केंद्र सरकारकडून संगमनेरकरांच्या स्वप्नांवर गाढवाचा नांगर! रेल्वेप्रकल्प कायमस्वरुपी रद्द करण्याची घोषणा; पाच तालुक्यांवरील अविकसितचा शापही कायम..

श्याम तिवारी, संगमनेर
शहाजीराजांना पुण्याची जहागिरी मिळण्यापूर्वी आदिलशाही सरदार मुरार जगदेवाने पुण्याची वाताहत करीत शहरावर गाढवाचा नांगर फिरवला होता. त्याकाळी हा प्रकार अतिशय अशुभ आणि शापित मानला जायचा, त्यामुळे या घटनेने संपूर्ण पुणे निर्मनुष्य झाले होते. तसाच काहीसा प्रकार आताही समोर आला असून दिल्ली दरबारातील आजच्या आधुनिक मुरार जगदेवाने संगमनेरसह पाच तालुक्यांच्या स्वप्नांवर गाढवाचा नांगर फिरवला आहे. स्वतःला भूगोलासह खगोलाचाही विद्वान समजणार्या या केंद्रीय मंत्र्याने लोकसभा निवडणुकीत ‘एनडीए’च्या विरोधात मतदान केल्याचा वचपा काढताना ‘पुणे-नाशिक’ रेल्वेप्रकल्पाच्या कामावरच पहार ठोकली आहे. रेल्वेमंत्र्यांच्या या मनमानी आणि अन्यायकारक निर्णयानंतर खेड-आंबेगावपासून सिन्नरपर्यंतच्या गावखेड्यांमधून रोष उफाळला असून केंद्र व राज्य सरकारच्या नावाने बोटं मोडली जात आहेत. रेल्वेमंत्र्यांच्या या निर्णयाविरोधात संगमनेरातूनही संताप व्यक्त होत असून कृती समितीने या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचीही तयारी सुरु केली आहे.

चारशे वर्षांपूर्वी ज्या पुण्यात हा प्रकार घडला होता, त्याच पुण्यातील रांजणगाव गणपतीचे दर्शन घेवून बाहेर पडलेल्या रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी हा धक्कादायक कावा उघड केला. स्थानिक पत्रकारांनी ‘पुणे-नाशिक’ व्हाया संगमनेर, सिन्नर रेल्वेमार्गाच्या भवितव्याबाबत त्यांना प्रश्न विचारताच एखाद्या पूर्व संचयीत संभाषणाप्रमाणे त्यांनी क्षणात स्वतःच तज्ञ होवून खोडदच्या ‘जीएमआरटी’चा भोकाडी पुन्हा उभा केला आणि पहिल्यांदाच हा प्रकल्प थेट रद्द झाल्याचे जाहीर करुन टाकले. विशेष म्हणजे पुण्याचे पालकमंत्री असताना दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘महारेल’च्या ताब्यात असलेल्या या प्रकल्पाला ‘मेट्रो’चा बुस्टर देवून अधिक गती दिली होती. त्यामुळे सिंहस्थापूर्वीच देशातील हा पहिला सेमीहायस्पीड रेल्वेप्रकल्प पूर्ण होईल अशा आशा निर्माण झाल्या होत्या. कालच्या या धक्कादायक घोषणेवेळी पुण्याचे वतनदार म्हणून मिरवणारे चंद्रकांत दादा पाटीलही त्यांच्या दिमतीला होते, मात्र त्यांच्या तोंडून या निर्णयाविरोधात चकार शब्दही निघाला नाही, त्यावरुननही भाजपच्या ‘सत्ता’ धोरणांचा अंदाज येतो.

लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांतच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुण्यात येवून ‘जीएमआरटी’चे पिल्लू जन्माला घातले होते, मात्र त्यावेळी त्यांना नागरीकांच्या रिअॅक्शनचा अंदाज नसल्याने ठरलेल्या पूर्वधोरणात ‘पर्याय’ हा शब्द मिसळून त्यांनी जनभावनेचा ठाव घेण्याचा त्यावेळी प्रयत्न केला. पुणे जिल्ह्यातील आंबेगांव, राजगुरुनगर व जुन्नरसह अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर व नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यांमधून जाणार्या या रेल्वेमार्गामूळे सिन्नर, चाकण व भोसरी येथील औद्योगिक वसाहती जोडल्या जावून पुणे, नाशिक व मुंबई या तीन महानगरांचा सुवर्ण त्रिकोण साधला जाणार होता.

या प्रकल्पाची सुरुवातीपासूनची उभारणी सेमी-हायस्पीड प्रकल्प नजरेसमोर ठेवूनच केली गेल्याने जलद दळणवळणासह शेती, उद्योग, व्यवसाय, रोजगार अशा सर्वच क्षेत्रात दशकांपासून मागासलेल्या या पाच तालुक्यांमधून विकासाची रेल्वे धावणार अशी आशाही निर्माण झाली होती. मात्र 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिरुर, शिर्डी आणि नाशिक या तीनही मतदारसंघात महाविकास आघाडीने बाजी मारल्याने विरोधात गेलेल्या भागांच्या विकासात पहारी ठोकण्यास सुरुवात झाली, त्यात आता या प्रकल्पाचाही समावेश झाला आहे. ‘जीएमआरटी’ प्रकल्पाच्या शास्त्रज्ञांनी पुण्यातील शालेय कार्यक्रमात या रेल्वेमार्गाबाबत दुर्बीणींच्या संचलनात कोणताही अडथळा नसल्याचे सांगत आजच्या प्रगत तंत्रज्ञानात काहीही अशक्य नसल्याचे सांगितले होते.

गेल्या डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनात शिरुरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात रेल्वेमंत्र्यांनी खोडदचा खोडा घालून त्याला देशाच्या अस्मितेशी जोडण्याचा आणि आपल्या मनातील मूळ राजकीय प्रतिशोधाला सावळे रुप देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी प्रकल्प मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवूनच या प्रकल्पाच्या कामाला स्थगिती दिल्याचे चक्क याच प्रकल्पाच्या भागातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीलाच सांगितले, त्यावरुनच केंद्र सरकार हा प्रकल्प गुंडाळण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले होते. रेल्वेमंत्र्यांनी त्यावेळी सभागृहात दिलेली माहितीही वास्तवाला धरुन नसल्याची व सभागृहाची दिशाभूल करणारी असल्याचे त्यावेळी बोलले गेले.

सभागृहातील रेल्वेमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर पुणे, अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील राजकीय वातावरणही तापले. कृती समित्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले, राजकारण्यांनी राजकीय डावपेच खेळले, पण रेल्वेमंत्र्यांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत पराभवाचा ‘वचपा’च डोक्यात ठेवला आणि हा प्रकल्प आधी महारेलकडून मध्यरेल्वेकडे आणि नंतर मध्यरेल्वेकडून थेट व्हाया अहिल्यानगर वळवला आणि गेल्या तीन दशकांपासून विकासाचे, समृद्धीचे आणि प्रगतीचे स्वप्न पाहणार्या पाचही तालुक्यांच्या विकासावर गाढवाचा नांगर फिरवून नागरी अपेक्षांवर राजकीय पहार ठोकली, त्याची अधिकृत घोषणाही आता करण्यात आली असून संगमनेरकरांच्या स्वप्नातील झुकझुक गाडी आता कागदाच्या रुळावरुन कायमस्वरुपी घसरली आहे.

लोकसभा निवडणुकांच्या निकालापूर्वी देवेंद्र फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ समजला जाणारा आणि राष्ट्रवादीच्या फूटीनंतर सरकारमध्ये सामील झालेल्या दिवंगत अजित पवार यांनी राजकीय गती प्रदान केलेल्या या रेल्वेमार्गाला खर्याअर्थी 2024 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर ग्रहण लागल्याचे आता ठळकपणे समोर येत आहे. या प्रकल्पामुळे कायापालट होवू पाहणार्या पुणे ते नाशिक पर्यंतच्या लोकसभा मतदारसंघातून अनुक्रमे शरद पवार गटाचे शिरुरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे, अहिल्यानगरमधील शिर्डीचे उबाठा खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि नाशिकचे राजाभाऊ वाझे अशा तिनही मतदारसंघांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जावून इंडिया आघाडीच्या वरील तिघांना निवडून दिल्याने भाजपच्या धोरणांप्रमाणे यापुढे संगमनेरकरांना निधीसह सर्वच ठिकाणी दुजाभाव सहन करावा लागू शकतो.

