संगमनेरच्या नगराध्यक्षपदाची जागा कोणाच्या वाट्याला? महायुतीत एकमेकांशी लागल्या पैंजा; यापूर्वी भाजपने मिळवली होती जागा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तब्बल दशकानंतर महायुती सरकारकडून नगरपालिका निवडणुकांमध्ये थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. त्यासाठी संगमनेरात अनेक इच्छुकांनी जोरदार तयारीही केली होती. महायुतीमधील तिनही पक्षांच्या काही प्रमुख दावेदारांनी त्या दृष्टीने वातावरण निर्मिती करताना गेले वर्षभर सोशल माध्यमात कोलांटउड्याही घेतल्याचे सर्वश्रूत आहे, मात्र आरक्षण सोडतीत संगमनेरात यंदा महिला नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली कौन्सिल अस्तित्वात येणार असल्याने हिरमोड झालेल्या अनेकांनी अज्ञातवास पत्करल्याचेही चित्र आहे. अशात महायुती एकसंधपणे निवडणुकीला सामोरे गेल्यास नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोणाचा असा प्रश्न उपस्थित झाला असून त्यावर अद्यापही स्पष्टता नसल्याने ‘उमेदवार कोणाचा’ यावरुन महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये पैंजा लागल्या आहेत. यापूर्वी 2001 साली झालेल्या निवडणुकीत महायुतीकडून भाजपला उमेदवारी मिळाली होती. तर, 2016 मध्ये ऐनवेळी महायुती विस्कटल्याने दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले होते. यंदा मात्र संगमनेरचे राजकीय वातावरण बदलले असल्याने महायुती एकत्र लढल्यास तुल्यबळ लढत होण्याची अपेक्षा आहे. अशात यापूर्वीच्या सर्वच निवडणुकांमध्ये शिवसेनेला मिळालेले यश पाहता त्यांच्याकडून संगमनेरच्या नगराध्यक्षपदावर दावा सांगितला जाण्याची दाट शक्यता आहे.

गेल्या तीन दशकांपासून एकमेकांच्या सोबतीने राज्यातील सर्वच सार्वत्रिक निवडणुकांचा सामना करणार्या महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन वाद झाला आणि राज्याच्या राजकारणात प्रदीर्घकाळ टिकलेली महायुती 2019 मध्ये संपुष्टात आली. त्यानंतर
अवघ्या अडीच वर्षात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या 40 आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवल्याने तत्कालीन महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिवसेनेच्या फूटीर गटासह भाजपने संधान साधून राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन केले. वर्षभरात एकसंध असलेल्या राष्ट्रवादीचेही दोन भाग होवून शिवसेनेप्रमाणेच पक्ष आणि पक्षचिन्ह अजित पवार यांच्याकडे आले आणि त्यांनीही भाजपशी जवळीक साधून सत्तेच्या वेलीवर आरोहण केले.

राज्यात नव्याने आकाराला आलेल्या भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महायुतीने त्यानंतरच्या लोकसभा निवडणुका एकत्रित लढल्या, मात्र त्यात त्यांना सपशेल अपयश आले. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यातच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक है तो, सेफ है’ या दोन घोषणांनी जातीत विखुरलेला हिंदू समाज एकत्र आल्याने त्याचा परिणाम राज्य विधानसभेत महायुतीला विक्रमी जागा मिळण्यासह संगमनेर मतदारसंघातही राजकीय बदल घडण्यात झाला. त्यामुळे
राज्यातील महायुतीच्या समर्थकांचे मनसुबे आकाशी भीडलेले असून त्यातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीकडून एकत्रित लढल्या जातील का? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. प्रदेशाध्यक्षपदी असताना स्थानिकमध्ये महायुतीसाठी आग्रही असलेल्या महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अलिकडच्या काळात बदललेला स्वर पाहता स्थानिकमधील महायुतीचा निर्णय स्थानिक पातळीवरच होण्याचे संकेत मिळत आहेत.

यापूर्वी 2001 साली पहिल्यांदाच थेट जनतेमधून नगराध्यक्ष निवडला गेला होता. त्यावेळी महायुतीकडून ऐनवेळी शिवसेनेच्या वाट्याची जागा भाजपने मिळवताना ज्ञानेश्वर करपे यांना उमेदवारी दिली होती. सत्ताधारी काँग्रेसकडून विश्वास मुर्तडक व राष्ट्रवादीकडून सोमनाथ अभंगही त्यावेळी रिंगणात होते. त्या निवडणुकीत सत्ता विरोधी वातावरण असतानाही महायुती आणि
राष्ट्रवादी यांच्यात विभागलेल्या मतांवर विश्वास मुर्तडक यांनी निसटता विजय मिळवत सत्ता राखण्यात यश मिळवले होते. तसाच प्रसंग 2016 मध्येही उभा राहीला होता. मात्र त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचा निर्णय स्थानिक पातळीवरच घ्यावा असे सांगत स्वबळाचा पुरस्कार केला. त्यावेळीही भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्याने तिन्ही पक्षांमध्ये जवळपास 21 हजार मतांची विभागणी झाली आणि अवघ्या 16 हजार मतांसह काँग्रेसच्या दूर्गा तांबे यांनी विजयश्री मिळवली होती.

त्यानंतर तब्बल नऊ वर्षांनी पुन्हा एकदा तसाच प्रसंग उभा राहीला असून यावेळी मात्र संगमनेर विधानसभा मतदारसंघात बदल घडून शिवसेनेचा आमदार निवडून आला आहे. अशावेळी संगमनेरच्या नगराध्यक्षपदावर पहिला दावा शिवसेनेचाच असल्याचे मानले जात असून शहरातील काही माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांनी महिला राखीव असलेल्या या जागेवर आपल्या पत्नीची वर्णी लागावी यासाठी जाळेही विणायला सुरुवात केली आहे. मात्र राज्यातील स्थानिकच्या निवडणुका एकत्र
लढायच्या की स्वतंत्र याबाबत अद्याप वरीष्ठपातळीवर कोणताच निर्णय नसल्याने अन्य पक्षातील दिग्गज आपल्या पत्नीसह ‘वेट-अॅण्ड-वॉच’च्या भूमिकेत असल्याचेही दिसून येत आहे. भाजप-शिवसेनेतील अनेक आजी-माजी पदाधिकारीही आपल्याच घरात उमेदवारी मिळावी यासाठी शर्थ करीत असून प्रसंगी महायुतीतल्या घटकपक्षात उड्या घेण्याचीही तयारी सुरु झाली आहे. त्यामुळे निवडणुकांची प्रत्यक्ष घोषणा नसतानाही संगमनेरचे राजकारण मात्र रंगू लागले आहे.

देशातील वेगात बदलत जाणारे राजकीय वातावरण, राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेले ऐतिहासिक यश आणि संगमनेर मतदारसंघात झालेला बदल यामुळे भाजप आणि शिवसेनेतील अनेकांचा
नगराध्यक्षपदावर डोळा होता. त्यातील काहींनी गेल्या वर्ष-दीड वर्षापासून आपले नाव चर्चेत ठेवण्यासाठी सोशल माध्यमांचा आधार घेत बर्याच जोर-बैठकाही मारल्या, मात्र त्या उपरांतही संगमनेरचे नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव झाल्याने अशांचा मोठा हिरमोड झाला आहे. त्यातील काहींकडून आता पक्षाचे तिकिटं आपल्या घरातच यावे यासाठीचे प्रयत्नही सुरु झाले असून ‘महायुती’ की ‘स्वतंत्र’ याचा निर्णय झाल्यानंतर इच्छुकांची गर्दी वाढण्याची दाट शक्यता आहे.

