शिर्डीतील पत्रकारांवर साईबाबा संस्थानची सूड भावनेतून कारवाई! संगमनेरच्या पत्रकारांकडून घटनेचा निषेध, मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या निलंबनाची मागणी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविड नियमांना अधीन राहून भाविकांसाठी खुले करण्यात आलेल्या श्री साईबाबा समाधी मंदिरातील व्यवस्था व मनमानी कारभाराचे वस्तुनिष्ठ वार्तांकन करणार्‍या पत्रकारांवर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी सूडभावनेतून गुन्हे दाखल केले आहेत. हा प्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणार्‍या माध्यमांची मुस्कटदाबी करणारा आहे. बगाटे हे शिर्डीतील नियुक्तीपासूनच वादग्रस्त ठरले आहेत. त्यांच्या एकूण भूमिकेची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी व राष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या शिर्डीतील प्रतिनिधींवर दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा त्वरीत मागे घ्यावा यासाठी आज संगमनेरातील पत्रकारांनी उपविभागीय अधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी पत्रकारांनी काळ्या फिती लावून साईबाबा संस्थानच्या कार्यकारी अधिकार्‍यांचा निषेधही नोंदविला.

गेल्या 16 नोव्हेंबर, 2020 रोजी राज्य शासनाच्या आदेशान्वये राज्यातील सर्व देवालये भाविकांसाठी खुली करण्यात आली. मात्र कोविडचे संकट लक्षात घेवून त्यासाठी नियमावलीही जाहीर केली. तब्बल आठ महिन्यांच्या विलंबानंतर मंदिरं उघडल्याने कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत मोठी गर्दी होणार हे निश्चित असल्याने विविध वृत्तवाहिन्यांचे व मुद्रित माध्यमाचे प्रतिनिधी मंदिरे उघडली त्या दिवशी शिर्डीत वार्तांकन करीत होते. त्याप्रमाणे एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे मुकुल कुलकर्णी व नितीन ओझा हे दोघेही आपल्या कॅमेरामनसोबत मंदिराच्या मागील बाजूस गुरुस्थानाजवळ साईंचे दर्शन घेवून बाहेर पडणार्‍या भाविकांच्या प्रतिक्रीया घेत होते.

याच दरम्यान संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे तेथे आले व त्यांनी कोणतीही विचारपूस न करता माध्यमांच्या प्रतिनिधींवर आगपाखड करायला सुरुवात केली व सर्वांना संस्थानच्या आवारातून बाहेर जाण्यास सांगितले. त्यानुसार तेथे उपस्थित असलेले सर्व पत्रकार तेथून बाहेर पडले. त्यानंतर काही दिवसांनी बगाटे यांनी शिर्डीतील व्यावसायिकांविरोधात भूमिका घेतली. त्यातूनही ते चर्चेत येवून वादग्रस्त ठरले.

हे सर्व कमी होते की काय म्हणून त्यांनी काही दिवसांतच मंदिरात येणार्‍या भाविकांसाठी ‘सभ्य’ वेशभूषेचा नियम लागू केला आणि ते राज्यभर वादग्रस्त अधिकारी म्हणून चर्चेत आले. या निर्णयामुळे भूमाता ब्रिगेडने आंदोलनाचा इशारा दिला. त्याचा परिणाम शिर्डीत शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. आता तरी मुख्य कार्यकारी अधिकारी आपल्या स्वभावात बदल करतील अशी अपेक्षा असताना त्यांनी 25 हजारांची देणगी देणार्‍यांना थेट आरतीला सोडण्याचा निर्णय घेतला आणि भाविकांमध्ये या निर्णयाने संतापाचे वातावरण निर्माण केले. या निर्णयानंतर असंख्य भाविकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी साईबाबांचे व भाविकांच्या श्रद्धेचे बाजारीकरण (मार्केटींग) करीत असल्याचा आरोप करीत तीव्र नाराजी व्यक्त केली.

वादग्रस्त निर्णय घेवून सतत चर्चेत राहण्याची परंपरा त्यांनी नवीन वर्षातही कायम ठेवतांना पारंपरिक पद्धतीने गावकरी प्रवेशद्वाराने बाबांच्या दर्शनासाठी जाणार्‍या शिर्डीकरांवरही बंधने आणण्याचा प्रयत्न केला. त्यातून गावकरी विरुद्ध साईबाबा संस्थान असे चित्र उभे करण्यातही बगाटे यांचा मोठा हात होता. या सर्व घटनांचे वस्तुनिष्ठ वृत्तांकन करुन एबीपी माझा या राष्ट्रीय वृत्तवाहिनीने साईबाबा संस्थानमध्ये मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचा सुरू असलेला मनमानी कारभार चव्हाट्यावर आणला. त्यामुळे पित्त खवळलेल्या बगाटे यांनी पूर्वग्रह दूषित मनाने त्यांच्या गैरकारभाराला विरोध करणार्‍या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरच घाव घालून माध्यमांची मुस्कटदाबी करण्यासाठी तब्बल अडीच महिन्यानंतर एबीपी माझाच्या दोघा पत्रकारांसह त्यांच्या कॅमेरामनवर सूड भावनेतून रविवारी (ता.31) शिर्डी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भा.दं.वि. कलम 353, 188, 34 प्रमाणे व साथरोग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची ही भूमिका हिटलरवादी असून माध्यमांची मुस्कटदाबी करणारी आहे. नियुक्तिच्या पहिल्या दिवसापासूनच वेगवेगळ्या कारणांनी सतत चर्चेत राहिलेले आणि शिर्डीकरांपासून ते भाविकांपर्यंत सर्वांशीच वाद घालणार्‍या या अधिकार्‍याची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी व शिर्डीतील ज्या पत्रकारांवर वैयक्तिक आकसापोटी, सूडभावनेतून खोटे गुन्हे दाखल केले आहेत ते त्वरीत मागे घ्यावेत अशी मागणी राज्यभरातील पत्रकार संघटनांनी घेतली आहे. त्यानुसार संगमनेर पत्रकार मंचच्यावतीनेही आज उपविभागीय अधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे व उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना निषेधाचे निवेदन देत मुख्यमंत्री महोदयांकडे वरीलप्रमाणे मागणी केली आहे.

आज संगमनेरातील पत्रकारांनी दिवसभर काळ्याफिती लावून साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचा निषेधही नोंदविला. याप्रसंगी संगमनेर पत्रकार मंचचे अध्यक्ष श्याम तिवारी, सचिव गोरक्षनाथ मदने, सदस्य आनंद गायकवाड, शेखर पानसरे, गोरक्ष नेहे, अंकुश बुब, अमोल मतकर, राजू नरवडे, सतीश आहेर, सोमनाथ काळे, नीलिमा घाडगे, भारत रेघाटे, बाबासाहेब कडू, सुनील महाले, संजय साबळे, काशिनाथ गोसावी व सुशांत पावसे आदी पत्रकार उपस्थित होते.

एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी व नितीन ओझा यांनी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्या गैरकारभाराचे वाभाडे काढल्याचा राग मनात ठेवून बगाटे यांनी रविवारी (ता.31) तब्बल अडीच महिन्यानंतर शिर्डी पोलीस ठाण्यात तिघा पत्रकारांवर गुन्हे दाखल केले, यातूनच त्यांचा पूर्वग्रह दिसून येतो. बगाटे यांची ही कृती माध्यमांची मुस्कटदाबी करणारी असल्याने राज्यभरातील पत्रकार संघटना या विरोधात एकवटल्या असून बगाटे यांची सखोल चौकशी करुन त्यांचे निलंबन करण्यासोबतच पत्रकारांवरील खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली जात आहे.

Visits: 21 Today: 1 Total: 116817

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *