नियम धाब्यावर बसवून रस्त्यावर फटाक्यांची सर्रास विक्री! पालिकेची थातूरमातूर कारवाई; कायदेशीर विक्रेत्यांमध्ये मात्र नाराजी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील काही दशकांमध्ये रहिवाशी भागातील फाटाक्यांच्या दुकानांना आग लागून मोठ्या दुर्घटना घडल्याच्या एकामागून एक घटना घडल्याने विविध न्यायालयांसह सरकारांनी गर्दीच्या ठिकाणांवर फटाक्यांची साठवणूक आणि विक्री प्रतिबंधित केली आहे. भारतीय स्फोटक हाताळणी अधिनियमातंर्गत हा प्रकार गंभीर स्वरुपाचा मानला गेला असून कायदा मोडणार्यांना शिक्षेची तरतूदही आहे. संगमनेरात पूर्वी नवीन नगररस्त्यावर भरणार्या फटाका बाजारात ऐन पाडव्याच्या दिनी आग लागल्याने मोठे अग्नीतांडव झाले होते. त्यावेळी एकामागोमाग एका गाळ्याने पेट घेतल्याने वीज कंपनीसह आसपासच्या इमारती संकटात सापडल्या होत्या. तेव्हापासून पालिकेने येथील बाजार हटवून काही वर्ष आताच्या क्रीडा संकुलाच्या मोकळ्या मैदानावर, त्यानंतर इंदिरानगर उद्यानाजवळ तर, गेल्या दशकभरापासून जाणताराजा मैदानावर खुल्याजागी तो भरवण्यास सुरुवात केली. त्यासाठी पालिकेकडून आवश्यक असलेले गाळे तात्पूरत्या स्वरुपात उभारले जातात व तेथे अग्निशमन, स्वच्छता आदी सुविधा देवून प्रत्येक गाळेधारकाकडून सुमारे आठ हजार रुपयांप्रमाणे शुल्क आकारुन महसूल मिळवला जातो. त्यासाठी संबंधित विभागाकडून आवश्यक परवानगी घेण्याचेही बंधन आहे. मात्र असे असतानाही शहरातील गल्लीबोळात उघड्यावर आणि हातगाड्यांवर सर्रास फटाक्यांची विक्री सुरु असल्याने नियमाचे पालन करीत हजारो रुपयांचे शुल्क भरणार्या गाळेधारकांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे. अशा बेकायदा विक्रीवर नियंत्रण मिळवण्याची संपूर्ण जबाबदारी असतानाही पालिका मात्र केवळ थातूरमातूर कारवाई करीत असल्याने गाळेधारकांच्या नुकसानीसह नागरिकांची सुरक्षितताही धोक्यात आली आहे.

हिंदू धर्मियांमध्ये दिवाळीच्या सणाला मोठे महत्त्व आहे. दिवाळीच्यापूर्वी प्रत्येक नागरिक घराच्या स्वच्छतेसह रंगरंगोटी, गोडधोड पदार्थ आणि नवीन कपड्यांची खरेदी करतो आणि आपल्या परिने हा सण साजरा करतो. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन
झाल्यानंतर फटाके फोडण्याची जूनी पद्धत भारतात रुजली आहे. आनंद आणि उत्साहाचा पर्व असलेल्या या दिनी देशभरात कोट्यवधी रुपयांचे फटाके वाजवले जातात. संगमनेरातही दिवाळीचे पर्व आणि फटाक्यांची आतषबाजी यांची जूनी सांगड आहे. तालुक्यात फटाक्याचे कारखानेही असून संगमनेरची फूलझडी आणि सुतळी बॉम्ब राज्यात लौकीक मिळवून आहे. समृद्ध बाजारपेठ असल्याने आसपासच्या तालुक्यांचा व्यापारही संगमनेरातूनच चालतो. त्यामुळे दिवाळीच्या कालावधीत येथील बाजारपेठेत कोट्यवधीची उलाढाल होते.

साहजिकच त्यामुळे संगमनेरातील दिवाळीही तितक्यात जोरदारपणे साजरी होते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी संगमनेरचे आसमंत रंगबिरंगी रोषणाई आणि आवाजाच्या फटाक्यांनी अक्षरशः गजबजलेले असते. गल्लोगल्ली आणि चौकाचौकात वाजलेल्या फटाक्यांच्या अक्षरशः ढिगाने चिंध्या साठलेल्या असतात. संगमनेरमध्ये दरवर्षी फटाक्यांची खूप मोठी उलाढाल होते.
पूर्वी संगमनेर शहर गावठाणात असताना आजच्या क्रीडा संकुलाच्या जागी मोकळ्या मैदानावर फटाका बाजार भरवला जायचा. कालांतराने शहराचा विस्तार होत गेल्याने उपनगरीय नागरिकांच्या सोयीसाठी तेथून तो नवीन नगर रस्त्यावर हलवण्यात आला. मात्र तीन दशकांपूर्वी येथील एका गाळ्याने अचानक पेट घेतल्याने त्यावेळी नवीन नगररस्त्याने अक्षरशः अग्नितांडव अनुभवले.

एका गाळ्याने पेट घेताच त्यातील फटाके फुटू लागल्याने त्याच्या ठिणग्यांनी आसपासच्या एकामागून एक गाळ्याने पेट घेतला आणि अवघ्या दोनतासातच संपूर्ण रस्त्याच्या दुतर्फा थाटलेल्या फटाक्यांच्या बाजाराची राख झाली. या भयानक प्रकाराने
बाजूलाच असलेल्या वीज कंपनीच्या कार्यालयासह आसपासच्या व्यापारी आस्थापनाच्या इमारतींनाही त्यावेळी धोका निर्माण झाला होता. या घटनेमुळे हा बाजार गावाबाहेर नेण्याची गरज निर्माण झाल्याने पालिकेने काही वर्ष याच रस्त्यावर पुढे इंदिरा उद्यानाच्या मोकळ्या जागेत व नंतर जाणताराजा मैदानावर हा बाजार भरवण्यास सुरुवात केली. अचानक एखादी दुर्घटना घडू नये यासाठी पालिकेकडून या ठिकाणी अग्निशमन सुविधेसह नियमित स्वच्छता व सुरक्षाही पुरवली जाते. त्या बदल्यात प्रत्येक गाळे धारकाकडून सात हजार 590 रुपयांची वसुलीही होते.

शहरीभागातील वाहतुकीचे रस्ते, वर्दळीचा भाग आणि रहिवाशी क्षेत्रात स्फोटक संज्ञेत मोडणारे कोणतेही फटाके विकण्यास कायद्याने मनाई असल्याने दरवर्षी दिवाळीच्या कालावधीत पालिकेकडून अशा प्रकारची व्यवस्था केली जाते. त्यासाठी फटाका असोसिएशनकडून आलेल्या संख्येनुसार गाळ्यांची रचना केली जाते. प्रत्येक गाळेधारकाला विविध दाखल्यांसह संबंधित विभागाकडून फटाक्यांच्या साठवणुकीची व विक्रीची कायदेशीर परवानगी घ्यावी लागते. त्यानंतरच त्याला पालिकेने उभारलेल्या
गाळ्यांमध्ये फटाक्यांची विक्री करता येते. त्यामुळे अधिकृत ठिकाणाशिवाय शहरात इतरत्र कोठेही बेकायदेशीरपणे फटाक्यांची विक्री करणार्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पालिकेसह पोलिसांचीही आहे. मात्र या दोहींकडूनही या गोष्टींकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात असून त्यामुळे हजारो रुपये खर्च करुन गाळा प्राप्त करणार्या फटाका विक्रेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

प्रचंड वर्दळीच्या आणि गजबजलेल्या भागात अशा प्रकारच्या हातगाड्या उभ्या करुन काहीजण सर्रास फटाके विक्री करीत
असल्याने सामान्य नागरिकांची सुरक्षाही धोक्यात आली असून एखाद्या छोट्याशा चुकीतून मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पालिका आणि पोलिसांनी अधिक सतर्कपणे अशा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता असून त्यांच्याकडून पुन्हा असे कृत्य घडणार नाही याचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.

लोकवस्तीच्या अथवा वर्दळीच्या भागात असलेल्या फटाका गोदामांमुळे मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाणा अशा वेगवेगळ्या राज्यांमधून गेल्या दोन-तीन वर्षात समोर आलेल्या घटनांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांचे बळी गेल्याचेही दाखले आहेत. संगमनेर शहरानेही अशाप्रकारची दुर्घटना घडू शकते याचा ट्रेलर
यापूर्वी बघितला आहे, त्यामुळे त्याची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी अधिक सजग राहण्याची गरज आहे. पालिका आणि पोलीस प्रशासनाने अशा बेकायदा विक्रीच्या ठिकाणांवर एखादी दुर्घटना घडून उत्सवाच्या वातावरणाला गालबोट लागणार नाही यासाठी कठोर होण्याची आवश्यकता आहे.

