सराईत गुन्हेगारी टोळीसमोर संगमनेर पोलीस हतबल! दुचाकीस्वाराचा जीव घेण्याचा प्रयत्न; आरोपी मात्र कायद्यापासून दूरच..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहर पोलीस ठाण्यापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर बस्तान बांधून प्रचंड दहशत निर्माण करणारी साई सूर्यवंशी टोळी काही केल्या नियंत्रणात येत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. यावेळी पोलिसांच्या कायमस्वरुपी रेकॉर्डवर असलेल्या तिघा सराईत गुन्हेगारांसह सहाजणांनी कापड दुकानात काम करणार्या सामान्य तरुणाला म्हाळुंगीनदीच्या छोट्या पूलावर आडवून कोयत्याचा धाक दाखवला व त्याच्याकडील पाच हजार रुपये लुटले. या दरम्यान त्या तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्याला अर्धमेले करण्यात आले आणि नंतर त्याचा जीव घेण्याच्या उद्देशाने त्याला पूलावरुन खाली फेकून दिले गेले. साईनगरच्या प्रवेशद्वारातच मध्यरात्री घडत असलेला हा थरार पाहुनही या टोळक्याच्या दहशतीमुळे कोणीही ‘त्या’ तरुणाच्या मदतीला पुढे येण्यास धजावले नाही. मात्र काही वेळानंतर बाजूला राहणार्या एका महिलेने मध्यस्थी करीत अर्धमेल्या अवस्थेतील त्या तरुणाची सुटका करीत नंतर त्याच्या कुटुंबियांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी त्याने नोंदवलेल्या जवाबावरुन पोलिसांनी गेल्याकाही वर्षात या संपूर्ण परिसरात प्रचंड दहशत निर्माण करणार्या, मात्र त्या उपरांतही पोलिसांवर वरचढ ठरणार्या साई सूर्यवंशीसह सहाजणांवर जीवे ठार मारण्याचा आणि चोरीच्या हेतूने खुनाच्या प्रयत्नासह भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर आरोपी पसार झाले असून शहर पोलिसांना अद्यापही त्यांचा माग काढता आलेला नाही. या प्रकाराने सूर्यवंशी टोळीसमोर संगमनेर पोलीस हतबल असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून यापूर्वीच्या गुन्ह्यात अटक होण्यापूर्वीच या टोळीने आणखी एका गंभीर गुन्ह्याची भर घातल्याने शहर पोलिसांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

याबाबत जखमी असलेल्या शुभम सुरेश भोईर या तरुणाने दिलेल्या जवाबानुसार गेल्या शुक्रवारी (ता.17) मध्यरात्री बाराच्या सुमारास तो खासगी कापड दुकानातील कामकाज आटोपून आपल्या दुचाकीवरुन चव्हाणपूरामार्गे घरी निघाला होता. यावेळी चव्हाणपूर्याकडून येणार्या रस्त्याला जोडणार्या म्हाळुंगीनदीवरील पूलावर साई सूर्यवंशी, अतुल सूर्यवंशी, अनिकेत मंडलिक या रेकॉर्डवरील सराईतांसह अन्य तिघांनी त्याला थांबवून दुचाकीची चावी काढून घेतली आणि पैशांची मागणी करीत त्याला शिवीगाळ करु लागले. यावेळी भोईरने आपल्याकडे पैसे नाहीत असे सांगताच पारा चढलेल्या साई सूर्यवंशीने पाठीमागे खोचून ठेवलेला कोयता बाहेर काढून त्याच्या धाकावर फिर्यादीच्या खिशातील पाच हजार रुपये काढून घेतले. त्यानंतरही असमाधानी असलेल्या सूर्यवंशीने कोयत्याने त्याच्या डोक्यात प्रहार केल्याने गंभीर जखम होवून त्यातून रक्तप्रवाह सुरु झाला.

