘आपल्या कुटुंबातील लोक लग्नास तयार नाहीत’ असे सांगत लग्नाला स्पष्ट नकार दिल्याने सर्वस्व हरपलेल्या पीडितेने टोकाचा निर्णय घेत विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या कुटुंबातील सदस्यांनी वेळीच तिला खासगी रुग्णालयात दाखल केल्याने पीडितेचा जीव वाचला. रविवारी रात्री ती शुद्धीवर आल्यानंतर रुग्णालयाच्या सूचनेवरुन शहर पोलिसांनी तेथे जावून तिचा जवाब नोंदविला.

या जवाबात पीडितेने वरीलप्रमाणे घटनाक्रम सांगत आरोपी अरबाज पठाण याने आपल्या इच्छेविरुद्ध लग्नाचे खोटे अमिष दाखवून गेले दोन महिने शारीरिक अत्याचार केल्याने आपण आत्महत्या करण्याचा प्रयत्नद केल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी अकोले नाका परिसरात राहणार्‍या अरबाज पठाण याच्या विरोधात भारतीय दंड संहितेचे कलम 376 (2) (एन) प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्याला तत्काळ अटक केली आहे. आज दुपारी त्याला संगमनेरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले जाणार असून पोलिसांकडून त्याच्या कोठडीची मागणी केली जाणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

गेल्या काही वर्षात अकोले नाका परिसरातील म्हाळुंगी नदीच्या पात्रात अनेक अनोळखी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांनी आपले बस्तान बांधले आहे. त्यातूनच संगमनेरातील गुन्हेगारी घटनांमध्येही वाढ झाली आहे. या परिसरात राहणार्‍या अनेकांविषयी स्थानिकांनी वेळोवेळी संशयही व्यक्त केला आहे, मात्र आजपर्यंत यंत्रणेने परस्पर येवून येथे इमले बांधणार्‍यांची कधीही चौकशी केल्याचे ज्ञात होत नाही. वरील घटनेतील आरोपीही याच परिसरातील राहणारा असून त्याच्या सखोल चौकशीतून या परिसरातील गुन्हेगारीचे जाळे उलगडण्यास मदत होवू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *