गायीच्या वाहतुकीवरुन दोन गटात राडा! परस्परविरोधी तक्रारी; तालुका पोलिसांची भूमिका संशयास्पद..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
पिकअप वाहनात गाय आणि गोर्‍हा घेवून जाणारे संशयीत वाहन थांबवल्यानंतर संगमनेरातून आलेल्या सशस्त्र टोळक्याने टोलनाक्यावर दहशत निर्माण केली व रोखलेले वाहन घेवून पळ काढला. या संपूर्ण घटनेची सुरुवातीपासून माहिती देवूनही पोलिसांनी वाहन पळवून नेणार्‍याची तक्रार नोंदवित उलट गोरक्षकांनाच कायद्याच्या कचाड्यात अडकवले. धक्कादायक म्हणजे या प्रकरणाबाबत तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या गोरक्षकाला गुन्हेगारांप्रमाणेच वागणूक देण्यात आली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर भाजपचे विधानसभा प्रमुख अमोल खताळ यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर संबंधित गोरक्षकाची तक्रार नोंदवण्यात आली. या प्रकाराने तालुका पोलिसांचेही हात गायींच्या रक्ताने माखल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.


याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार शनिवारी (ता.14) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास चंदनापुरी घाटाचा पायथा ते हिवरगाव पावसा टोलनाका या परिसरात घडला. संगमनेरातील गोरक्षक कुलदीप ठाकूर घाटावरील एका हॉटेलमध्ये थांबलेले असताना घारगावकडून आलेल्या एका पांढर्‍या रंगाच्या पिकअप (क्र.एम.एच.15/बी.जे.5378) वाहनात असलेल्या एका गायीसह गोर्‍ह्याबाबत त्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी आपल्या सहकार्‍यांसह संशयीत वाहनाचा पाठलाग करीत चंदनापूरी घाटाच्या पायथ्याशी सदरचे वाहन अडवले. यावेळी त्यांनी केलेल्या पाहणीत त्या वाहनात एका जर्शी गायीसह एक गोर्‍हा असल्याचे व त्यांच्या शारीरिक अवस्थेवरुन ते कत्तलीसाठी घेवून जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी चालकाकडे विचारपूस केली.


यावेळी चालकाने उडवाउडवी करण्यास सुरुवात केल्याने संबंधित गोरक्षकांनी सदरचे वाहन घाटापासून टोलनाक्यापर्यंत आणले. यादरम्यान चालकाने मोबाईल करुन संगमनेरातील त्याच्या साथीदारांना याची कल्पना दिली. तर, कुलदीप ठाकूर यांनी वाहन रोखल्यानंतर लागलीच तालुका पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांना फोन करुन पोलिसांना पाठवण्याची विनंती केली. या दरम्यान सदरचे वाहन टोलनाक्यावर आल्यानंतर ठाकूर यांनी पुन्हा पोलीस निरीक्षकांना फोन केला, मात्र जवळपास अर्धा तासाचा कालावधी उलटूनही पोलीस पोहोचलेच नाहीत. पण संबंधित चालकाने केलेल्या फोनवरुन संगमनेरातील एक सशस्त्र टोळके मात्र टोलनाक्यावर हजर झाले.


यावेळी त्या टोळक्याने ठाकूर यांना उद्देशून ‘तुझे नेहमीचेच झाले आहे, तुझ्यामुळे आमचे नुकसान होते, तुझा गायीसारखाच गळा चिरुन जीवे ठार मारु व तुला हार घालू’ अशी धमकी देत ठाकूर व त्यांच्या सहकार्‍यांनी रोखलेले संशयीत वाहन दहशतीच्या जोरावर पळवून नेले. त्यानंतर काही वेळातच वाहन पळवून नेणारा चालक मुस्तकीन मोहंमद सिजाउद्दीन कुरेशी (वय 32, रा.मदिनानगर) हा एका खासगी रुग्णालयात दाखल झाला व तालुका पोलिसांनीही अतिशय तत्परता दाखवित लागलीच दवाखान्यात जावून त्याचा जवाबही नोंदवला आणि त्यावरुन कुलदीप ठाकूर यांच्यासह अन्य तिघांवर घातक शस्त्रांचा वापर करुन दुखापत केल्याप्रकरणी भारतीय न्यायसंहितेच्या कलम 118 (1), 126 (2), 115 (2), 3 (5) प्रमाणे गुन्ह्याची नोंदही केली.