टोळी प्रमुखाचा आवेश पाहुन टोळीतील अनिकेत मंडलिक याने बाजूच्या फुलझाडाच्या कुंडीने तर, अतुल सूर्यवंशीने दगडाने डोक्यात प्रहार करीत त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी बाकीच्या तिघांकडून शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरुच होती. यातून आपली सुटका नसल्याचे पाहून शुभम भोईर याने जीवाच्या आकांताने आसपासच्या रहिवाशांकडून मदतीची याचनाही केली. मात्र या टोळीच्या दहशतीसमोर कोणीही पुढे येण्यास धजावले नाही. मात्र परिसरातील एका महिलेतील माणूसकी जागल्याने त्यांनी हिमतीने पुढे येवून सूर्यवंशी टोळीला विरोध केला. ते पाहून त्या टोळक्याने त्याला अर्धमेल्या अवस्थेत पूलावरुन खाली ढकलून देत त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला व जाताजाताही ‘आमच्या विरोधात तक्रार देशील तर, जीवंत सोडणार नाही’ अशी धमकी देत तेथून निघून गेले.

या घटनेनंतर जखमी तरुणाच्या भावाने त्याच्यासह शहर पोलीस ठाणे गाठले, पोलिसांनी आधीच्या गुन्ह्याचा संदर्भ, गुन्हेगारांची पार्श्वभूमी आणि ऐन सणासुदीच्या काळात घडलेला गंभीर प्रकार पाहता एकीकडे जखमीला उपचारार्थ दाखल करुन तत्काळ या टोळीच्या मुसक्या आवळण्याची गरज होती. प्रत्यक्षात मात्र शहर पोलिसांनी आपल्या निष्क्रियतेची लक्तरे झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्यानंतरही जखमी तरुण तक्रार देण्याबाबत ठाम राहील्याने अखेर शहर पोलिसांनी घटनेनंतर 24 तासांनी साई सूर्यवंशी, अतुल सूर्यवंशी व अनिकेत मंडलिक या तिघाही सराईतांवर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न (109), चोरीच्या उद्देशाने खुनाचा प्रयत्न (307), इच्छापूर्वक दुखापत करणे (115(2)), फौजदारी धाकदपटशा (351(2)) आणि शांततेचा भंग (352) या प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे.

घटनेनंतर गुन्हा दाखल होण्यात मोठा कालावधी गेल्याने या दरम्यान गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात आलेल्या आरोपींना ऐच्छिक ठिकाणी पळून जाण्याची आयती संधी मिळाली. या प्रकरणानंतर आमदार अमोल खताळ यांच्यासह अनेकांनी जखमी भोईरची विचारपूस करुन पोलीस अधिकार्यांना तपासाच्या सूचना दिल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य वाढले आणि पसार झालेल्या आरोपींच्या शोधासाठी स्थानिक प्रकटीकरण शाखेच्या पथकासह तीन पथकांना कामाला लावण्यात आले. मात्र अद्यापपर्यंत त्याचा कोणताही फायदा झालेला नाही. त्यावरुन पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

अल्पवयीन असल्यापासूनच साई सूर्यवंशी याने गुन्हेगारी विश्वात दबदबा निर्माण केला असून शहर पोलीस ठाण्यात त्याच्यासह त्याच्या साथीदारांविरोधात डझनाने गंभीर गुन्हे दाखल आहेत. अकोलेनाका, जाजू पेट्रोलपंप ते स्वामीसमर्थ मंदिर रस्ता, वेताळमळा, घोडेकरमळा या भागात विविध दहशती कृत्यातून त्याने धाक निर्माण केला असून कोणीही त्यांच्या विरोधात बोलण्यास धजावत नाहीत. मध्यंतरी विमा कंपनीच्या कार्यालयाजवळ दुचाकी जाळण्याच्या प्रकारासह ढोलेवाडीतील एकाला वर्दळीच्यावेळी भरचौकात डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचाही प्रयत्न झाला होता. त्यात अटक होण्यापूर्वीच या टोळीने पुन्हा एकदा लुटण्याच्या हेतूने सामान्य तरुणाचा जीव घेण्याचा गंभीर गुन्हा केल्याने शहर पोलिसांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह लागले असून पोलीस अधिक्षकांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.