याबाबतची माहिती मिळताच कुलदीप ठाकूर स्वतः तालुका पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यावेळी भ्रमणध्वनीवरुन आपण ग्रामीणभागातील एका कार्यक्रमात असल्याची बतावणी करणारे पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे चक्क पोलीस ठाण्यातच असल्याचेही त्यांना दिसले. यावेळी त्यांनी घडला प्रकार सांगत तक्रार घेण्याची विनंती केली असता त्यांची विनंती धुडकावण्यात आली व गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करुन त्यांनाच गजाआड करण्याची तयारीही सुरु झाली. मात्र याची भणक लागताच भाजपचे विधानसभा प्रमुख अमोल खताळ यांनी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत सूत्रे हलवली आणि पोलिसांना उपरती झाली.


कुलदीप ठाकूर यांनी वरीलप्रमाणे घडलेला प्रकार कथन केल्यानंतर पोलिसांनी हासिम नासिर कुरेशी उर्फ बुट्टी, सुफियास कुरेशी व मुस्तकीन कुरेशी या तिघांवर भारतीय न्यायसंहितेचे कलम 352 (सहेतू शांततेचा भंग करणे), 351 (2), 351 (3) धमकी देणे व दमदाटी करणे याप्रमाणे गुन्ह्याची नोंद केली. तत्पूर्वी संशयीत वाहनाचा चालक मुस्तकीन कुरेशी याने दिलेल्या जवाबानुसार संबंधितांनी चंदनापूरी घाटात त्याचे वाहन अडवून वाहनातील गाय व गोर्‍ह्याबाबत विचारपूस करीत कुलदीप ठाकूर व त्यांच्या जोडीदारांनी लाथाबुक्क्यांनी माहाण केल्याचा व बेकायदा त्याचे वाहन अडवल्याचा गुन्हा दाखल केला होता.


वास्तविक संगमनेरातील गोरक्षकांकडून अशाप्रकारे संशयीत वाहन रोखल्यानंतर त्याबाबत लागलीच पोलिसांना कळवले जाते व त्यांच्याकडून होणार्‍या चौकशीत सदरची जनावरे दुभती असल्यास ती सोडून दिली जातात. त्यानुसार चंदनापूरी घाटात रोखलेल्या वाहनाची माहितीही पोलिसांना देण्यात आली होती. मात्र त्याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यासह टोलनाक्यावर सीसीटीव्ही उपलब्ध असतानाही त्याची कोणतीही शहनिशा न करता पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांनी घाईघाईत गुन्हा दाखल करुन टाकला. त्यावरुन तालुका पोलिसांचेही हात गायींच्या रक्ताने माखलेले असल्याचे पुन्हा एकदा स्पष्टपणे दिसून आले.


संगमनेरातील बेकायदा गोवंश कत्तलखाने आणि पोलिसांचे अर्थपूर्ण संबंध कधीही लपून राहिलेले नाही. त्यातूनच संगमनेरात हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला असून त्यातून वेळोवेळी संगमनेरच्या शांततेलाही बाधा निर्माण होण्याचे प्रकार घडले आहेत. या बेकायदा व्यवसायातून कोट्यवधीची उलाढाल होत असल्याने व त्याचे ओघळ यंत्रणांमधील अनेकांच्या खिशापर्यंत पोहोचत असल्याने गोरक्षकांनाच पोलिसांची भूमिका बजवावी लागत आहे. मात्र आता पोलिसांचे काम करणार्‍या गोरक्षकांनाच कायद्यात अडकवण्याचे प्रकार सुरु झाल्याने संगमनेरात संताप निर्माण होवू लागला आहे.

Visits: 27 Today: 27 Total: 28759

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *